अणिमादिक सिद्धींची प्राप्ती...

योग्याला असे स्वरूप प्राप्त झाले की त्याचे वेगवेगळे चमत्कार लोकांना दिसायला व जाणवायला लागतात. तो समोरून वेगाने जाताना लोकांना दिसत नाही, पण त्याच्या पाऊलखुणा उमटलेल्या दिसतात. त्याला अणिमादिक सिद्धी प्राप्त झालेल्या असल्याने असे अनेक चमत्कार त्याच्याबाबतीत घडताना लोकांना दिसून येतात.

Story: विचारचक्र। मिलिंद कारखानीस |
24th September, 09:15 pm
अणिमादिक सिद्धींची प्राप्ती...

युञ्जन्नेवं सदात्मानं योगी नियतमानस:।      

शान्तिं निर्वाणपरमां मत्संस्थामधिगच्छति ।।१५।।      

सरळ अर्थ :  याप्रमाणे आत्म्याला निरंतर परमेश्वराचे स्वरुपी लावणारा व स्वाधीन मनाचा योगी माझ्या ठिकाणी स्थित होणे ही परमानंदाची पराकाष्ठा अशी शांती प्राप्त करून घेतो.      विस्तृत विवेचन :  गेल्या लेखात ६ व्या अध्यायातल्या विस्तृत विवेचनात जागृत झालेल्या कुंलिनीच्या योगे योग्याच्या शरीरातील नाद-बिंदू-कला-ज्योती सगळे हरपून जाणे, प्राण-अपान यांच्यावर नियंत्रण येऊन संपूर्ण ध्यानही लय पावणे, कल्पनेचे सर्व व्यापार थांबणे व सगळी पंचमहाभूते आटून जाणे अशी स्थिती निर्माण होऊन पिंडाकडूनच पिंडाचा लय होतो -  इथपर्यंत आपण आलो होतो. या पद्धतीने आपल्याला आदिनाथाने (म्हणजे शिवतत्वाने, संतमहात्म्यांच्या माध्यमातून) योगमार्गाच्या गूढार्थाकडून यथार्थाकडे आणले.      आता या वरील चौदाव्या श्लोकाच्या विस्तृत विवेचनात परमानंदाच्या पराकाष्ठेचे (म्हणजे त्या स्थितीच्या वैशिष्ट्याचे) त्यांना ज्ञात असलेले काही नमुने संतश्रींनी नमूद केले आहेत ते वाचण्यासारखे आहेत, म्हणून इथे प्रस्तूत केल्याशिवाय राहवत नाही.      

ते म्हणतात की, मानवी शरीरात जी चैतन्यशक्ती आपल्या सगळ्यांना जाणवते तिचे तेज लीन झाल्यानंतर (लोप पावणे नव्हे; लीन होणे; शरीरात असूनच परब्रह्मामधे लीन होणे) पहिला मुख्य बदल काय होत असेल तर तो म्हणजे देहाचा आकार हारपून जातो. साहजिकच मग तो देह इतरांच्या (म्हणजे लोकांच्या) दृष्टीस अगोचर होतो. म्हणजे चक्क दिसेनासा होतो! एरव्ही ते शरीर असते पूर्वीसारखेच, पण ते हवेच असल्यासारखे वाटते! जणू काही हवेला हातपाय असावेत असे ते शरीर होते. त्याला, आकाशात संचार करणे सहजपणे शक्य होते म्हणून, खेचर असे म्हणतात. योग्याला असे स्वरूप प्राप्त झाले की त्याचे वेगवेगळे चमत्कार लोकांना दिसायला व जाणवायला लागतात. तो समोरून वेगाने जाताना लोकांना दिसत नाही, पण त्याच्या पाऊलखुणा उमटलेल्या दिसतात. त्याला अणिमादिक सिद्धी प्राप्त झालेल्या असल्याने असे अनेक चमत्कार त्याच्याबाबतीत घडताना लोकांना दिसून येतात. त्या सिद्धी आठ आहेत असे म्हणतात. त्यांची माहिती अशी -       

१. अणिमा सिद्धी म्हणजे शरीर अत्यंत सूक्ष्म होणे.      

२. महिमा सिद्धी म्हणजे शरीर मोठे व्यापक होणे.      

३. लघिमा सिद्धी म्हणजे शरीर वजनाने हलके होणे.      

४. प्राप्ती सिद्धी म्हणजे सर्व प्राण्यांच्या इंद्रियांशी त्या त्या इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवतांच्या रूपाने संबंध घडणे.                

५. प्राकाश्य सिद्धी म्हणजे परलोकांतील अदृश्य विषयांचेही ज्ञान होणे.      

