७८ खलिस्तानवाद्यांना पंजाबमध्ये अटक

अमृतपालचा शोध सुरू : इंटरनेट सेवा बंद


18th March 2023, 11:31 pm
७८ खलिस्तानवाद्यांना पंजाबमध्ये अटक

जालंधर शहरात मोठ्या प्रमाणात तैनात केलेला पोलीस बंदोबस्त.

न्यूज डेस्क । गोवन वार्ता

चंदिगढ : पंजाब पोलिसांनी शनिवारी खलिस्तान समर्थक ‘वारीस पंजाब दे’ संघटनेशी संबंधित लोकांवर राज्यभरात मोठी कारवाई सुरू केली. आतापर्यंत ७८ जणांना अटक करण्यात आली आहे. इतर अनेकांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

वारिस पंजाब दे प्रमुख अमृतपाल याचा शोध सुरू आहे. दुपारी अमृतपालला अटक झाल्याच्या बातम्या वेगवेगळ्या माध्यमांतून येत राहिल्या, पण संध्याकाळी पोलिसांनी प्रसिद्धीपत्रक जारी करून अमृतपालचा शोध सुरू असल्याचे सांगितले.

‘वारिस पंजाब दे’ संघटनेचा प्रमुख अमृतपालवर तीन गुन्हे दाखल आहेत. त्यांपैकी दोन गुन्हे अमृतसर जिल्ह्यातील अजनाला पोलीस ठाण्यात दाखल आहेत. एका विश्वासू मित्राच्या अटकेमुळे संतप्त झालेल्या अमृतपालने त्याच्या समर्थकांसह २३ फेब्रुवारी रोजी अजनाला पोलीस स्टेशनवर हल्ला केला होता. याप्रकरणी पंजाब पोलिसांवर टीका झाली होती.

दरम्यान, परिस्थिती आणखी बिघडण्याच्या भीतीने पंजाबमध्ये २४ तास मोबाइल इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली होती. राज्यात रविवारी दुपारी १२ वाजेपर्यंत मोबाईल इंटरनेट आणि बल्क एसएमएस सेवा बंद राहणार आहे. संपूर्ण पंजाबमध्ये पोलीस प्रशासन अलर्टवर आहे.

अमृतसर, फाजिल्का, मोगा आणि मुक्तसरसह अनेक जिल्ह्यांमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले आहे. मात्र, १९ आणि २० मार्च रोजी अमृतसर येथे होणारी जी-२० देशांची परिषद हे त्याचे कारण असल्याचे सांगितले जात आहे.

जालंधर-मोगा पोलिसांची संयुक्त कारवाई

अमृतपालने शनिवारी जालंधर-मोगा नॅशनल हायवेवरील शाहकोट-मसलिंया भागासह भटिंड जिल्ह्यातील रामपुरा फूल येथे कार्यक्रमांचे आयोजन केले होते. शाहकोट-मसलिया येथील कार्यक्रमासाठी त्याचे शेकडो समर्थक गर्दी करत होते. या कार्यक्रमापूर्वी जालंधर व मोगा पोलिसांनी संयुक्त मोहिमेंतर्गत अमृतपालला अटक करण्याची रणनीती आखली होती. यासाठी अनेक जिल्ह्यांतून पोलिसांचा फौजफाटा मागवण्यात आला होता. राष्ट्रीय महामार्गावरही नाकेबंदी करण्यात आली होती.

शनिवारी दुपारी १ च्या सुमारास अमृतपालचा ताफा जालंधरच्या मैहतपूर गावालगत पोहोचला. तिथे पोलिसांनी त्याला घेराव घेतला. त्यांनी ताफ्यातील पहिल्या दोन कारमधील सहा जणांना अटक केली. अमृतपाल तिसऱ्या क्रमांकाच्या मर्सिडीज कारमध्ये होता. पोलिसांना पाहताच त्याने चालकाला गाडी लिंक रोडकडे वळवण्याची सूचना केली. त्यानंतर तो पसार झाला. पोलिसांनी त्याचा शोध सुरू ठेवला आहे.

मोहालीत निहंगांकडून आंदोलन

अमृतपालच्या अटकेविरोधात मोहालीत निदर्शने करण्यात आली. येथील चंदीगड-मोहाली सीमेवरील इंसाफ मोर्चात तब्बल १५० निहंग हातात तलवारी व काठ्या घेऊन रस्त्यावर उतरले. हे सर्वजण अमृतपालच्या सुटकेसाठी नारे देत चंदिगडच्या दिशेने जात होते. त्यांना रोखण्यात आल्यानंतर त्यांनी विमानतळ मार्ग अडवून धरला. पंजाब पोलिसांच्या जवान आंदोलनावर नियंत्रण ठेवण्यासाठी तैनात आहेत.

हेही वाचा