मालिकेवर कब्जा मिळविण्यासाठी टीम इंडिया सज्ज

ऑस्ट्रेलियाविरुद्ध आज चौथा टी-२० सामना : श्रेयस अय्यरचे संघात पुनरागमन

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
01st December 2023, 12:13 am
मालिकेवर कब्जा मिळविण्यासाठी टीम इंडिया सज्ज

रायपूर : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेतील चौथा सामना शुक्रवारी १ डिसेंबर रोजी खेळवला जाणार आहे. शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, रायपूर येथे खेळल्या जाणारा हा सामना ऑस्ट्रेलियाला कोणत्याही किमतीवर जिंकून मालिका २-२ अशी बरोबरीत आणायची आहे.
दरम्यान, तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताला पाच गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. टीम इंडिया आता चौथ्या सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल. त्याचबरोबर मालिकेत बरोबरी साधण्याचा आणि पाचवा सामना निर्णायक ठेवण्याचा ऑस्ट्रेलियाचा प्रयत्न राहणार आहे.
प्लेइंग इलेव्हनमध्ये होणार बदल
या सामन्यात उजव्या हाताचा फलंदाज श्रेयस अय्यर भारतीय संघात पुनरागमन करेल. उपकर्णधारपदाची जबाबदारीही श्रेयस पार पाडेल. तो पुनरागमन करताच प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. श्रेयस अय्यर संघात परतल्यावर तिलक वर्माला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. याशिवाय गोलंदाजीतही बदल होण्याची शक्यता आहे. या सामन्यात मुकेश कुमारचे पुनरागमन होऊ शकते. लग्नामुळे तो तिसरा टी-२० खेळू शकला नाही.
तिसऱ्या सामन्यात मॅक्सवेलची विजयी खेळी
ऑस्ट्रेलिया भारताविरुद्धचा तिसरा टी-२० सामना जिंकून मालिकेत २-१ अशी पिछाडीवर आहे. तिसऱ्या सामन्यात अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलने जवळपास एकहाती खेळ करत ऑस्ट्रेलियाला विजयापर्यंत नेले. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ५ विकेटने पराभव केला. आता चौथा टी-२० सामना रायपूरमध्ये खेळवला जाणार असून येथे प्रथमच टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळवला जाणार आहे.
टीम इंडियाला मालिका जिंकण्याची संधी
टीम इंडियाने चौथा टी-२० सामना जिंकल्यास पाच सामन्यांच्या मालिकेवर कब्जा करेल. टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मालिका जिंकून विश्वचषक २०२३ च्या फायनलमधील पराभवाचा बदला घेण्याची संधी आहे. तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला. अशा परिस्थितीत चौथ्या टी-२० सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे बदल केले जाऊ शकतात.
ऋतुराज-यशस्वी जोडी धोकादायक
ऋतुराज गायकवाड आणि यशस्वी जैस्वाल ही जोडी अतिशय धोकादायक आहे आणि हे दोन्ही फलंदाज पॉवर-प्लेमध्ये धावा करण्यात माहीर आहेत. तिसऱ्या टी-२० सामन्यात ऋतुराज गायकवाडने शानदार टी-२० शतक झळकावले. पण, टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. चौथ्या टी-२० सामन्यात यशस्वी जैस्वाल आणि ऋतुराज गायकवाडही सलामी देऊ शकतात. यशस्वी आणि ऋतुराज सामना क्षणार्धात बदलण्यात माहीर आहेत.
फलंदाजीत श्रेयस अय्यर चौथ्या स्थानी
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या टी-२० सामन्यात यष्टिरक्षक फलंदाज इशान किशन तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. श्रेयस अय्यर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकतो. अशा स्थितीत तिलक वर्माला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर बसावे लागू शकते. कर्णधार सूर्यकुमार यादव पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरू शकतो. भारतीय संघ व्यवस्थापन फिनिशर रिंकू सिंगला प्लेइंग इलेव्हनमध्ये सहाव्या क्रमांकावर फलंदाजीची संधी देऊ शकतो.
अक्षर ऐवजी वॉशिंग्टनला मिळेल संधी
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या टी-२० सामन्यात अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरला ७व्या क्रमांकावर फलंदाजीची संधी दिली जाऊ शकते. वॉशिंग्टन सुंदर ऑफ स्पिन गोलंदाजीसह फलंदाजीत टीम इंडियाला मजबूत करेल. वॉशिंग्टन सुंदर खेळला तर अक्षर पटेलला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर बसावे लागू शकते.
गोलंदाज अर्शदीपला मिळणार बाहेरचा रस्ता
लेगस्पिनर रवी बिश्नोईचा फिरकी गोलंदाजी विभागात समावेश केला जाऊ शकतो. चौथ्या टी-२० सामन्यात रवी बिश्नोई ऑस्ट्रेलियासाठी सर्वात मोठा धोका ठरणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या सामन्यात कर्णधार सूर्यकुमार यादव वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान आणि दीपक चहर यांना संधी देईल तर वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेरचा रस्ता दाखवू शकतो. अर्शदीप सिंग पहिल्या ३ टी-२० सामन्यांमध्ये चांगलाच महागडा ठरला आहे.
पिच रिपोर्ट
रायपूरमध्ये ६ आयपीएल सामने आणि ८ चॅम्पियन्स टी-२० लीग सामने आयोजित करण्यात आले आहेत. येथे कोणत्याही संघाने २०० हून अधिक धावा केल्या आहेत. येथील खेळपट्टी गोलंदाजांना पूर्ण साथ देईल अशी अपेक्षा आहे. दुसऱ्या डावात ही खेळपट्टी संथ होते, त्यामुळे या खेळपट्टीवरून फिरकीपटूंना मदत मिळते. दव असल्यामुळे येथे पाठलाग करणे सोपे आहे. कारण दवामुळे गोलंदाजी करणे कठीण होते. चौथ्या सामन्यात नाणेफेक महत्त्वाची भूमिका बजावेल. भारत हा सामना जिंकून मालिकेत कब्जा करण्याचा प्रयत्न करेल, तर ऑस्ट्रेलियाची नजर मालिकेत बरोबरी करण्याकडे असेल.
रायपूर मैदानावर प्रथमच होणार टी-२० सामना
आत्तापर्यंत रायपूरच्या मैदानावर एकच एकदिवसीय सामना खेळला गेला आहे. त्या सामन्यात न्यूझीलंडने भारताविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना १०८ धावा केल्या होत्या. यानंतर टीम इंडियाने २ गडी गमावून लक्ष्य सहज गाठले. या मैदानावर आयपीएल आणि चॅम्पियन्स टी-२० लीगचे अनेक सामने खेळले गेले आहेत.
..........
आजचा सामना

भारत वि. ऑस्ट्रेलिया
स्थळ : शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, रायपूर.
वेळ : सायं. ७ वा.
थेट प्रक्षेपण : स्पोर्ट्स १८, जिओ सिनेमा अॅप