खलिस्तानी दहशतवाद्यांसोबत नाझीच्या सैनिकाचा उदोउदो!

Story: विश्वरंग । संतोष गरुड |
26th September 2023, 11:19 pm
खलिस्तानी दहशतवाद्यांसोबत नाझीच्या सैनिकाचा उदोउदो!

खलिस्तानी दहशतवाद्यांना आश्रय देणारे आणि त्याची तळी उचलत भारताशी पंगा घेणारे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी ज्यूंना डिवचण्याची कृती केल्याने जगभरात त्यांची नाचक्की झाली आहे. कारण आपल्या हेखेकोर स्वभावामुळे संपूर्ण जगाला दुसऱ्या महायुद्धाच्या खाईत लोटणाऱ्या हिटलरच्या नाझी सैनिकाचे उदात्तीकरण कॅनडाच्या संसदेने केले आहे. एका नाझी सैनिकाचा कॅनडाच्या संसदेत गौरव करण्यात आला. सभापतींपासून खासदारांपर्यंत सर्वांनी त्यांचा सन्मान केला. यामुळे ट्रुडो यांच्यावर जगभरातून टीका होत आहे.      

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांनी २ फेब्रुवारी २०२२ रोजी ट्विट करून कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांची तुलना अॅडॉल्फ हिटलरशी केली होती. तेव्हा कॅनडात प्रचंड वादंग माजला होता. शेवटी मस्क यांना ते ट्विट डीलिट करावे लागले होते. त्यावेळी मस्क यांनी हिटलरसोबत ट्रुडो यांचा फोटो जोडून ते ट्विट केल्यानंतर मस्क यांच्या विरोधात निषेधाचा सूर उमटत होता. त्यांना शिक्षा करावी, अशी मागणीदेखील जस्टिन यांच्या समर्थकांनी केली होती. मात्र, दोन दिवसांपूर्वी कॅनडाच्या संसदेत जे घडले, त्यातून मस्क यांनी जस्टिन यांची हिटलरशी केलेली तुलना योग्यच होती, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.      

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की २२ सप्टेंबर रोजी कॅनडा दौर्यावर गेले होते. तिथे त्यांनी कॅनडाच्या संसदेला संबोधित केले. त्यावेळी सभागृहाच्या गॅलरीत जर्मनीचा हुकूमशहा हिटलरच्या नाझी सैन्यातील  ९८ वर्षीय माजी सैनिक यारोस्लाव हुंका उपस्थित होता. झेलेन्स्की यांचे भाषण झाल्यानंतर सभापती अँथनी रोटा यांनी हुंकाकडे सभागृहाचे लक्ष वेधला. तेव्हा सरकारपक्षातील खासदारांनी उभे राहून त्या सैनिकाचे स्वागत केले. त्यांच्या सन्मानार्थ टाळ्या वाजवल्या. त्यापुढचा कहर म्हणजे रोटा यांनी हुंकाचे वर्णन ‘फर्स्ट युक्रेनियन डिव्हिजन’साठी लढणारा ‘युद्धनायक’ असा केला.      

जगावर दुसरे महायुद्ध थोपणाऱ्या आणि ११ लाख निष्पाप ज्यूंना गॅस चेंबरमध्ये कोंबून अतिशय निर्दयीपणे मारणाऱ्या नाझी सैनिकांमधील एकाचा कॅनडाच्या संसदेत झालेला सन्मान पाहता, जगभरातून जस्टिन सरकावर टीकेची झोड उठली आहे. आपल्याकडून चूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सभापतींनी लगेच माफी मागितली. पण जस्टिन यांनी मौन बाळगले होते. यामुळे संपूर्ण कॅनडातील ज्यू संघटनांनी आक्रमक भूमिका घेत जस्टिन यांनी माफी मागावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर जस्टिन यांनी सारवासारव करत माफीही मागितली आहे.      

अर्थात कॅनडातील सरकारने नाझींचे उदात्तीकरण करणे काही नवीन नाही. कारण पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात कॅनडाने जर्मनीची साथ दिली आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर रशियाला घाबरून जर्मनीतील अनेक लोकांनी देश सोडला. त्यातील बहुतांशी कॅनडात स्थलांतरित झाले होते. त्यामुळे मूळ जर्मनची मोठी लोकसंख्या कॅनडात राहते. याच कारणाने तिथे हिटलरचे उदात्तीकरण होणे, आश्चर्यकारक नाही. पण, लाजिरवाणे नक्कीच आहे.