मंगलमूर्ती श्रीगणराया

गणेशचतुर्थी हिंदूचा आवडता सण. लाेकमान्य टिळकांनी त्याला उत्सवाचे स्वरुप दिले. गणेशाच्या आगमनाची सगळेच आतुरतेने वाट पहात असतात.

Story: लोकसंस्कृती | पिरोज नाईक |
24th September, 03:20 am
मंगलमूर्ती श्रीगणराया

श्रावण महिना सुरु झाला की सगळेच जणू त्याच्या स्वागताला सज्ज हाेतात. मानवाबराेबर निसर्ग देखील बाप्पाच्या आवडीच्या वस्तुंची निर्मिती करत असताे. निसर्ग निर्मित पत्री, फळे, फुले माटाेळीसाठी रानफळे सज्ज हाेतात. गृहीणी धुवून-पुसून सारे घर स्वच्छ करते. साेवळे आेवळे सुरु हाेते. चतुर्थी जवळ आली की सुगरण मेवा-मिठाई बनवण्यात गर्क हाेते. बाप्पासाठी लाडू माेदक, करंजा; तर बाप्पाच्या दर्शनासाठी येणाऱ्यांना शेव, चिवडा, चकल्या, शंकरपाळ्या बनवल्या जातात. बाप्पाबराेबरच पै-पाहुण्याच्या आगमनाचीही प्रत्येकजण आतुरतेने वाट पहात असताे. मखर सजावट, माटाेळी, रांगाेळी, पुजा साहित्य, घुमट आरती याबराेबरच दारी आलेल्यांची सरबराई ठेवण्यात पुरुषवर्ग गढून जाताे.

दीड दिवसाचा गणपती पण केवढी गडबड-घाई. माटाेळीसाठी तर प्रत्येक व्यक्ती जास्तीत जास्त साहित्य एकत्र करण्यात गुंतलेली असते. केळी, सुपाऱ्या, पेरु, चिकू, अननस इत्यादी बागायती फळे तर कांगला, माट्टा, घागऱ्या यासारखी रानफळे माटाेळीसाठी; हरणे, बेल, शर्वडा, चिड्डाे, हळदीचे पान गाैरीसाठी. बाप्पाच्या नैवेद्यासाठी लाडू माेदक, करंजा; तर गाैरीसाठी खास सुरण, टाकळा, शेवगा, कुड्डकी, अळू यासारख्या रानटी भाज्या. एकूण काय तर आपल्या कृषीप्रधान संस्कृतीत वर्षातून एकदा येणाऱ्या गणपतीसाठीच्या केलेल्या नैवेद्याचा थाटमाट.

ज्या सुपीक जमीनीच्या गाळापासून एका बी पासून अनेक बिया निर्माण करणाऱ्या वर्षभर पाेटाची ददात मिटवणाऱ्या चिखलाबद्दल आदरभावना व्यक्त करणार हा उत्सव आदीमाता पार्वती म्हणजे पर्वत कन्या. पार्वतीमातेच्या मळापासून निर्माण केलेले हे बाळ अशी श्री गणेशाची आख्यायिका आहे. गणेशोत्सवाची सुरवात भाद्रपद शु. तृतीयेपासून होते. या दिवसाला हरतालीका, असे म्हणतात. गोव्यामध्ये याला ‘तय’ असेही म्हणतात. यादिवशी गौरीपूजन करतात. महादेव-पार्वती पूजेला लावतात. गौरीकडे ‘वाण’ ठेवून अखंड सौभाग्यदान मागतात. त्यादिवशी सुहासिनी संपूर्ण दिवस उपवास करतात.

दुसऱ्या दिवशी गणेशचतुर्थी म्हणजे बुद्धीची देवता, कलांचा अधिपती यांच्या आगमनाचा दिवस. तिसरा दिवस ऋषिपंचमी याला ‘नव्याची पंचमी’ असेही म्हटले जाते. यादिवशी शेतात पिकलेले धान्य आणून त्याची पूजा करतात व ते दाणे घालून ‘पायस’ बनून देवाला नैवेद्य दाखवतात. त्याचप्रमाणे ऋषिमुनींनी आपल्याला दिलेल्या योगदानाबद्दलही त्यांच्या आठवणी प्रित्यर्थ हा दिवस ऋषिपंचमी या नावाने साजरा केला जातो. यादिवशी ऋषीच्या आवडीच्या कंदमुळांचा नैवेद्य करून श्री गणेशाला अर्पण करण्याची प्रथा आहे.