दुसऱ्या देशातील संस्कृती समजण्यासाठी चित्रपट महोत्सव गरजेचे : शेखर कपूर

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
28th November 2023, 12:00 am
दुसऱ्या देशातील संस्कृती समजण्यासाठी चित्रपट महोत्सव गरजेचे : शेखर कपूर

पणजी : दुसऱ्या देशातील संस्कृती समजण्यासाठी इफ्फी किंवा अन्य आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव भरविणे गरजेचे असल्याचे मत दिग्दर्शक तसेच आंतरराष्ट्रीय चित्रपट विभागाच्या ज्युरी मंडळाचे अध्यक्ष शेखर कपूर यांनी व्यक्त केले. सोमवारी इफ्फीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ज्युरी मंडळातील अन्य सदस्य देखील उपस्थित होते.
शेखर कपूर म्हणाले की, लहान असताना मला हॉलिवूडचे चित्रपट म्हणजेच सर्वश्रेष्ठ वाटत होते. मात्र जगभरातील विविध चित्रपट पाहिल्यावर अमेरिकेतील चित्रपट सर्वोत्कृष्ट नाहीत हे समजले. चित्रपट महोत्सवात विविध देशांची भाषा, संस्कृती, तेथील परिस्थिती समजली. यासाठीच असे महोत्सव घेणे आवश्यक आहे. गेल्या काही वर्षांत भारतासह जगभरात अनेक चित्रपट महोत्सव होत आहेत. यामुळे स्थानिक संस्कृती समजत आहे. 

पर्रीकरांमुळेच इफ्फी गोव्यात!
शेखर कपूर म्हणाले की, दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या अथक प्रयत्नांमुळे इफ्फी गोव्यात आला. इफ्फी समुद्रकिनारी घ्यावे असे काही जणांनी सुचवले होते. मात्र आम्ही समुद्र किनाऱ्यांची निवड न करता इफ्फीचे ठिकाण म्हणून पणजीला निवडले. त्यामुळे प्रतिनिधींना गोव्याची संस्कृती समजायला मदत झाली.

गरज असेल, तर कन्वेंशन सेंटर बांधावे!
इफ्फी गोव्यात येणार असे ठरल्यावर आयनॉक्स थिएटर उभारण्यात आले. आतादेखील इफ्फीसाठी मुबलक थिएटर उपलब्ध आहेत. माझ्या मते वेगळ्या कन्वेंशन सेंटरची गरज नाही. मात्र त्यामुळे जर महोत्सवाला फायदा होत असेल तर ते बांधले गेले पाहिजे.