राज्यात ७६ दिवसांत ६५० अपघातांची नोंद; ८३ जणांचा मृत्यू

दररोज सरासरी ८ दुर्घटना : गेल्या वर्षीच्या तुलनेत दुपटीने वाढ


18th March 2023, 11:28 pm
राज्यात ७६ दिवसांत ६५० अपघातांची नोंद; ८३ जणांचा मृत्यू

बार्से येथील बस  आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातानंतर जखमीला रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिकेत चढवताना आरोग्यसेवक.

प्रतिनिधी । गोवन वार्ता                               

पणजी : राज्यात १ जानेवारी ते १७ मार्च २०२३ या ७६ दिवसांत ६५० अपघातांची नोंद झाली असून यात ८० भीषण अपघातांत ८३ जणांचा मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी पाहता दिवसाकाठी सरासरी ८ अपघात, तर सरासरी २२ तासांत एकाचा अपघाती मृत्यू होत आहे. याशिवाय वरील कालावधीत ८२ जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे गेल्या वर्षातील याच कालावधीशी तुलना केल्यास यंदा भीषण अपघात आणि मृत्यूच्या संख्येत दुपटीने वाढ झाल्याचे समोर आले आहे.                         

राज्यात १ जानेवारी ते १७ मार्च २०२३ या ७६ दिवसांच्या कालावधीत ६५० अपघात झाले आहेत. यात ८० भीषण अपघातांची नोंद आहे. वरील कालावधीत एकूण ८३ जणांचा अपघातांत मृत्यू झाला आहे. ५६ अपघातांत ८२ जणांना गंभीर दुखापत झाली आहे. राज्यभर झालेल्या १२५ किरकोळ अपघातांत २१५ जणांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत. शिवाय ३८९ अपघातांत वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. वरील कालावधीत २०२२ साली राज्यात ६४८ अपघात झाले होते. त्यांतील ४३ भीषण अपघातांत ४६ जणांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी ४३ अपघातांत ५६ जणांना गंभीर, तर ११० अपघातांत १५५ जणांना किरकोळ दुखापती झाल्या होत्या. शिवाय ४५२ वाहनांचे मोठे नुकसान झाले होते.                         

राज्यात फेब्रुवारी २०२३ या एका महिन्यात २३३ अपघातांची नोंद झाली आहे. यांतील ३२ भीषण अपघातांत ३४ जणांचा मृत्यू झाला आहे. २५ अपघातांत ४० जणांना गंभीर दुखापत झाली आहे. ४१ किरकोळ अपघातांत ९६ जणांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत. शिवाय १३५ अपघातांत वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. मार्चच्या १७ दिवसांत राज्यभरात विविध ठिकाणी १३९ अपघातांची नोंद झाली आहे. यांतील १५ भीषण अपघातांत १५ जणांचा मृत्यू झाला आहे. १७ अपघातांत २२ जणांना गंभीर दुखापत झाली आहे. ३८ किरकोळ अपघातांत ५४ जणांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत. शिवाय ६९ अपघातांत वाहनांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.

....

बार्से येथे अपघातात दोघे जखमी

प्रतिनिधी । गोवन वार्ता
काणकोण : काणकोणहून मडगावच्या दिशेने जाणारी दुचाकी  व मडगावहून काणकोणच्या दिशेने येणारी दुचाकी व प्रवासी वाहतूक बस यांच्यात बार्से येथे शनिवारी सायंकाळी झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोन मुली गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना तातडीने काणकोणच्या इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बस (क्र. जीए ०९ यू १२७२) मडगावहून काणकोणच्या दिशेने येत होती. या बसची धडक दुचाकीला बसली. या अपघातात दुचाकीवरील मुली रस्त्यावर पडल्या. एका मुलीच्या डोक्याला, तर दुसरीच्या पायाला दुखापत झाली आहे. दोघही मुली सिरसी (कर्नाटक) येथील आहेत. १०८ रुग्णवाहिका बोलावून त्यांना तातडीने उपचारासाठी बाळ्ळी येथील रुग्णालयात नेण्यात आले. कुंकळ्ळी पोलीस पुढील तपास करत आहेत.
हेही वाचा