बीसीसीआयची घोषणा : सपोर्ट स्टाफच्या करारातही वाढ
मुंबई : विश्वचषक फायनलनंतर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाल संपला होता. त्यानंतर प्रशिक्षकपदासाठी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, बीसीसीआयने पुन्हा एकदा मुख्य प्रशिक्षकपदाची धुरा राहुल द्रविडकडेच सोपवली आहे. याबाबतची माहिती बीसीसीआयने ट्विट करत दिली.
बीसीसीआयने राहुल द्रविडसह त्याच्या संपूर्ण सपोर्ट स्टाफचा कार्यकाळही वाढवला आहे. यामध्ये फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप आणि गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांबरे यांचा समावेश आहे. बीसीसीआय आणि राहुल द्रविड यांच्यात चर्चा झाली त्यानंतर कार्यकाळ वाढवण्याची घोषणा बीसीसीआयने केली.
दरम्यान, बीसीसीआयने आशिष नेहराला टी-२० साठी हेड कोच म्हणून ऑफर केल्याची बातमी आली होती. मात्र, नेहराने नकार दिल्याची माहिती आहे. नेहराच्या नकारानंतर द्रविडला बीसीसीआयने कायम केले आहे. येत्या टी-२० विश्वचषकासाठी आता संघ बांधणी करावी लागणार आहे.
२०२४ मध्ये टी-२० विश्वचषकाचे यजमानपद अमेरिका आणि वेस्ट इंडिजकडे आहे. यंदाच्या एकदिवसीय विश्वचषकाचे स्वप्नभंग झाल्यावर भारतीय चाहत्यांना टी-२० विश्वचषकाच्या आशा आहेत. सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात टी-२० मालिका सुरू आहे त्यामध्ये व्हीव्हीएस लक्ष्मण मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी पार पाडत आहे. आता १० फेब्रुवारीला भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाईल त्यावेळी द्रविड पुन्हा आपली जबाबदारी पार पाडताना दिसणार आहे.
भारताने चॅम्पियन ट्रॉफीनंतर एकही आयसीसी ट्रॉफी जिंकली नाही. अनेकदा हातातोंडाशी आलेला घास हिसकावल्यासारखे झाले आहे. त्यामुळे रोहितचे नेतृत्त्व आणि कोच म्हणून द्रविड यांच्या कारकिर्दीत वर्ल्ड कप ट्रॉफी उंचावली जाते की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
नवीन आव्हाने स्वीकारण्यासाठी वचनबद्ध
माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल, माझ्या दूरदृष्टीला पाठिंबा दिल्याबद्दल मी बीसीसीआय आणि पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो. या भूमिकेत राहण्यासाठी बराच वेळ घरापासून दूर राहणे आवश्यक आहे. मी माझ्या कुटुंबाच्या त्याग आणि समर्थनाचे मनापासून कौतुक करतो. त्यांची पडद्यामागची भूमिका मोलाची आहे. विश्वचषकानंतर आम्ही नवीन आव्हाने स्वीकारत असताना, आम्ही उत्कृष्ट कामगिरीचा पाठपुरावा करण्यासाठी वचनबद्ध आहोत, असे राहुल द्रविड म्हणाला.