खेळाडूंसाठी पालकांचा पाठिंबा आवश्यक : संपदा कवळेकर

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पटकावले रौप्यपदक

Story: क्रीडा प्रतिनिधी। गोवन वार्ता |
20th November, 10:34 pm
खेळाडूंसाठी पालकांचा पाठिंबा आवश्यक : संपदा कवळेकर

पणजी : कोणत्याही खेळात यशस्वी होण्यासाठी पालकांची साथ महत्त्वाची असते, असे प्रतिपादन संपदा कवळेकर हिने केले. तिने गोव्यात नुकत्याच पार पडलेल्या ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत स्क्वे मार्शल आर्टमध्ये रौप्यपदक पटकावले होते.

गोव्यात २००९ पासून स्क्वेची सुरुवात झाली. त्याच वर्षापासून माझे या खेळाशी नाते निर्माण झाले. हा प्रकार खेळण्यास मात्र मी २०११ मध्ये सुरुवात केली. तेव्हापासून आजतागायत या खेळाचा भाग आहे. या खेळाची निवड करण्याचे संपूर्ण श्रेय वडिलांना जाते, असे संपदाने पुढे सांगितले.

३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेपूर्वी तिने चार वेळा शालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे. ‘राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत राज्याचे प्रतिनिधित्व करून रौप्यपदक जिंकल्याने माझ्या आई-वडिलांना आनंद झाला आहे. हे पदक मी माझ्या आई-वडिलांना समर्पित करते ज्यांनी मला मनापासून पाठिंबा दिला आहे. माझ्या वडिलांनी मला प्रशिक्षण वर्गात घातले ज्यामुळे मला या खेळाप्रती अधिक आवड निर्माण झाली. असे पालक सर्वांना मिळावेत, अशी माझी इच्छा आहे, असे संपदा म्हणाली. 

स्क्वे मार्शल आर्ट या क्रीडा प्रकारात तांत्रिक भाग अधिक आहे आणि हा मूळ भारतीय खेळ आहे. जर तो आंतरराष्ट्रीय स्तरावर गेला तर तो देशासाठी अभिमानाचा क्षण असेल. शिक्षण महत्त्वाचे आहे, पण जीवनात पुढे जाण्यासाठी अभ्यासाव्यतिरिक्त उपक्रमांमधून जो आत्मविश्वास मिळतो, तो कुठेही मिळू शकत नाही, असे मत संपदाने व्यक्त केले.

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या तयारीबाबत बोलताना संपदा म्हणाली की, सरकारने कासावली येथे ४५ दिवसांचे निवासी शिबिर आयोजित केले होते, जिथे आहार आणि इतर गरजा पूर्ण केल्या जात होत्या. मला सुवर्णपदकाची अपेक्षा होती, पण रौप्यपदकाने मी खूश आहे. यानंतर मला खेलो इंडिया गेम्स आणि उत्तराखंडमध्ये होणार्या पुढील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी व्हायचे आहे, त्यासाठी मी तयारी करत आहे, असे संपदा म्हणाली.