पोलिसाची चोराशी डील; म्हणाला, ‘उत्तर गोव्यात चोऱ्या करून मला हिस्सा दे’

कॉन्स्टेबलची तिसऱ्यांदा जीआरपीमध्ये बदली; दोन आयपीएस अधिकाऱ्यांची लाभलीय छत्रछाया

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
09th August 2023, 05:28 pm
पोलिसाची चोराशी डील; म्हणाला, ‘उत्तर गोव्यात चोऱ्या करून मला हिस्सा दे’

पणजी : दक्षिण गोव्यातील एका कॉन्स्टेबलने चोरीतील ठरावीक हिस्सा देण्याचे निश्चित करून एका चोरट्याला उत्तर गोव्यात चोऱ्या करण्यास प्रोत्साहन दिल्याचे उघड झाले आहे. या प्रकारानंतर पोलीस खात्याने या कॉन्स्टेबलची तिसऱ्यांदा तडकाफडकी जीआरपीमध्ये बदली केली आहे. त्याच्यावर दोन आयपीएस अधिकाऱ्यांची छत्रछाया असल्याने तो कोणालाच दाद देत नसल्याची चर्चा सुरू आहे.

दक्षिण गोव्यातील एक पोलीस कॉन्स्टेबल आणि चोरटा यांनी हिस्सा ठरवून जनतेला लुटण्याचे सत्र सुरू केले होते. मात्र, चोरट्याने तपास अधिकाऱ्यांसमोर गुपित फोडल्यामुळे कॉन्स्टेबल गोत्यात आला. पण, विशेष म्हणजे या कॉन्स्टेबलला दोन आयपीएस अधिकाऱ्यांचे पाठबळ आहे. त्यामुळे निलंबन करण्याऐवजी आता तिसऱ्यांदा त्याची जीआरपीमध्ये बदली करण्यात आली आहे. विकास कौशिक असे या कॉन्स्टेबलचे नाव असून तो फातोर्डा पोलीस स्थानकात सेवेत होता.

संशयित फैझान सय्यद याला १ ऑगस्ट रोजी न्हावेली-साखळी येथे डिचोली पोलीस व क्राईम ब्रांचच्या पथकाने चोरी करताना रंगेहाथ पकडले होते. तो सोनसाखळ्या हिसकावून पळण्यात पटाईत आहे. यापूर्वी संशयिताने दक्षिण गोव्यात खास करून सासष्टीमध्ये बहुतेक गुन्हे केले होते. तपास अधिकाऱ्यांनी जेव्हा त्याची जबाब घेतला, तेव्हा अधिकारीही चक्रावले. ‘एका पोलीस कॉन्स्टेबलने मला उत्तर गोव्यात चोऱ्या कर, असे सांगितले होते. चोरीतील ठरावीक हिस्सा आम्ही वाटून घेत होतो’, अशी माहिती अट्टल चोरटा फैझान याने तपास अधिकाऱ्यांना जबाबात दिली. यात त्या पोलीस कॉन्स्टेबलचे नावही त्याने सांगितले.

वाचा, कॉन्स्टेबलची वादग्रस्त पार्श्वभूमी

* संशयित फैझानने ज्या कॉन्स्टेबलचे नाव घेतले, त्याच्या कारनाम्याच्या ६ ते ७ तक्रारी आधीही आल्या होता. ही माहिती मंत्र्यांनी दिल्यानंतर त्यानी कॉन्स्टेबलला निलंबित करण्याचा आदेश जारी करावा, अशी सूचना दिली होती.

* मंत्र्यांची सूचना येण्यापूर्वीच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्या कॉन्स्टेबलची बदली जीआरपीमध्ये करण्याचा आदेश जारी केला आहे. पण, हा पोलीस कॉन्स्टेबर अजूनपर्यंत जीआरपीमध्ये सेवेत रुजू झालेला नाही.

* या कॉन्स्टेबलची पार्श्वभूमी वादग्रस्तच आहे. गुन्हेगारांशी त्याचे चांगले संधान आहे. हफ्ता, खंडणी प्रकरणातही त्याचे नाव आले होते. यापूर्वी गुंड अन्वर शेख सोबतही त्याचे संबंध होते. सांगे येथे घरफोडी प्रकरणात अन्वरला त्याने सहकार्य केले होते, असे सूत्रांकडून समजते.

* कोलवासारख्या भागात हफ्ते गोळा करण्याचे प्रकरण कॉन्स्टेबलच्या आंगलट आले होते. त्याची या अगोदर दोन वेळा जीआरपीमध्ये बदली झाली होती. कोलवा, फातोर्डा आणि मडगाव टाऊन या पोलीस स्थानकांमध्येच हा कॉन्स्टेबल सेवा बजावित होता.