आयआयटीसाठी सांगेत १० लाख चौ.मी. जागा संपादित : सुभाष फळदेसाई

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
26th September 2023, 04:07 pm
आयआयटीसाठी सांगेत १० लाख चौ.मी. जागा संपादित : सुभाष फळदेसाई

पणजी : राज्य सरकारने आयआयटी स्थापन करण्यासाठी सांगे तालुक्यात १० लाख चौरस मीटर जमीन संपादित केली आहे. आयआयटी सांगेतच स्थापन करण्याचे निश्चित झाले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत महिनाभरात तशी अधिकृत घोषणा करतील, अशी माहिती पुराभिलेख खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी आज दिली.

पायाभरणीचा मुहूर्त सांगणे सध्या शक्य नाही. पण आयआयटी उभारण्याविषयीची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. या प्रकल्पासाठी निवडलेली नवीन जागा योग्य आहे, असेही मंत्री फळदेसाई यांनी म्हटले आहे. यापूर्वी प्रकल्पासाठी सांग्यात एक जाग निवडण्यात आली हाती. मात्र, तेथे लोकांचा विरोध होता. त्या जागेवर पोलीस संरक्षणात जागेचे सर्वेक्षण करण्यात आले होते. तेव्हाच लोकांनी विरोध केला म्हणून ती जागा रद्द झाली नव्हती. पण, निवडलेल्या जागेतील ४ लाख चौरस मीटर जागा डोंगराळ होती. त्यामुळे केंद्रीय समितीने ती जागा अयोग्य असल्याचे स्पष्ट केले. मात्र, आता सरकारने नवीन जागा निवडली आहे. ती जागा सरकारच्याच ताब्यात आहे. या जागेविषयी मुख्यमंत्री डॉ. सावंत अधिकृत घोषणा करतील. त्यानंतर प्रकल्प उभारण्याच्या प्रक्रियेला गती येईल, असे मंत्री फळदेसाई यांनी म्हटले आहे.