पर्यावरण शिक्षणात माटोळी

कला आणि संस्कृती खात्याने आपल्या कला दालनात किंवा कला अकादमीच्या कला दालनात निवडक माटोळीच्या छायाचित्रांचे आणि संपादित केलेल्या माहितीचे रूपांतर माहितीपटात करून प्रदर्शन घडवले आणि त्यात बुजूर्ग कलाकार आणि संशोधक यांच्याशी वार्तालाप घडवला तर या साऱ्या मेहनतीचे चीज होईल.

Story: विचारचक्र। प्रा. राजेंद्र केरकर |
26th September, 11:18 pm
पर्यावरण शिक्षणात माटोळी

गोव्यात सध्या गणेश चतुर्थीचा उत्सव साजरा होत असून, या उत्सवाचा अविभाज्य घटक असणाऱ्या माटोळीचे हमखास दर्शन घडत असते. गणेश चतुर्थीच्या उत्सवाचे नाते खरेतर पर्या‌वरण संस्कृतीशी असून आज आपण नानाविविध कृत्यांद्वारे प्रदूषणाला आमंत्रण देऊन आपले जगणे संकटग्रस्त करत आहोत. गणेश चतुर्थीचा उत्सव श्रावण या हिरव्या वैभवाच्या ऋतुराजाच्या महिन्याच्या समाप्तीनंतर भाद्रपदातल्या चतुर्थीपासून साजरा केला जातो. त्यावेळी गोवा - कोकणातला निसर्ग विलक्षण प्रसन्न असतो. माळराने विविधरंगी फुलांच्या उत्सवात सहभागी होतात. पिवळ्या धमक फुलांची छोटेखानी सोनकी जागोजागी इतकी फुललेली असते की, माळरानावर कोवळे ऊन पडल्यावर त्यांचे लावण्य शब्दांपलिकडचे असते. पावसाळ्यात जी बी-बियाणी धरित्रीच्या कुशीत पेरलेली असतात त्यांना फळे, फुले येतात. काकडी, दोडगी, भोपळे, भेंडी अशी भाजी असो अथवा प्राजक्त, केवडा, जास्वंद, चाफा, तगर यासारखी फुले असो किंवा सुरण, काटेकणगी, झाडकणगी, करांदे यासारखे कंद असो यांच्या मोसमाचे वैभव दृष्टीस पडते. आपण जे पेरलेले आहे ते या मृण्मयी धरित्रीच्या कुशीतून उगवले, फळले आणि फुलले. या साऱ्या अन्नाची पैदासी करणाऱ्या धरित्रीविषयीची कृतज्ञता, आदरभाव व्यक्त करण्यासाठी इथल्या लोकमनाने गणेश चतुर्थीत माटोळीचे नियोजन केले आणि त्यात मोसमी फळाफुलांना स्थान दिले.

गोव्यातील माटोळीच्या समृद्ध परंपरेतून पूर्वीच्या काळी त्या त्या भौगोलिक प्रदेशानुसार असलेल्या जैविक संपदेच्या वैविध्यपूर्ण घटकांचे दर्शन व्हायचे. गोव्याच्या सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या सांगे, सत्तरी, धारबांदोडा आणि काणकोण तालुक्यांना जंगलांची श्रीमंती लाभल्याने तेथील माटोळीत वनौषधी आणि मानवी जीवनात उपयुक्त ठरलेल्या वृक्षवेली, फुले, फळे तर अंत्रुज आणि अन्य कुळागरे असलेल्या प्रदेशात नारळ, सुपारी, जायफळ, मिरी आदी जैविक संपदेचे घटक दृष्टीस पडतात. युरोप - अमेरिकेच्या प्रांतातून येताना ख्रिस्ती धर्माधिकाऱ्यांनी गोव्यात अननस, सीताफळ, रामफळ, मिरची, बटाटा, टोमॅटो, चिकू आदी घटक आणले आणि त्यांची लागवड कुळागरांत केल्याने आज ही सारी संपदा आपल्याकडच्या माटोळीचे सौंदर्य वृद्धिंगत करण्यास कारणीभूत ठरलेली आहेत. इथली कृषीची परंपरा आज झपाट्याने मागे पडत असल्याने खोचरी, दामगो, बेळो, कोरगुट, शिट्टो यासारख्या या मातीतल्या भाताच्या प्रजाती विस्मृतीत जाण्याच्या वाटेवर आहेत. पूर्वी शेतातल्या नव्या कणसांनी परिपक्व झालेल्या भाताच्या लोंब्यापासून गणपतीच्या माटोळीत झेलो विराजमान केला जायचा. नवे धान्य आपल्या जेवणात वापरण्याऐवजी ते गणपतीला अर्पण करण्यात कष्टकरी धन्यता मानत असे. निसर्गाच्या सान्निध्यात जीवन जगण्याच्या इथल्या समाजाला परिसरातल्या वनस्पतींनी अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजांची पूर्तता करण्याबरोबर वनौषधीची रसद पुरवली होती. आज चवदार, पौष्टिक म्हणून नावारूपास आलेल्याच मोजक्याच वनस्पतींचा वापर आम्ही दैनदिन जीवनात करत असून, बाकीच्या वनस्पतींपाशी औषधी आणि उपयुक्ततेचे गुणधर्म असताना त्यांच्या वापराकडे समाजाचे दुर्लक्ष व्हायचे. त्यासाठी औषधी, विषारी गुणधर्म असलेल्या वनस्पतीच्या ज्ञानाचा वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पोहचावा म्हणून माटोळीच्या परंपरेतून लोकशिक्षण केले जाऊ लागले. गोवा सरकारच्या कला आणि संस्कृती त्याचप्रमाणे गोवा कला अकादमी यांनी गोव्यातल्या पर्यावरणीय संस्कृतीशी नाते सांगणाऱ्या या परंपरेला उजाळा दिलेला आहे. लोकविज्ञानाचा वारसा चालावा म्हणून माटोळी फुलाफळांनी सजवून गणेश चतुर्थी साजरी केली. गोव्यात माटोळीतल्या समृद्ध अशा लोकविज्ञानाचा वारसा पुढे नेण्यात साटरेतील दीपक धानू गावकर, कुर्टी-फोंडा येथील श्रीकांत पंढरी सतरकर, वेलकास येथील शैलेश गिरोडकर, पैंगिण येथील रूपेश पैंगिणकर, माळोली येथील अंकुश राम ओझरकर, खेतोडा येथील रंगनाथ गावकर, प्रियोळ येथील दत्ता नाईक, माशेतील अजय सतरकर, नेतुर्ली येथील महादेव गावकर यांनी कला आणि संस्कृती खात्याच्या स्पर्धेत महत्त्वाचे योगदान दिलेले आहे. बांदोडा येथील तानाजी गावडे, पिळये येथील देऊ शेटकर, पैंगिणीचे गजानन बांदेकर यांचा या स्पर्धेतला सहभाग लक्षणीय ठरलेला आहे.

