बेळगाव - सावंतवाडी मार्गावरील बाची तपासणी नाक्यावर ५ लाखांची दारू जप्त

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
02nd December 2023, 11:20 pm
बेळगाव - सावंतवाडी मार्गावरील बाची तपासणी नाक्यावर ५ लाखांची दारू जप्त

बेळगाव : गोव्याहून बेकायदेशीररित्या दारूची वाहतूक करणाऱ्या एका मालवाहू रिक्षातील ५ लाख रुपये किमतीच्या दारू साठ्यासह एकूण ८.५ लाख रुपयांचा मुद्देमाल अबकारी अधिकाऱ्यांनी जप्त करून दोघांना अटक केली. ही घटना शनिवारी सकाळी बेळगाव - सावंतवाडी रस्त्यावरील बाची तपासणी नाक्याच्या ठिकाणी घडली.

बाची तपासणी नाक्याच्या ठिकाणी अबकारी अधिकाऱ्यांनी संशयावरून एका मालवाहू रिक्षाची (क्र. केए २२ एसइइ-९३९८) झडती घेतली. त्यावेळी त्या रिक्षातून गोव्याहून बेकायदा दारूची वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले. यावेळी विनापरवाना विविध नऊ प्रकारच्या ७६० दारूच्या बाटल्यांसह सुमारे ८ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अबकारी अधिकाऱ्यांनी जप्त केला. याप्रकरणी नागेश नारायण पाटील (वय ३४, रा. शिवाजी गल्ली बहादूरवाडी) आणि साहिल लक्ष्मण पाटील (वय १९, रा. ब्रह्मलिंग गल्ली) या दोघांना अटक करण्यात आली आहे. दारूची वाहतूक करणाऱ्या या दोघा आरोपींना न्यायालयासमोर हजर करून त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे. अबकारी विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. वाय. मंजुनाथ आणि सहाय्यक आयुक्त फिरोज खान किल्लेदार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा उत्पादक शुल्क उपायुक्त वनजाक्षी एम., अबकारी अधीक्षक विजयकुमार हिरेमठ, उपअधीक्षक रवी यमुरगोड यांच्या नेतृत्वाखाली अबकारी निरीक्षक मंजुनाथ गलगली, सुनिल पाटील, शिपाई महादेव कटगेन्नावर व इतर कर्मचाऱ्यांनी कारवाई केली. 

हेही वाचा