दोन्ही संघ ३-३ अशा बरोबरीत : यजमान केरळा ब्लास्टर्सचा जबरदस्त खेळ
कोची : इंडियन सुपर लीग २०२३-२४ (आयएसएल) मध्ये कोचीच्या स्टेडियमवर गोल्सचा पाऊस पडलेला पाहायला मिळाला. केरळा ब्लास्टर्स एफसी विरुद्ध चेन्नईयन एफसी यांच्यातल्या लढतीत कमालीची चुरस रंगली. पाहुण्या चेन्नईयन एफसीने तीनवेळा यजमानांना पिछाडीवर टाकले. परंतु, केरळा ब्लास्टर्स एफसीने तितक्याच ताकदीने पुनरागमन केले. घरच्या मैदानावर केरळा ब्लास्टर्स सहजासहजी हार मानण्यास तयार नव्हता आणि दिमित्रीओस डिएमांटाकोसने दुसऱ्या हाफमध्ये अविश्वसनीय गोल करून सामना बरोबरीत आणला. दोन्ही संघांना अखेर ३-३ अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले असले तरी चाहत्यांना दर्जेदार खेळाचा पुरेपूर आनंद या सामन्यातून लुटता आला.
आयएसएलमध्ये टॉप सहामध्ये एन्ट्री मारण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या चेन्नईयन सुपर किंग्सने यजमान केरळा ब्लास्टर्सला पहिल्याच मिनिटाला झटका दिला. राफेल क्रिव्हेलारोने दिलेल्या क्रॉसवर रहीम अलीने उजव्या टाचेचा वापर करून भन्नाट गोल केला आणि चेन्नईयन एफसीला १-० अशी आघाडी मिळवून दिली. ८व्या मिनिटाला क्वामे पेप्राहचा ऑन टार्गेट प्रयत्न सरळ चेन्नईयनच्या गोलरक्षकाच्या हातात विसावला. १०व्या मिनिटाला क्वामेला पेनल्टी क्षेत्रात अजित कुमारने पाडले आणि केरळा ब्लास्टर्सला पेनल्टी मिळाली. दिमित्रीओस डिएमांटाकोसने रॉकेट गोल करून यजमानांना १-१ अशी बरोबरी मिळवून दिली. केरळाला या बरोबरीचा आनंद फार वेळ अनुभवता आला नाही. १२व्या मिनिटाला चेन्नईयनच्या राफेल क्रिव्हेलारोला गोलपोस्टच्या समोरच केरळाच्या खेळाडूने पाडले अन् रेफरीने चेन्नईयनला पेनल्टी दिली. जॉर्डन मरेने त्यावर गोल करून चेन्नईयनला पुन्हा आघाडी मिळवून दिली.
कोचीच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर फुटबॉल चाहत्यांकडून नेहमीच उत्साहवर्धक वातावरण पाहायला मिळते. २०व्या मिनिटाला कॉर्नरवरून आलेला चेंडू रहीम अलीच्या डोक्याला लागून गोलजाळीत विसावला. परंतु. रेफरीने चेन्नईयनला हा गोल दिला नाही, कारण त्यांच्या मते गोलरक्षक सचिन सुरेशला त्याचा धक्का लागला. पण, दोन्ही संघांकडून होत असलेला सकारात्मक खेळ चाहत्यांची उत्कंठा वाढवणारा होता. २४व्या मिनिटाला चेन्नईयनने आणखी एक धक्का दिला. केरळाच्या बचावफळीचे हसू झालेले पाहायला मिळाले आणि रहीमच्या पासवर जॉर्डन मरेने सहज गोल केला. ३८व्या मिनिटाला पेप्राने बॉक्सच्या कॉर्नरवरून अप्रतिम गोल करून केरला ब्लास्टर्सला सामन्यात आणले. ४१व्या मिनिटाला गोलरक्षक देबजीत मजुमदारने चांगला बचाव करताना केरलाचा बरोबरीचा प्रयत्न अयशस्वी ठरवला. पहिल्या हाफमध्ये चेन्नईयनने ३-२ अशी आघाडी कायम राखली.
चेन्नईयनने पूर्वार्ध गाजवल्यानंतर दुसऱ्या हाफमध्ये यजमानांवर पुनरागमनाचे आव्हान होते. पण, ४६व्या मिनिटाला जॉर्डन मरेचा एक प्रयत्न थोडक्यात हुकला. केरळाकडून एड्रीयन लुना व राहुल केपी यांनी दबाव वाढवणारा खेळ सुरू केला. केरळा ब्लास्टर्सकडून खूपच तांत्रिक खेळ सुरू झाला आणि ते चेन्नईयनची बचावफळी भेदण्याचा सातत्याने प्रयत्न करताना दिसले. ५९व्या मिनिटाला डिएमांटाकोसने बॉक्सबाहेरून अविश्वसनीय गोल करून केरळा ब्लास्टर्सला ३-३ अशी बरोबरी मिळवून दिली. ७३व्या मिनिटाला हॉर्मिपम रुईव्हानचा गोल करण्याचा प्रयत्न थोडक्यात हुकल्याने ब्लास्टर्सची आघाडीची संधी गेली. तीनवेळा पुनरामगन केल्यानंतर यजमान आता विजयासाठी जोरदार प्रयत्न करताना दिसले. ८२व्या मिनिटाला इरफान यादवचा प्रयत्न थोडक्यात हुकला अन्यथा चेन्नईयनला पुन्हा आघाडी मिळालीच होती. ७ मिनिटांच्या भरपाई वेळेत चेन्नईयनचा फारुख चौधरी व केरळा ब्लास्टर्सचा देईसुके सकाई यांच्याकडून गोल करण्याची सोपी संधी गमावली गेली आणि हा सामना ३-३ अशी बरोबरीत सुटली.
निकाल : केरळा ब्लास्टर्स ३ (दिमित्रीओस डिएमांटाकोस ११ मि. (पेनल्टी) व ५९ मि., क्वामे पेप्राह ३८ मि.) बरोबरी वि. चेन्नईयन एफसी ३ (रहीम अली १ मि., जॉर्डन मरे १३ मि. (पेनल्टी) व २४ मि.