गोवाभर असलेल्या विद्यालये आणि महाविद्यालयांनी लोकविज्ञानाचा हा वारसा प्रतिकुल परिस्थितीशी सामना करत जतन करून ठेवलेल्या वनौषधीकार, निसर्गप्रेमी, शेतकरी, बागायतदार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन तो समजून घेत संकलित करण्याची नितांत गरज आहे. आज आपले जीवन प्रदूषित अन्न, पाणी, औषधे, हवा यामुळे नाना तऱ्हेच्या विकारांची शिकार ठरलेले आहे. रूपेश पैंगिणकर, दीपक धानू गावकर, महादेव गावकर, शैलेश गिरोडकर, श्रीकांत सतरकर आदी मंडळीची गणेश चतुर्थीतली माटोळी लोकविज्ञानाच्या माहितीचा अपूर्व असा खजिना असायचा. आज गोवा सरकारच्या उच्च शिक्षण खात्याच्या संचालकपदी विराजमान असलेले प्रसाद लोलयेकर यांनी आपण कला आणि संस्कृती खात्याच्या प्रमुखपदी असताना या स्पर्धेला तेजोवलय मिळवून दिले होते. त्यांनी माटोळीची ही परंपरा महाविद्यालयीन प्राध्यापक, विद्यार्थी आणि संशोधकांत रुजवण्यासाठी, समजून घेण्यासाठी प्रोत्साहित केले तर स्पर्धेच्या मूळ आयोजनाचा हेतू सफल होईल.

कला आणि संस्कृती खात्यातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या माटोळी स्पर्धेच्या माध्यमातून आजतागायत जीव ओतून आणि आत्मियतेने माटोळीला कलात्मकरित्या समूर्त करणाऱ्या राज्यभरातल्या लोककलाकारांच्या कलाकृतींचा फार मोठा खजिना गोळा झालेला असेल. खरेतर खात्याने आपल्या कला दालनात किंवा कला अकादमीच्या कला दालनात निवडक माटोळीच्या छायाचित्रांचे आणि संपादित केलेल्या माहितीचे रूपांतर माहितीपटात करून प्रदर्शन घडवले आणि त्यात बुजूर्ग कलाकार आणि संशोधक यांच्याशी वार्तालाप घडवला तर या साऱ्या मेहनतीचे चीज होईल. वन्यजीव सप्ताहाच्या आगेपिछे अशा स्वरूपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करून विद्यालये आणि महाविद्यालये यांना सहभागी करून घेतले तर ते योग्य होईल. कला आणि संस्कृती खात्यातर्फे आयोजित या राज्य स्पर्धेला दरवर्षी काही मोजकीच मंडळी सहभागी होत असून त्यांच्या कलाकृतींतून प्रतिभेचे आणि व्यासंगाची प्रचिती मिळते. प्रदर्शन, वार्तालापाद्वारे त्याचा लाभ व्यापक पातळीवर मिळण्याची शक्यता आहे.