आम्ही खोटा प्रचार करत नाही!

पतंजली आयुर्वेद : न्यायालयात पुरावे देण्यास तयार

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
22nd November 2023, 11:57 pm
आम्ही खोटा प्रचार करत नाही!

हरिद्वार : आम्ही सर्वोच्च न्यायालयाचा आदर करतो. आम्ही खोट्या जाहिराती किंवा अपप्रचार केल्यास आम्हाला कोट्यवधींचा दंड ठोठावला, तर आमची हरकत नाही. मात्र आम्ही खोटा प्रचार करत नाही, असा दावा पतंजली आयुर्वेद लिमिटेडतर्फे करण्यात आला आहे.
योग, आयुर्वेद, निसर्गोपचार, पंचकर्म, शतकर्म, शेकडो उपचारपद्धती, उपवास आणि उपासना पद्धतींच्या एकात्मिक उपचाराने लाखो लोकांना आजारांपासून मुक्त केले आहे. आम्ही हजारो लोकांना बीपी, शुगर, थायरॉईड, दमा, संधिवात आणि लठ्ठपणापासून ते यकृत, मूत्रपिंड निकामी होणे आणि कर्करोगापर्यंतच्या जीवघेण्या आजारांपासून मुक्त केले आहे. आमच्याकडे एक कोटीहून अधिक लोकांचा डेटा बेस आणि क्लिनिकल पुरावे आहेत.
पारंपरिक उपचार आणि सनातन ज्ञान परंपरेवरील संशोधनासाठी आमच्याकडे जगातील सर्वोत्तम संशोधन केंद्र असलेले पतंजली रिसर्च फाउंडेशन आहे. येथे शेकडो जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ संशोधन करत आहेत. ५०० शोधनिबंध जगातील आघाडीच्या संशोधन जर्नल्समध्ये प्रकाशित झाले आहेत.
वैद्यकीय क्षेत्रातील काही डॉक्टरांचा योग, आयुर्वेद आणि निसर्गोपचाराला विरोध आहे. सिंथेटिक औषधांनी रोग नियंत्रित केले जाऊ शकतात, परंतु ते बरे होऊ शकत नाहीत. वैद्यकीय क्षेत्रातील वैद्यकीय माफिया/ड्रग माफियांच्याविरोधात आम्ही लढा दिला आहे. वैद्यकीय शास्त्रातील चांगले डॉक्टर आणि जीवरक्षक औषधे, तातडीचे उपचार आणि आवश्यक शस्त्रक्रिया करणाऱ्यांचा आम्ही आदरच करतो, असे पतंजलीतर्फे सांगण्यात आले आहे.
प्रगत उपचारपद्धती महर्षी चरक, महर्षी सुश्रुत, वेद आणि आयुर्वेदाचे महर्षी धन्वंतरी, पतंजली यांच्याकडून मिळालेली आहे. ती आम्ही शास्त्रोक्त आणि प्रामाणिकपणे पुढे नेत आहोत. त्यात व्यावसायिक हेतू नाही. गरज भासल्यास आम्ही सर्व तथ्ये आणि पुरावे न्यायालय आणि माध्यमांसमोर मांडण्यास तयार आहोत, असे पतंजली आयुर्वेद लिमिटेडतर्फे सांगण्यात आले.

हेही वाचा