गोव्याच्या अस्मितेशी, लोकसंस्कृतीशी जोडलेली मुख्य धारेतील मंदिरे गोव्यात बंद आहेत, त्या मंदिरांचे वाद सोडविण्यासाठी सरकारकडून उपाययोजना होत नाहीत.
दरवर्षी कुठल्या ना कुठल्या मंदिराचा वाद उफाळून येतो आणि देवळातील उत्सव बंद होतात. गोव्यातील हे वाद नेहमीचेच झाले आहेत. महाजनांच्या अहंकारांमुळे गावाच्या श्रद्धेचे स्थान असलेल्या मंदिरांचे उत्सव बंद पडत आहेत. गोव्यात असे वाद नवे नाहीत. गोव्यात किती तरी मंदिरे वादांमुळे बंद पडली आहेत. हे सत्र सुरूच आहे. पहिला मान कोणाला या वादातूनच देवस्थानांचे वाद वाढत असतात. मूळ गांवकर मंडळी आणि देवस्थानाच्या कार्यात सहकार्य करण्यासाठी नियुक्त केलेल्या अन्य घटकांमध्ये हे वाद निर्माण होत आहेत. सध्या मये आणि धुळापी येथील वाद चर्चेत आहेत. हे वाद इतक्या टोकाला गेले आहेत की देवतांच्या मूर्ती, पालख्या, कळस, पेठा सध्या उत्सवाशिवाय पडून आहेत. गोव्यातील काही महत्त्वाची मोठी देवस्थाने तर गेली कित्येक वर्षे बंदच आहेत. महाजनांमधील वाद एकमेकांवर हात उगारण्यापर्यंत जात असल्यामुळे मामलेदारांनी अनेक देवस्थानांना कुलूप लावले आहे. महाजनांच्या या वादात गावांतील जनतेच्या श्रद्धास्थान असलेल्या देवदेवता गाभाऱ्यात बंद आहेत. वार्षिक उत्सवांना पुन्हा पुन्हा गालबोट लागत असल्यामुळे सरकारकडून खबरदारी म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवला जातो. जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये गोव्यातील अशा कित्येक देवस्थानांचे वाद पडून आहेत, ज्यावर तोडगाच काढला जात नाही. कारण तोडगा काढण्यासाठी संबंधित गटांमध्ये समंजसपणा असायला हवा. पण अहंकाराची बाधा झालेले नव महाजन आणि मूळ महाजन यांच्यात समेट होत नसल्यामुळे देव गर्भकुडीत बंद आहेत. स्थानिक आमदार लोकांमध्ये समेट घडविण्याचा प्रयत्न करत नाहीत. बहुसंख्य लोकांना देवस्थानांच्या विषयांवरून भांडत ठेवत त्यांच्या मतांवर मात्र डल्ला मारला जातो. स्थानिक आमदार, सरकार यांनी पुढाकार घेतल्यास गोव्यातील बऱ्याच मंदिरांचे वाद सुटू शकतात. भाजपचे मंदिरांचे राजकारण सुरू असतानाही सरकारला गोव्यातील बंद देवस्थानांच्या विषयाला हात घालावा असे वाटत नाही. जुनी मंदिरे बांधण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला आहे. पण जी गोव्याच्या अस्मितेशी, लोकसंस्कृतीशी जोडलेली मुख्य धारेतील मंदिरे गोव्यात बंद आहेत, त्या मंदिरांचे वाद सोडविण्यासाठी मात्र सरकारकडून उपाययोजना होत नाहीत.
गोव्यातील मंदिरांचे वाद हा एक नाजूक तितकाच जटिल विषय आहे. हे वाद मिटवण्यासाठी मंदिर तंटा निवारण लवादासारखी यंत्रणा गोव्यात असण्याची गरज आहे. मंदिरांचे राजकारण सुरू असताना सरकारने गोव्यातील बंद असलेल्या बहुसंख्य मंदिरांतील वादांवर तोडगा काढण्याची तेवढीच गरज आहे. गोव्यात सर्वच तालुक्यांमध्ये एक तरी मंदिराचा वाद आहेच. विशेष म्हणजे शिकली सवरलेली नवी पिढीही मीपणाच्या बाधेने देवस्थानाच्या वादांमध्ये अग्रस्थानी आहे, हे दुर्दैवच म्हणावे लागेल. खरे म्हणजे शिकलेल्या पिढीकडून देवस्थानांच्या वादात गुंतलेल्या गटांमध्ये समेट घडविण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. पण सत्तरीपासून तिसवाडीपर्यंत सगळीचकडे युवा पिढीही देवस्थानाच्या वादात पुढे आहे. या वादांमुळे मयेतील पेठ असो किंवा धुळापी येथील उत्सव असो, साऱ्याच गोष्टी अडून पडल्या. जत्रा, उत्सवही या वादांमुळे बंद पडले. महाजनांच्या वादांत देवांना शिक्षा दिली जाते. लोकांच्या श्रद्धेला तडा पाडला जातो. पण कोणीच या वादांवर उपाय शोधण्याचा प्रयत्न करत नाही.
मामलेदार, उपजिल्हाधिकारी वाद नको म्हणून पोलिसांच्या मदतीने तत्काळ मंदिरांचा ताबा घेतात. वाद असलेल्या गटांमध्ये चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न होत नाही. उत्सव होण्यासाठी आणि देव सर्वांसाठी खुले करण्यासाठी उपाय शोधणे शक्य आहे. पण तेवढे प्रयत्न प्रशासनाकडूनही होत नाहीत. त्यामुळेच गोव्यात आज प्रामुख्याने खरी गरज आहे ती मंदिर तंटा निवारण लवाद स्थापन करण्याची. गोव्यातील मंदिरांच्या वादांमधून सुवर्णमध्य साधून वाद मिटवण्यासाठी लवाद किंवा एखादा आयोग स्थापन करणे शक्य आहे. सरकारने गोव्यातील या महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष द्यावे. ज्या बहुसंख्य लोकांच्या मतांवर आपण निवडून येतो, त्या लोकांमध्ये असलेले धार्मिक वाद मिटवून एकोपा घडवून आणण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा. या बहुसंख्य समाजाला वादांमध्ये गुंतवून ठेवूनच अनेक जण आपले राजकारण करतात. प्रशासनही मंदिरांना कुलूप लावण्यापलिकडे फार काही करत नाही. अशा स्थितीत मंदिरांचे वाद सोडविण्यासाठी एखादी उच्च स्तरावरील सरकारी यंत्रणा असणे गरजेचे आहे.