‘गोवन वार्ता’चा दणका! चोराशी डील करणाऱ्या कॉन्स्टेबलचे तातडीने निलंबन

आधी जीआरपीमध्ये केली होती बदली; अधिवेशनात बातमी झळकताच निलंबनाचा आदेश जारी

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
10th August 2023, 01:15 pm
‘गोवन वार्ता’चा दणका! चोराशी डील करणाऱ्या कॉन्स्टेबलचे तातडीने निलंबन

पणजी : चोराशी डील करून उत्तर गोव्यात चोरी करण्यासाठी दक्षिणेतील पोलीस कॉन्स्टेबलने प्रोत्साहन दिल्याचे वृत्त ‘गोवन वार्ता’ने गुरुवारी प्रसिद्ध करताच त्याचे पडसाद विधानसभा अधिवेशनातही उमटले. त्यानंतर लगेच पोलीस कॉन्स्टेबल विकास कौशिक याला निलंबित करण्याचा आदेश डीजीपी जसपाल सिंग यांनी जारी केला. दरम्यान, या कॉन्स्टेबलला दोन आयपीएस अधिकाऱ्यांचे छत्र लाभले आहे. ते आयपीएस अधिकारी कोण, यावर आता चर्चा सुरू आहे.


मूळ बातमी, वाचा इथे

पोलिसाची चोराशी डील; म्हणाला, ‘उत्तर गोव्यात चोऱ्या करून मला हिस्सा दे’

 फैझान सय्यद या चोरट्याला १ ऑगस्ट रोजी न्हावेली-साखळी येथे डिचोली पोलीस व क्राईम ब्रांचच्या पथकाने चोरी करताना रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर विकास कौशिक याचे नाव समोर आले. विकासने उत्तर गोव्यात चोरी करून त्यातील हिस्सा देण्याचे डील केले होते, असा जबाब सय्यदने तपास अधिकाऱ्यांना दिला होता. चोरट्याने कॉन्स्टेबलचे नाव उघड केल्यानंतर ७ ऑगस्ट रोजी पोलीस मुख्यालयातून अधीक्षक नेल्सन अल्बुकर्क यांनी आदेश जारी करून विकासची बदली जीआरपीमध्ये केली होती.


दरम्यान, विकासचे गुन्हेगारांशी चांगले संबंध आहेत. तसेच त्याला दोन आयपीएस अधिकाऱ्यांचे छायाछत्र लाभले आहे. त्यामुळे जेव्हा एखाद्या गुन्ह्यात त्याचे नाव यायचे तेव्हा त्याची बदली जीआरपीमध्ये केली जायची. अशाप्रकारे यापूर्वी दोन वेळा त्याची जीआरपीमध्ये बदली करण्यात आली होती. विशेष म्हणजे, प्रकरण थंड झाले की पुन्हा तो कॉन्स्टेबल म्हणून सेवेत यायचा. अशाप्रकारे कोलवा, फातोर्डा आणि मडगाव टाऊन या पोलीस स्थानकांमध्येच हा कॉन्स्टेबल सेवा बजावित होता.


याविषयी ‘गोवन वार्ता’ने वृत्त देऊन भांडाफोड केल्यानंतर त्याचे पडसाद विधानसभा अधिवेशनात उमटले. प्रश्नकाळ सुरू होताच आमदार वेंझी व्हिएगस यांनी ‘गोवन वार्ता’चा अंक हातात धरून या विषयाकडे सरकारचे लक्ष वेधले. मात्र, सभापतींनी हा मुद्दा शून्य काळात उपस्थित करावा, अशी सूचना करून त्यांना खाली बसवले. ही घडामोड घडत असतानाच डीजीपी जसपाल सिंग यांनी विकास कौशिकच्या निलंबनाचा आदेश जारी केला. तसेच या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत त्याने जीआरपीमध्ये येऊन हजेरी लावण्याची सूचनाही त्यांनी दिली आहे.