रेल्वेच्या अधिकार्यांचे आश्वासन फोल : काँग्रेसचा पुन्हा आंदोलनाचा इशारा
मडगाव : मडगाव रेल्वेस्थानक परिसरात प्रवेश करणार्या गाडीकडून प्रवासी कर आकारताना कॉम्प्युटराइज्ड सिस्टम बसवून त्यानंतरच शुल्क आकारणी करण्याचे आश्वासन रेल्वे अधिकार्यांनी काँग्रेस आंदोलकांना दिले होते. मात्र ठेकेदाराने पुन्हा एकदा मॅन्युअली पावती देत शुल्क आकारणी सुरू केल्याने काँग्रेसकडून पुन्हा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
रेल्वेस्थानकावरील पे अॅंड पार्किंगच्या सुविधेसाठी उमिया एंटरप्रायझेसला ठेका मिळालेला आहे. प्रवाशांना सोडण्यासाठी आलेल्यांना दहा मिनिटांऐवजी एक तासाचा अवधी मिळावा यासह चुकीच्या ठेकेदाराच्या नावाने शुल्क आकारणी करत सर्वसामान्याची सतावणूक केली जाते, असे सांगत काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी आंदोलन केले होते. त्यावेळी रेल्वेच्या अधिकार्यांनी जुन्या ठेकेदाराच्या नावाच्या पावतीपुस्तक व यूपीआय जप्त केला. ठेकेदाराकडून कॉम्प्युटराइज्ड सिस्टम बसवण्यात आल्यावर शुल्क आकारणी केली जाईल व करारानुसार कामकाज चालेल, असे सांगण्यात आले होते. तोपर्यंत जुन्या पद्धतीने जो पार्किंग करेल त्यालाच शुल्क आकारणी करण्यात येईल, असेही सांगण्यात आले होते. रेल्वे अधिकार्यांच्या या सूचनांना वाटाण्याच्या अक्षता लावत ठेकेदारांकडून पुन्हा कामगार नियुक्त करत प्रवेशावेळी पावती देत बाहेर पडताना पैसे आकारणी केली जात आहे. कॉम्प्युटराइज्ड सिस्टम अजूनही बसविण्यात आलेली नसल्याने गेटनजिक वाहनांची गर्दी होते.
या संदर्भात काँग्रेस नेते साविओ कुतिन्हो यांना विचारणा केली असता, त्यांनी रेल्वे अधिकार्यांकडून देण्यात आलेले आश्वासन पाळण्यात येत नाही व लोकांकडून जबरदस्तीने पैसे वसूल होत असल्याचे सांगत हे बंद न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्यात येईल, असे सांगितले.