स्मार्ट सिटी; सल्लागाराचे पैसे रोखा!

माजी महापौर उदय मडकईकर यांची मागणी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
27th May 2023, 12:20 am
स्मार्ट सिटी; सल्लागाराचे पैसे रोखा!

पणजी : स्मार्ट सिटीच्या कामावरून मंत्री तथा पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी सल्लागारांवर खापर फोडत कामे निकृष्ट दर्जाची झाल्याची टीका केल्यानंतर, आता काही नगरसेवकांनीही या कामांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. माजी महापौर तथा विद्यमान नगरसेवक उदय मडकईकर यांनी सल्लागाराचे पैसे रोखण्याची मागणी सरकारकडे केलेली आहे.
स्मार्ट सिटीअंतर्गत राजधानी पणजीत गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या कामांवरून गोंधळ माजला आहे. अनेक ठिकाणची कामे संथगतीने सुरू असल्याने स्थानिक तसेच वाहन चालकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या कामांची पूर्ण जबाबदारी स्वत:च्या खांद्यावर घेत, कामे तत्काळ पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आयएएस अ​धिकारी संजीत रॉड्रिग्स यांची नेमणूक केलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वत:हून या कामांचा आढावा घेण्यास सुरुवात केलेली असतानाच, मंत्री तथा पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी स्मार्ट सिटीची कामे निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोप केला. शिवाय सल्लागाराला या कामांसाठी ८ कोटी रुपये देण्यात आलेले आहे. त्याने कामांवर नियंत्रण ठेवण्याची गरज असताना तसे होत नसल्याचेही त्यांनी नमूद केले. बाबूश यांनी ही भूमिका मांडल्यानंतर आता नगरसेवकांनीही कामांवर आक्षेप घेण्यास सुरुवात केलेली आहे.

काय म्हणाले मडकईकर?

- स्मार्ट सिटीची कामे निकृष्ट दर्जाची होत आहेत, हे मंत्री बाबूश खरेच बोलले. पण ते उशिरा बोलले.
- याआधी आम्ही नगरसेवकांनीही याबाबत प्रश्न उपस्थित केले होते. पण, आमचे कुणी ऐकले नाही.
- या कामांसाठी नेमलेल्या सल्लागाराला पैसे द्यायचे असतील तर ते प्रथम रोखले पाहिजे.
- स्मार्ट सिटीअंतर्गत आतापर्यंत झालेल्या कामांचे ऑडिट करण्याबाबतचा ठराव घेण्याची मागणी आपण मनपाच्या बैठकीत करणार आहे.

हेही वाचा