एकाच दिवसात १०.८५ लाखांचा दंड वसूल

राज्यभरात वाहतूक नियमभंग करणाऱ्या १,९२४ जणांविरुद्ध गुन्हे नोंद


18th March 2023, 11:38 pm
एकाच दिवसात १०.८५ लाखांचा दंड वसूल

पणजी येथे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांची कागदपत्रे तपासताना पोलीस. (नारायण पिसुर्लेकर)

प्रतिनिधी। गोवन वार्ता            

पणजी : वाहतूक पोलिसांनी शुक्रवारी राज्यभरात कडेकोट बंदोबस्त ठेवून एकाच दिवशी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १,९२४ जणांविरुद्ध गुन्हे नोंद करत, त्यांच्याकडून १०.८५ लाख रुपयांचा दंड वसूल केला. वाहतूक पोलीस अधीक्षक बास्युएट सिल्वा आणि उपअधीक्षक सिद्धांत शिरोडकर यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी राज्यभर ही कारवाई केली. 

गेल्या काही महिन्यांपासून राज्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन होण्याच्या प्रकारांत वाढ झाली आहे. त्यात अनेक अपघात घडत असून, सर्वसामान्यांचे नाहक बळीही जात आहेत. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक खाते वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मोहीम वारंवार राज्यभर राबवत आहे. त्याअंतर्गत शुक्रवारी दिवसभर केलेल्या कारवायांत १,९२४ जणांविरोधात गुन्हे नोंद करण्यात आले आणि त्यांच्याकडून १०.८५ लाखांचा दंडही जमा करण्यात आला, अशी माहिती​ उपअधीक्षक सिद्धांत शिरोडकर यांनी ‘गोवन वार्ता’शी बोलताना दिली.

वाहतूक पोलिसांकडून नेहमीच वाहन चालकांत वाहतूक नियमांबाबत जागृती केली जाते. त्यांच्याकडून नियमांचे उल्लंघन होऊ नये, यासाठी चलनही जारी केले जातात. तरीही काहीजण जाणीवपूर्वक नियमांचे उल्लंघन करत आहेत. वाहन चालकांच्या अशाच बेफिकीरीमुळे राज्यातील अपघातांचे प्रमाणही गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढलेले आहे. त्यामुळेच वाहतूक खात्याने कारवाईचा फास आवळला आहे, असेही उपअधीक्षक शिरोडकर यांनी नमूद केले.

गंभीर गुन्ह्यांतील चालकांचे परवाने होणार निलंबित       

दारू पिऊन भरधाव वेगाने वाहने हाकणे, चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करणे अशा काही कारणांमुळे अपघातांत वाढ होत चालली आहे. त्यामुळे ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर गंभीर गुन्ह्यांत सहभागी असलेल्या वाहन चालकांचे परवाने निलंबित करण्याची शिफारस वाहतूक खात्याकडे केली जाणार आहे, असेही उपअधीक्षक सिद्धांत शिरोडकर यांनी सांगितले.      

हेही वाचा