वाहन चालवताना मोबाईलवर बोलल्यास १० हजारांपर्यंत दंड

१३ ठिकाणी १ जूनपासून होणार कारवाई; आदेश जारी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
27th May 2023, 12:22 am
वाहन चालवताना मोबाईलवर बोलल्यास १० हजारांपर्यंत दंड

पणजी : वाहन चालवतांना मोबाईल वापरताना आढळल्यास पहिल्या उल्लंघनासाठी १ हजार तर दुसऱ्या व त्याहून जितक्या वेळा उल्लंघन होईल, त्या प्रत्येक वेळीस १० हजार दंड ठोठावण्यात येणार आहे. पणजी, पर्वरी आणि आजूबाजूच्या परिसरात १३ ठिकाणी ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ प्रणाली बसवली आहे. तेथे १ जूनपासून कारवाई सुरू होणार आहे. हा दंड संबंधित चालकाच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे पाठवला जाणार आहे. तसा आदेश वाहतूक खात्याने जारी केला आहे.
राज्यात आता वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पणजी, पर्वरी आणि आजूबाजूच्या परिसरात १३ ठिकाणी ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ प्रणाली बसवण्यात आली आहे. ही प्रणाली १ जूनपासून कार्यान्वित करण्यात येणार आहे. या प्रणाली अंतर्गत वरील ठिकाणी बसविण्यात आलेल्या सीसीटीव्हीद्वारे बेशिस्त वाहन चालवणाऱ्यांना चांगलेच वळण लागणार आहे. अश्या वाहन चालकांचे कृत्य इलेक्ट्रॉनिक कॅमेऱ्यात कैद होईल. त्यानंतर त्यांच्या मोबाईलवर थेट चलनाचा एसएमएस जाईल, यासाठी वाहतूक खात्याने नियम आणि दंड याबाबतची माहिती जारी केली आहे.
याशिवाय सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ता सुरक्षा समितीच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, अतिवेगाने वाहन चालविणे, जंक्शनजवळील वाहतूक सिग्नलचे पालन न करणे, मालवाहू वाहनातून क्षमेतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक करणे, दारू पिऊन गाडी चालविणे आणि गाडी चालवताना मोबाईलवर बोलणे या उल्लंघनांसाठी कमीतकमी तीन महिन्यांसाठी वाहन परवाना निलंबित करण्यात येणार आहे.

असा ठोठावणार दंड

- रुग्णवाहिका किंवा अग्निशमन दल व इतर आपत्कालीन सेवेच्या वाहनांना पुढे जाण्यास अडथळा निर्माण केल्यास प्रत्येक वेळी १० हजार दंड.
- विना हेल्मेट दुचाकी, सीट बेल्टचा वापर न करणे आणि अतिवेगाने वाहन चालवणाऱ्यांना एलएमव्ही वाहनांसाठी पहिला उल्लंघनासाठी १ हजार तर त्यानंतर प्रत्येक वेळी १ हजाराचा दंड.
- अतिवेगाने वाहन चालवणाऱ्यांना एलएमव्ही वाहन वगळता इतर वाहनांसाठी पहिल्या उल्लंघनापासूनच प्रत्येक वेळी २ हजारांचा दंड.
- सिग्नलचे नियम केल्यास, नो पार्किंग ठिकाणी किंवा अनधिकृत ठिकाणी पार्किंग केल्यास, ओव्हरटेक केल्यास, मालवाहू वाहनातून प्रवासी नेल्यास आणि फॅन्सी क्रमांकपट्टी लावल्यास पहिल्या उल्लंघनासाठी ५०० रुपये, नंतर प्रत्येक वेळी १ हजाराचा दंड.

हेही वाचा