भारत-ऑस्ट्रेलिया पुन्हा आमनेसामने; टी-२० मालिका २३ पासून

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
20th November 2023, 10:31 pm
भारत-ऑस्ट्रेलिया पुन्हा आमनेसामने; टी-२० मालिका २३ पासून

मुंबई : विश्वचषक २०२३ संपल्यानंतरही क्रिकेटचा ज्वर संपणार नाही. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात गुरुवार, दि. २३ नोव्हेंबरपासून ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाणार आहे. तर मालिकेतील शेवटचा सामना रविवार, दि. ३ डिसेंबर रोजी होणार आहे.  

या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर करण्यात आला आहे. भारताचा संघ सोमवारी उशिरा जाहीर झाला. या मालिकेसाठी भारताने आपल्या संघाची कमान सूर्यकुमार यादवकडे सोपवली आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मॅथ्यू वेड असेल. 

नियमित कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासह संघातील अनेक वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली आहे. अशा स्थितीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध युवा खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे.

नव्या कर्णधारासाठी टी-२० फॉरमॅटचा नंबर १ फलंदाज सूर्यकुमार यादवचे नाव सर्वांत पुढे होते. सूर्यकुमार यादवला वेस्ट इंडिज दौऱ्यावर टी-२० मालिकेचा उपकर्णधार बनवण्यात आले होते.      

टी-२०मध्ये सूर्याचा स्ट्राइक रेट १७२      

सूर्यकुमार यादव हा टी-२० फॉरमॅटमधील एक घातक खेळाडू आहे. या वेगवान फॉर्मेटमध्ये त्याने ४६.०२ च्या सरासरीने आणि १७२.७० च्या स्ट्राइक रेटने १,८४१ धावा केल्या आहेत. सूर्याने टी-२० फॉरमॅटमध्येही ३ शतके झळकावली आहेत. त्याची सर्वोत्तम धावसंख्या ११७ धावा आहे. टी-२० फॉरमॅटमध्ये सूर्यकुमार यादव ३६० डिग्रीमध्ये फलंदाजी करतो आणि मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यात फटके मारतो. सूर्याने काही वर्षांपूर्वी इमर्जिंग कपमध्ये मुंबई संघ आणि भारताच्या २३ वर्षांखालील संघाचे नेतृत्वही केले आहे.    सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग, तिलक वर्मा या फलंदाजांना भारतीय संघात संधी मिळू शकले. तर जितेश शर्मा यष्टीरक्षक काम करणार. गोलंदाजीत मुकेश कुमार, अर्शदीप सिंग आणि रवी बिश्नोई या गोलंदाजांचा समावेश करण्यात आला आहे.

ऑस्ट्रेलियाने केला संघ जाहीर

भारताविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने आधीच संघ जाहीर केला आहे. संघाची कमान मॅथ्यू वेड यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, अॅडम झाम्पा आणि जोस इंग्लिस यांचाही संघात समावेश करण्यात आला आहे. भारत-ऑस्ट्रेलिया टी-२० मालिकेचे सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजल्यापासून खेळवले जातील.

भारताचा संघ           

सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), इशान किशन, यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान आणि मुकेश कुमार.

टी-२० मालिकेचे वेळापत्रक

  1. पहिला सामना : २३ नोव्हेंबर : विशाखापट्टणम            
  2. दुसरा सामना : २६ नोव्हेंबर : तिरुवनंतपुरम            
  3. तिसरा सामना : २८ नोव्हेंबर : गुवाहाटी            
  4. चौथा सामना : १ डिसेंबर, नागपूर            
  5. पाचवा सामना : ३ डिसेंबर हैदराबाद