कुनो राष्ट्रीय उद्यानातील एका मादी चित्त्याचा मृत्यू

किडनी निकामी झाल्याने मृत्यू


28th March 2023, 12:13 am
कुनो राष्ट्रीय उद्यानातील एका मादी चित्त्याचा मृत्यू

न्यूज डेस्क । गोवन वार्ता

नवी दिल्ली : नामिबियाहून आणलेली साशा ही मादी चित्ता सोमवारी सकाळी कुनो नॅशनल पार्कमध्ये मृतावस्थेत आढळली. किडनी निकामी झालेल्या साशावर उपचार सुरू होते.

साशामध्ये २२ जानेवारी रोजी आजाराची लक्षणे आढळून आली होती. त्यानंतर तिला छोट्या खोलीत हलवण्यात आले होते. वन विभागाने इमर्जन्सी मेडिकल रिस्पॉन्स टीम कुनो येथे उपचारासाठी पाठवली होती. तिला वाचवण्यासाठी वनविहार राष्ट्रीय उद्यानातून डॉ. अतुल गुप्ता यांनाही पाठवण्यात आले होते. तज्ज्ञांनी तिला द्रव दिले होते, त्यामुळे तब्येतीत सुधारणा दिसून आली होती. चित्त्यांमध्ये मूत्रपिंडाचा आजार सामान्य आहे. याला ‘प्रोजेक्ट चित्ता’ला धक्का मानू नये, असे तज्ज्ञांचे मत आहे.

साशाला इतर सात चित्त्यांसह नामिबियातून आणले होते. गेल्या वर्षी १७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुनो नॅशनल पार्कमध्ये हे चित्ते सोडले होते. ७० वर्षांनंतर प्रथमच चित्ते भारतीय भूमीवर मुक्तपणे फिरत होते. फेब्रुवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेतून १२ चित्त्यांची दुसरी तुकडी भारतात आणण्यात आली. यामध्ये ७ नर आणि ५ माद्या आहेत. त्यांना सध्या कुनो नॅशनल पार्कच्या क्वारंटाईन एनक्लोजरमध्ये ठेवण्यात आले आहे.