आशियाई क्रिडा स्पर्धेत पटकावले सुवर्ण पदक
हांगझोऊ : भारतीय महिला क्रिकेट संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेटमध्ये सुवर्ण पदक जिंकून इतिहास रचला. अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा १९ धावांनी पराभव करून ही ऐतिहासिक कामगिरी केली. याआधी महिला संघाने गेल्या वर्षी राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक पटकावले होते.
भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर फलंदाज शेफाली वर्मा १५ चेंडूत ९ धावा करून बाद झाली. यानंतर स्मृती मंधाना आणि जेमिमाह रॉड्रिग्ज यांनी दुसऱ्या गड्यासाठी ७३ धावांची भागीदारी करत धावसंख्या ८९ धावांपर्यंत नेली. मंधाना ४५ चेंडूत ४६ धावा करून बाद झाली. तिने ४ चौकार आणि एक षटकार मारला. मात्र, अखेरच्या ५ षटकांमध्ये भारतीय फलंदाजांना काही खास करता आले नाही. भारतीय संघ शेवटच्या ३० चेंडूत केवळ २७ धावाच करू शकला. जेमिमा रॉड्रिग्जने ४० चेंडूत ४२ धावांचे याेगदान दिले. श्रीलंकेतर्फे रणसिंगे, सुगंधिका कुमारी आणि कर्णधार अट्टापटू यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.
१८ वर्षीय भारतीय वेगवान गोलंदाज तीतास साधूने भारतीय संघाला शानदार सुरुवात करून दिली. तिने पहिल्या षटकात २ आणि दुसऱ्या षटकात १ गडी बाद केला. त्यामुळे श्रीलंकेचा संघ बॅकफूटवर आला. आक्रमक फलंदाज आणि श्रीलंकन संघाची कर्णधार चमारी अट्टापटू हिने चांगली सुरुवात केली, मात्र ती १२ चेंडूत १२ धावा करून साधूची शिकार ठरली. यानंतर हसिनी परेराने २२ चेंडूत २५ धावा करत धावसंख्या ५० धावांवर नेली. हसिनी धोकादायक ठरत असताना तिला डावखुरी फिरकीपटू राजेश्वरी गायकवाडने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
श्रीलंकेला शेवटच्या ५ षटकात विजयासाठी ४३ धावा करायच्या होत्या आणि त्यांचे ६ गडी शिल्लक होते. तीतास साधूने १६ वे षटक टाकले आणि फक्त ४ धावा दिल्या. तिने आपल्या पूर्ण ४ षटकांच्या स्पेलमध्ये केवळ ६ धावा दिल्या आणि 3 बळी घेतले. १७ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर पूजा वस्त्राकरने निलाक्षी डिसिल्वारला क्लिन बोल्ड केले. डिसिल्व्हाने ३४ चेंडूत २३ धावा केल्या. मात्र, ओशादी रणसिंगने संघर्ष सुरूच ठेवला आणि षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर चौकार मारला. या षटकात एकूण ६ धावा मिळाल्या. श्रीलंकेला शेवटच्या १८ चेंडूत ३३ धावांची गरज होती. ऑफस्पिनर दीप्ती शर्माने डावातील १८ वे षटक टाकले. तिने चौथ्या चेंडूवर ओशादीची महत्वाची विकेट घेतली. ओशादीने २६ चेंडूत १९ धावा केल्या. या षटकात केवळ ३ धावा मिळाल्या. लेगस्पिनर देविका वैद्यने १९ व्या षटकात गोलंदाजी केली. तिने फक्त ५ धावा दिल्या आणि एक गडी बाद केला. श्रीलंकेला शेवटच्या षटकात २५ धावा हव्या होत्या राजेश्वरी गायकवाडने केवळ ५ धावा देत एक गडी बाद केला आणि भारतीय संघाने इतिहास रचला.
गेल्या वर्षी रौप्यपदक जिंकले
२०२२ च्या बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समध्ये प्रथमच महिला क्रिकेटचा समावेश करण्यात आला. भारतीय महिला संघ अंतिम फेरीत स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला, पण भारताला ऑस्ट्रेलियाकडून ९ धावांनी पराभव पत्करावा लागला. न्यूझीलंडला कांस्यपदक मिळाले. १९९८ मध्ये पुरुष क्रिकेटला कॉमनवेल्थ गेम्समध्ये स्थान मिळाले. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेला सुवर्णपदक आणि ऑस्ट्रेलियाला रौप्यपदक मिळाले. न्यूझीलंड संघ कांस्यपदक जिंकण्यात यशस्वी ठरला.
खेळांमध्ये महिला क्रिकेट तिसऱ्यांदा
आशियाई स्पर्धेत तर क्रिकेटचा तिसऱ्यांदा समावेश करण्यात आला. यापूर्वी २०१० आणि २०१४ मध्येही क्रिकेटला आशियाई क्रीडा स्पर्धेत स्थान मिळाले होते. परंतु दोन्ही वेळा भारतीय पुरुष आणि महिला संघांनी यात भाग घेतला नव्हता. २०१० आणि २०१४ मध्ये पाकिस्तानने महिला गटात सुवर्णपदक जिंकले होते. बांगलादेशला रौप्य तर जपानला कांस्यपदक मिळाले. २०१४ मध्ये पुन्हा एकदा बांगलादेश संघ अंतिम फेरीत पराभूत होऊन रौप्यपदक जिंकण्यात यशस्वी ठरला होता. श्रीलंकेला कांस्यपदक मिळाले.