६. ईशिता सिद्धी म्हणजे शक्तीची, मायेची व तिच्या अंशाची ईशाच्या ठिकाणी व इतरांच्या ठिकाणी असणारी प्रेरणा ताब्यात येणे; सत्ता, प्रभाव, कर्तुमकर्तुमन्यथाकर्तुम सामर्थ्य.      

७. वशिता सिद्धी म्हणजे विषय भोगीत असूनही त्यांच्या ठिकाणी आसक्त न होणे.      

८. प्राकाम्य किंवा कामावसायिता सिद्धी म्हणजे ज्या ज्या सुखाची इच्छा करावी ते ते सुख अमर्याद प्राप्त होणे. (आपल्या प्राचीन इतिहासात नारद मुनी, अनेक ऋषी, मारुती, इत्यादींना तसेच अर्वाचीन इतिहासात श्रीआदिशंकराचार्य, संतश्री ज्ञानेश्वर महाराज, दत्तावतार श्रीपाद श्रीवल्लभ, नृसिंहसरस्वती, श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी, संतश्री रामदास स्वामी, शेगावचे श्री गजानन महाराज, इत्यादी प्रभृतींना यातल्या सिद्धी प्राप्त असल्याच्या नोंदी आहेत.)      

अर्थात या सिद्धींचे आपल्याशी अर्थाअर्थी काही घेणे देणे नसल्याने त्या आपण सध्या बाजूला सारू आणि त्या साधकांत - योग्यात पुढे आणखी परिवर्तन काय व कसे घडते ते पाहू. वर म्हटल्याप्रमाणे त्याच्या शरीरातील पृथ्वी आप व तेज ही तत्वे त्या देहातच जिरून जातात. त्यांची साठवण वायुतत्वात होते आणि तो एकच वायू देहाकार होऊन राहतो. पुढे तोही मस्तकातील आकाशात पूर्णतया लीन होतो. आता त्या शक्तीचे कुंडलिनी हे नाव लोप पावून तिला "मारुत शक्ती" हे नाव प्राप्त होते. पुढे ती शक्ती शरीरात वर वर जायला लागते. जालंधर बंधाचे विशुद्धचक्र ओलांडून आज्ञाचक्र गाठते. पुढे तेही चक्र ओलांडून ब्रह्मरंध्राच्या अलिकडील अर्धमात्रेला वळसा घालून चिदाकाशांत मिसळून मग ब्रह्मरंध्रांत स्थिरावते आणि शेवटी तिथून ती परब्रह्माच्या मिठीत सामावते.      

आकाशासकट पंचमहाभूतांच्या अशा त्या पूर्ण अभावात तिथे एकच शिव-शक्ती भरून राहिलेली असते जी मानवी इंद्रियांना गोचर नाही. जसे समुद्रापासून मेघरूपाने पाणी वेगळे होऊन तेच नदीच्या रूपाने जसे परत सागरास जाऊन मिळते, तसेच अर्जुना इथे पिंडाच्या मिषाने शिवच शिवात पुनर्प्रवेश करतो. जे दोन होते ते आता स्वतः सिद्ध असे एकच झाले. त्याला साक्षी कोण असू शकणार? मस्तकातील आकाशाचा चिदाकाशी लय होणे अशी ही जी स्थिती असते तीच ब्रह्मस्थिती होय हे तू निश्चितपणे समज आणि सिद्धयोगी हीच स्थिती नित्य भोगत असतो, म्हणजे अनुभवत असतो. ही गोष्ट किंवा घडणूक संवादाच्या कक्षात बसत नाही. कारण ती मुळातच शब्दातीत आहे. अभिप्राय निवेदण्याचा अभिमान धरणारी वैखरी या ब्रह्मस्थितीपासून साहजिकच सर्वथैव दूर असते. प्राण शून्यात मिसळतो आणि ते शून्य महा-शून्यात पूर्णपणे आटून जाते. मग अशा त्या महा-शून्याच्या डोहात जिथे शून्याचीही वार्ता नाही तिथे शब्दाची उत्पत्ती आणि तो ऐकण्याची क्रिया यांना वाव कुठून असणार? तिथे सगळे अनिर्वाच्य. म्हणून कानी येईल अथवा शब्दात सापडेल असे ब्रह्मस्थितीमध्ये काहीही नसते हे त्रिवार सत्य होय. म्हणून दैवयोगाने जेव्हा स्वानुभवे अशी ब्रह्मस्थिती प्राप्त होईल तेव्हा तदाकार होणे असेच आपण थोडक्यात समजायचे. अशी तद्रूपता प्राप्त झाल्यावर मग पुढे आकलन वा जाणणे ही प्रक्रिया रहातच नाही. विचार, संकल्प, शब्द, ऐकणे, या सगळ्यांचे आयुष्यच तिथे संपते.