कवी आणि निसर्ग

Story: ललित | प्रतिभा कारंजकर |
23rd September, 03:12 am
कवी आणि निसर्ग

निसर्गातल्या कितीतरी अद्भूतरम्य अशा गोष्टी पाहून आपल्या मनाला त्याची भुरळ पडल्याशिवाय रहात नाही. साध्यासुध्या माणसालाही मनातून एक सुकून प्राप्त होतो. त्याच्याही नकळत त्याचं मन बेभान होऊन कधी गहिवरतं तर कधी रोमांचित होतं कधी आश्चर्याने चकित होतं. कवी मनाला तर निसर्ग म्हणजे त्याचं प्रेरणा स्थान. निसर्गातला ऋतु बदल, समुद्राची गाज, शीतल वायूलहरी, हिरवागार गालिचा ल्यालेली धरणीमाता, ढगाआडून डोकावणारा चंद्र, कोसळता धबधबा, झुळझुळ वाहणारे झरे, उमलती फुले, वाऱ्यासवे डोलणारी हिरवीगार शेते, सूर्यास्त असो की सूर्योदय - त्याचा रक्तवर्णीय लालिमा, इंद्रधनुष्याची सप्तरंगी बरसात, आकाशी चंद्रासवे ताऱ्यांची वरात, अशा किती तरी गोष्टी कवीचं हळवं मन टिपकागदासारखं टिपून घेत असतात आणि त्याच्या कवी मनातून काव्याची कमळे उमलतात. ती काव्याच्या प्रांगणात उत्स्फूर्तपणे उतरून लोकांच्या मनावर राज्य करतात. असा कवी एखादाच होऊ शकतो. आकाशातल्या आषाढ महिन्यातील काळ्या मेघाकडे पाहून कालिदासाला मेघदूत हे महाकाव्य सुचले. बालकवीसारखा कवी तर निसर्गात इतका रममाण होतो की तो निसर्गकवीच म्हणवला जातो.

साहित्यात मुख्यत्वे करून काव्य या प्रकारात निसर्गाने नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावली आहे. भावना व्यक्त करण्यासाठी कवी नेहमीच निसर्गाचा वापर करून ते आपल्या मनावर ठसवण्याचा प्रयत्न करताना दिसतात. कविता म्हणजे भावनांचा आरसा असतो. निसर्गाचं रुपक वापरुन मनाची स्थिती सांगण्याची कला कवीच्या काव्यात असते. प्रेम, कविता आणि निसर्ग एकमेकांशी अगदी संलग्न असे असतात. प्रेमात माणसाच्या मनाची हळवी व्यथा किंवा कथा दोन्हीही काव्यातून मांडली गेली की ऐकणाऱ्याच्या मनाला भिडते. “श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे” ही ओळ ऐकली तरी नजरेसमोर उभा राहतो तो श्रावणाचा हिरवागार निसर्ग. मग तो ग्रीष्म असो की शरद. त्या शब्दात ते चित्र उभं करायची ताकद आहे. “आनंदी आनंद गडे” ही कविता पाहिली तर कवीला मोद म्हणजे आनंद हा सगळीकडे भरून राहिलेला दिसतो. सोनेरी किरण, संध्या, अशा किती एक गोष्टी पाहून कवीला गान स्फुरले असं ते कबूल करतात. मंदसे वाहणारे निर्झर, डोलणारी वृक्ष लतिका, कुंजन करणारे पक्षी पाहून तिथे मग गीत लिहायची उर्मी मनात उठते. अशा वेळी फक्त आनंद हीच भावना असते. द्वेष, मत्सर, राग, लोभ सारे विकार नाहीसे होतात.

पाऊस हा तर सर्वांच्या मनावर अधिराज्य करणारा. त्या वेळी जशा जमिनीवर जागोजागी भूछत्री उगवतात तसे अनेक कवी निर्माण होताना दिसतात. पावसाचं येणं, बरसणं, निसर्गाचा कायापालट हे सारे काव्य स्फुरण्यासाठी टॉनिक ठरतं. कवी आणि पाऊस दोघेही सृजनशील. म्हणूनच पाऊस आणि कवी यांचं अतूट नातं. पाऊस हे सृजनाचे प्रतीक तर कवी हा सृजनाचा निर्माता आणि या दोघांचे नाते दृढ करणारा घटक म्हणजे निसर्ग. पाऊस थेंब, मातीचा मंद सुवास अशा आकस्मिक पावसाच्या आगमनाने कवी मनाला घुमरे फुटतात. मनाच्या अंगणी अवतरलेलं कागदावर उतरवावं ही मनाची उन्मेष भावना जागृत होते. 

निसर्ग आपल्या अवतीभोवती चराचरात भरून राहिला आहे. त्याच्याकडे नीट निरखून पाहिलं की तो आपल्या मनात उतरतो. आपण त्याच्याशी तादात्म्य पावतो. सुगरण पक्ष्याने काडी काडी गुंफून बनवलेलं घरटं बघून बहिणाबाईंच्या मुखातून “अरे खोप्यामधी खोपा सुगरणीचा चांगला, पहा पिल्लासाठी तिनं झोका झाडाला टांगला” अशा ओळी आपोआप स्फुरतात.  शेतातून राबताना बहिणाबाईंना स्फुरलेली ‘धरित्रीच्या कुशीमधे’ ही कविता म्हणजे निसर्गाला त्यांनी घातलेली सादच होय. निसर्गातील अनुपम सौंदर्य चैतन्यपूर्ण भासू लागतं. त्यातील रंग, गंध, नाद, रूप यांच्याशी मनाची एकतानता होऊन जाते. जसा वर्डस्वर्थच्या कवितेत निसर्ग ठायी ठायी दिसून येतो. त्याची त्याने अध्यात्माशी सांगड घातलेली दिसते. तर बालकवीची कविता म्हणजे निसर्ग चित्राचं रेखाटन असतं. मनाच्या भावना त्यातून प्रकट होताना दिसतात.