खाण, पर्यटनासाठी केंद्राची मदत

मुख्यमंत्री : नीती आयोगाच्या बैठकीत महत्त्वाच्या विषयांना दिले प्राधान्य


28th May 2023, 12:28 am
खाण, पर्यटनासाठी केंद्राची मदत

नीती आयोगाच्या बैठकीत सहभागी मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत.

प्रतिनिधी। गोवन वार्ता                                    

पणजी : नीती आयोगाच्या शनिवारी झालेल्या बैठकीत आपण गोव्यातील खाण, पर्यटन आणि उद्योग या तीन विषयांवर प्रामुख्याने प्रकाश टाकला. यासाठी केंद्र सरकारने आवश्यक ती मदत पुरवण्याची हमी दिलेली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बैठकीनंतर बोलताना दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी नीती आयोगाच्या नियामक परिषदेची आठवी बैठक झाली. नवी दिल्ली येथील प्रगती मैदानावर असलेल्या न्यू कन्व्हेन्शन सेंटर येथे ही बैठक झाली. या बैठकीला १९ राज्ये आणि ६ केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधीत्व करणारे मुख्यमंत्री वा नायब राज्यपाल उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ​दिल्लीत शनिवारी नीती आयोगाची बैठक पार पडली. बैठकीत ‘विकसित भारत २०४७’ हेच प्रमुख ध्येय ठेवण्यात आले होते. त्यानुसार विकसित गोव्याचे स्वप्न साकार करण्यासाठी आपण खाण, पर्यटन आणि उद्योगाला बैठकीत प्राधान्य दिले, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले.                               

राज्यातील खाणी सुरू करण्याची प्रक्रिया सरकारने सुरू केलेली आहे. पुढील काळात खाणी सुरू करण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत केंद्र सरकारकडून मिळणार आहे. गोव्याची अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून असल्यामुळे पर्यटकांसाठी आवश्यक त्या साधनसुविधा उभारण्यासाठीही केंद्र सरकारकडून राज्याला आर्थिक मदत मिळणार आहे. गोव्यात सूक्ष्म, लघू आणि मध्यम (एमएसएमई) स्वरूपाचे अधिकाधिक उद्योग उभारणीचे प्रयत्न राज्य सरकारकडून सुरू आहेत. यासाठीही केंद्र सरकारने गोव्याला मदतीचा हात देण्याची हमी दिलेली आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले. हरित ऊर्जा, कौशल्य विकास, विद्युत प्रकल्प यांबाबतही बैठकीत चर्चा झाल्याचेही त्यांनी नमूद केले.

मुख्यमंत्री व नायब राज्यपालांनी या बैठकीत विविध धोरणात्मक पातळीवर अनेक सूचना केल्या. तसेच केंद्र आणि राज्य सरकारांच्या सहकार्यातून  होणाऱ्या राज्यांशी निगडित मुद्यांचा त्यांनी उल्लेख केला.  यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या महत्त्वाच्या सूचनांमध्ये त्यांनी अधोरेखित केलेल्या उत्तम पद्धती, जसे की हरित धोरणे स्वीकारणे, क्षेत्र निहाय नियोजन, पर्यटन, शहरी नियोजन, कृषी, कार्यकुशलता,  लॉजिस्टिक अशा विषयांचा समावेश होता.

बैठकीत सहभागी झाल्याबद्दल आणि विचार आणि अनुभव सांगितल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री आणि नायब राज्यपालांचे आभार व्यक्त केले. नीती आयोग राज्यांच्या चिंता, आव्हाने आणि सर्वोत्तम पद्धतींचा अभ्यास करेल आणि त्यानंतर सवर्वसमावेशक विकास साधण्यासाठी पुढील योजना निश्चित करेल, अशी ग्वाहीही  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना दिली.  


केंद्र, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी ‘टीम इंडिया’ म्हणून काम करावे !

केंद्र, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी ‘टीम इंडिया’ म्हणून काम करावे. विकसित भारतसाठी लोकांची स्वप्ने आणि आशा-आकांक्षा पूर्ण कराव्यात. राज्यांना त्यांची पुढच्या २५ वर्षांची धोरणे विकसित करण्यात आणि त्याची राष्ट्रीय विकास अजेंड्याशी सांगड घालण्यात राज्यांना मदत करण्यात नीती आयोग महत्त्वाची भूमिका बजावू  शकेल. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी नीती आयोगासोबत काम करावे जेणेकरून अमृत काळासाठीची भारताची उद्दिष्टे पूर्ण करण्यात ते मोठी झेप घेऊ शकतील, असे मार्गदर्शन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

‘स्वयंपूर्ण गोवा’, पर्पल फेस्तचे बैठकीत कौतुक                                

नीती आयोगाच्या बैठकीत आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘आत्मनिर्भर भारत-स्वयंपूर्ण गोवा’ मोहीम आणि पर्पल फेस्त यांचा पुन्हा एकदा आढावा घेतला. स्वयंपूर्ण गोवा योजनेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले. तसेच पर्पल फेस्तची संपूर्ण माहिती इतर राज्यांना पाठवून देण्याच्या सूचनाही आपणास केलेल्या आहेत, असेही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

हेही वाचा