२७ रोजी पाेहोचणार भारतात : हैदराबाद येथे सुरुवातीचे सामने
कराची : भारतात क्रिकेट विश्वचषक सुरू होणार असून या स्पर्धेतील पहिला सामना ५ ऑक्टोबर रोजी होणार आहे. दरम्यान, पाकिस्तान संघाला भारतात येण्यास मान्यता मिळाली असून भारत सरकारने पाकिस्तानी संघाला व्हिसा दिल्याची पुष्टी आयसीसीने केली आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने व्हिसा न मिळाल्याने आयसीसीकडे नाराजी व्यक्त केली होती. पाकिस्तानला २९ सप्टेंबरला पहिला सराव सामना खेळायचा आहे. त्याआधी टीमला २७ सप्टेंबरला हैदराबादला पोहोचायचे होते. मात्र पाकिस्तानी संघ आणि त्यांच्या सपोर्ट स्टाफला व्हिसा मिळाला नव्हता. मात्र, सोमवारी सायंकाळी उशिरा व्हिसा मंजूर झाला. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रवक्ते ओमर फारूक यांनी दिलेल्या माहितीनुसार, बोर्डाने आयसीसीला पत्र लिहून वर्ल्ड कपसाठी व्हिसा मिळण्यात येणाऱ्या अडचणींबाबत चिंता व्यक्त केली होती.
पीसीबीने निवेदनात म्हटले आहे की, सर्वात मोठ्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पाकिस्तानी संघाला नाहक अडचणींचा सामना करावा लागत आहे, हे अतिशय दुःखद आहे. पीसीबीने सांगितले की, सराव सामन्यापूर्वी आम्हाला आमची योजना पूर्णपणे बदलावी लागली, कारण खेळाडूंना व्हिसा मिळाला नव्हता.
पाकिस्तान क्रिकेट संघाला सुरुवातीला दुबईत रहायचे होते आणि नंतर ते भारताकडे रवाना हाेणार होते. पण भारताकडून व्हिसा न मिळाल्याने पाकिस्तानला आपली योजना रद्द करावी लागली आणि पुन्हा संपूर्ण नवीन योजना आखावी लागली. पाकिस्तानला आपले दोन सराव सामने आणि दोन सुरुवातीचे साखळी सामने हैदराबादमध्येच खेळायचे आहेत, त्यामुळे आता संघ थेट हैदराबादलाच येणार आहे.