अवैध मासेमारीवरून अवेडे कोठंबीत वादंग

दोन गटांत बाचाबाची : तलावातील पाणी उपसल्यावरून वाद, पोलिसांकडून स्थिती नियंत्रणात

Story: वार्ताहर। गोवन वार्ता |
29th May 2023, 12:08 am
अवैध मासेमारीवरून अवेडे कोठंबीत वादंग

कुडचडे : अवेडे तलावातून रात्रीच्या वेळी बेकायदेशीरपणे पाणी उपसणे तसेच मासेमारी होत असल्याने अवेडे कोठंबीमध्ये वाद निर्माण झाला. या मुद्द्यावरून गावात दोन गट निर्माण झाले. अवेडे गावातील स्थानिकांनी कोठंबी तलावावर येऊन तलावातील पाणी उपसा बंद केला. वाद मोठ्या प्रमाणात वाढल्याने पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.

अवेडे कोठंबीमध्ये पाणी उपसावरुन स्थानिकांमध्ये वाद निर्माण झाला. एका गटाने अवैधपणे होत असलेला पाणी उपसा बंद केला. तलावातील पाणी उपसण्यासाठी परवानगी घेतली नसल्याचे या गटाचे म्हणणे होते. सुरुवातीला असलेल्या शाब्दीक वादाने मोठे स्वरुप घेतले. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले.

कुडचडे पोलीस निरीक्षक वैभव नाईक आणि नंतर पोलीस उपविभागीय अधिकारी नीलेश राणे यांनी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोन्ही गटांना समजावत परिस्थिती नियंत्रणात आणली.

एक वर्षापूर्वी जिल्हा पंचायत अंतर्गत अवेडे कोठंबी तलावाजवळ सुशोभीकरण करण्यात आले होते. परंतु दोन दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तीने पंप वापरून तलावातील पाणी अवैधरित्या उपसले. तसेच मासेमारी करुन तलावातील गाळ काढून सुशोभिकरण केलेल्या भागात टाकला. यामुळे तलावाचे सौंदर्य नष्ट झाले, असे विशाल देसाई यांनी सांगितले. 

स्थानिक नागरिक संतप्त

कोठंबी तलावाचे सुशोभिकरण केल्यानंतर स्थानिक लोक तसेच ज्येष्ठ नागरिक याठिकाणी सायंकाळच्या वेळी येत होते. परंतु याठिकाणी अवैधपणे पाणी उपसणे तसेच मासेमारी करण्याचे प्रकार वाढू लागले. तलावानजीक केलेले सुशोभिकरण विद्रुप करण्याचे काम या व्यक्तींकडून होऊ लागले. यामुळे स्थानिक संतप्त झाले होते.

कोमुनिदाद प्राधिकरणाने आधीच या प्रकरणी केपे पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल केली आहे. असे प्रकार सुरू राहिल्यास नैसर्गिक संसाधने नष्ट होणार आहेत. अवेडे कोठंबीची ओळख असलेला तलाव विद्रुप होऊन येथील सौंदर्य लोप पावणार आहे. 

हेही वाचा