घर हा शब्द

घरात फक्त उंची फर्निचर, पडदे, महागड्या वस्तूंनी घर बनत नसते. तर घरातील प्रेमाच्या जीवाला जीव देणाऱ्या माणसांपासून घर बनते. कोणतेही नाते असण्यापेक्षा ते टिकवणे जास्त अवघड असते. नात्यामध्ये सर्वांत महत्त्वाचे म्हणजे समजून घेणे, वेळेला मदत करणे, नाती तोडण्यापेक्षा नाती जोडण्यासाठी प्रयत्न करणे. उत्तम नातीगोती जपता आली, की अर्थातच घराला घरपण येते. गृहव्यवस्थापन उत्तम असेल, तर आयुष्य सुखकर होऊन जातं.

Story: घराबद्दल बरेच काही | गौरी भालचंद्र |
25th March 2023, 12:27 am
घर हा शब्द

कोणतीच अस्वच्छ गोष्ट डोळ्याला सुख देत नाही. तेलकटपणा, चिकटपणा, इतर डाग, धूळ यामुळे वस्तू खराब दिसतात. ही अस्वच्छता आपल्या आरोग्याला घातक असते. शिवाय त्यामुळे वस्तूचा टिकाऊपणाही कमी होतो. सोफा, कपाटे, चित्रांच्या फ्रेम, दिवाण यासारख्या वस्तूंच्या मागून आठवड्यातून एकदातरी स्वच्छता फिरावी, छताचे कोपरे बघून जाळ्या जळमटे काढावी. 

मासिक स्वच्छतेमध्ये महिन्याचे सामान भरण्यापूर्वी तेलाची भांडी, धान्याचे डबे स्वच्छ करावे. पंखे स्वच्छ करणे, कपाटामधील कागद बदलणे, रद्दीची विक्री यासारखी कामे वेळच्यावेळी लक्ष देऊन केल्यास घर स्वच्छ ठेवणे सोपे जाते.

पुस्तकेही वेळच्यावेळी लक्ष न दिल्यास वाळवी लागून फुकट जातात. रोजच्या वापरातले डबे, डबे ठेवायच्या फळ्या, दुभत्त्याचे कपाट, लाकडी फर्निचर, दाराच्या मुठीजवळचे भाग, टेलिफोन, टिपॉय, चित्रांच्या फ्रेम अशा वस्तू मऊ कापडाने, हलक्या हाताने उंच, बाजूकडून जमिनीकडे अशा क्रमाने पुसत यावे. 

धूळ झटकू नये. कारण त्यामुळे ती एका वस्तूवरून उडून दुसऱ्या वस्तूवर बसते. कित्येकवेळा काही डबे, बाटल्या उघडून पहाणेही जमत नाही आणि त्यातील वस्तू वाया जातात.

एखाद्या कृतीसाठी संबंधित सामान जवळजवळ हवे. यामुळे काम सोपे होते व वस्तू जागच्या जागी राहण्यास मदत होते. उदा. इस्त्री ठेवायची जागा, इस्त्री करायची जागा, इस्त्री करायचे कपडे, कपडे ठेवायचे कपाट हे जवळजवळ हवे. प्रत्येक वस्तूला सोयीस्कर जागा हवी आणि काम झाल्यावर वस्तू जागेवरच ठेवायला हवी. स्वच्छतेइतकेच टापटिपीला आणि व्यवस्थितपणाला महत्त्व आहे. सामान ठेवायची जागाही सोयीची हवी. सुटसुटीत मोजक्याच साहित्याची योग्य मांडणी केल्यावर स्वच्छता ठेवणे, टापटीप व व्यवस्थिपणा राखणे सोपे जाते व घर सुंदर दिसते.

संपूर्ण घरातील फर्निचर जितकं शक्य होईल तितकं सुटसुटीत, आवश्यकतेनुसार एका जागेवरून दुसर्‍या जागेवर हलवता येण्याजोगे बनवण्यात आलं तर सोयीचं होतं. काचेच्या खिडक्या, कपाटे किंवा टेबल, आरसे स्वच्छ करण्यासाठी पाणी हलक्या हाताने शिंपडून कागदाने पुसून घ्यावे.

आपल्या घरात नेहमी वापरायची अंथरूणे, पांघरुणे, जास्तीच्या पिशव्या, पावसाळी किंवा थंडीचे कपडे, नियमित न लागणाऱ्या बऱ्याच वस्तू असतात. या वस्तूंसाठी घरात योग्य पद्धतीचे स्टोरेज असावे. घरात पसारा कमी हवा असेल, तर अर्थातच कपडे या विषयाचे कमालीचे व्यवस्थापन हवे. कपडे वेळच्या वेळी धुणे, वाळवणे, घडी घालून ठेवणे, घरी अथवा बाहेरून इस्त्री करून आणणे, इस्त्री झालेले कपडे जागच्या जागी ठेवणे हे अविरत चक्र उत्तमपणे पार पाडता यायला हवे. पुस्तकं, पर्स, किल्ल्या या सर्व वस्तू व्यवस्थित रॅक अथवा शेल्फवर एक जागा नियोजित करून तिथंच ठेवाव्यात. 

घर हा शब्दच एवढा सुखद, आल्हाददायक आणि मनाला चेतना देणारा आहे, 

की तो सर्वांना तात्काळ प्रेम, वात्सल्य, या भावनांची जाणीव करून देतो. घर हा शब्दोच्चार कानावर पडला तरी, प्रत्येकाच्या दृष्टिपटलावर घरातील आठवणींची क्षणचित्रे उभी राहतात. 

घर म्हटले तर निर्जीव, पण ते जीवलग असते, आपला दैनंदिन वावर त्या जागेला जिवंतपणा आणत असतो, अर्थात ती जागासुद्धाआपल्या जीवनाला भक्कम आधार आणि सुबक आकार देत असते.