ठकी ताईंचा साहित्य प्रवास

Story: ब्रम्हांडलेखिका फकीताई | प्रा. अदिती ब |
18th March 2023, 11:17 Hrs
ठकी ताईंचा साहित्य प्रवास

‘बाबू गुंड्या नोनू’ प्रकाशन दिसामासी वाढतच होते. दर वर्षी स्वत:ची दोन आणि नवऱ्याची दोन पुस्तकं छापण्याचा चंगच ठकी ताईंनी बांधला होता. काव्य, ललित लेखन वगैरे झाल्यावर त्यांनी नवऱ्याला गझल लिहिण्याचे फर्मान सोडले. त्यांच्या अथक प्रयत्नामुळे पतीदेवांचा ‘नवरा हतबल झाला’ हा गझल संग्रह प्रकाशित झाला. त्यातील एक गझल- 

तुझ्या सहवासात सखे गोणपाट मलमल झाला 

हट्ट तुझे असे की हा प्राणनाथ हतबल झाला 

साधाभोळा माणूस मी जीवनाच्या वाटेवर या 

तू मात्र बिलंदर रागीट मत्सरी माझी प्रेमिका 

तुजसामोर हा वज्र अकस्मात कमलदल झाला 

तुझ्या सहवासात सखे गोणपाट मलमल झाला 

ठकी ताई आणि त्यांच्या पतीदेवांचं एकमेकांवरील प्रेम एवढं गाढ होतं की या काव्यसंग्रहाला नेमके तेच पुरस्कार मिळाले जे ठकी ताईंच्या ‘मोहणवीना’ या पुस्तकाला मिळाले. त्याही काही कमी नव्हत्या. त्यांच्या ‘मोहणवीना’ पुस्तकातील या कवितेने प्रसिद्धीचे सर्व रेकॉर्ड मोडले, असे थोर समीक्षक ढबूराव बसे यांचे म्हणणे होते.

ए मणमोहणा

वाजव तुझी वीना 

मारताच फुंकर तू 

वीना फुई फुई करते 

झाली वेडी राधा

जेव्हा बघितली तुझी वीना 

वीनेची सात भोके म्हनजे 

सात जणम तुझा सहवास 

माझ्या सपनातील मोहणा 

माझ्या जवळ ये णा 

माझ्या जवळ ये णा 

डॉ. हसे यांनी या काव्यसंग्रहाच्या १०० प्रती विकत घेतल्या. एका पत्रकाराने त्यांना याचे कारण विचारले, तेव्हा ते म्हणाले की ज्यांना कधीही हसू येत नाही, अशा माणसांना हे पुस्तक नियमित वाचायला लावल्याने त्यांना बऱ्यापैकी हसता येत असे. एखाद्या प्रथितयश लेखक किंवा लेखिकेच्या मेंदूवर अवघड शस्त्रक्रिया करायची असल्यास त्यांना हा काव्यसंग्रह वाचण्याची सक्ती ते करत. काव्यसंग्रह वाचून संपेपर्यंत लेखक बेशुद्ध. शिवाय मेंदू असा काही विस्फारलेला मिळायचा की सर्जरी करणं सोपं जायचं.

कुणीतरी हिंमत करून ठकी ताईंना विचारलंच- “ वीणा हे सरस्वती देवीचं वाद्य आहे. मोहन सहसा बासरी वाजवतो. तुमचा मोहन वीणा वाजवतो...”

त्यावर त्या म्हणाल्या – “माज्या कवितेतला मोहण हा साधासुधा मोहण णाही... तो माज्या मणातला मोहण आहे... त्याणे काय वाजवायचं ते मी ठरवणार.”

“बरं… वीणेला भोकं नसतात. पण तुमच्या कवितेत आहेत. ते कसं काय?”

“ झोपाळ्या वाचूण झुलायचे, असं एखादा कवी म्हणतो ते चालतं तुम्हाला? आकाशी झेप घे रे पाखरा सोडी सोण्याचा पिंजरा, हे चालतं ? मला जर सोण्याचा मिळाला तर मी बाई सोडणार नाही... सोणं हे  सोणं आहे शेवटी.”

“वीणेला भोकं का आहेत ? असा प्रश्न आहे ताई.”

“हां… तेच सांगतेय. माझ्या कवितेतली वीना आहे. तिला भोकं असतील किंवा घोड्याचे केस लावलेली दांडी असेल.”

“घोड्याचे केस लावलेली दांडी?”

“ती नाही का घोड्याचे केस लावलेली दांडी… त्याणे गिटार वाजवतात...”  ठकी ताई ठसक्यात म्हणाल्या.

प्रश्नकर्त्याने ठकी ताईंसमोर शरणागती पत्करली.

त्यानंतर ठकी ताईंनी मागे वळून पाहिले नाही. अपरांतीच्या प्रत्येक वर्तमानपत्रात त्यांच्या कविता आणि लेख येऊ लागले. साहित्य वर्धनाचा उदात्त हेतू मनी धरून, नवनवीन संस्था त्यांनी स्थापन केल्या. एका वर्षी त्यांनी इतर कवींना पुरस्कार देण्याचं ठरवलं. अगदी निवडक कवींनाच पुरस्कार देण्यात येणार असल्याने त्यांनी केवळ दोनशे जनांना निमंत्रणं पाठवली. त्यातले मर्तो झेंगाटकर त्यांना भेटायला आले. 

“या या… मर्तो राव !”

“अहो बाई… मी कविता करत नाही. आयुष्यात एकही कविता केली नाही. मला तुम्ही हे पुरस्काराचं निमंत्रण दिलं आहे. चूक झालं काय?”

“नाही हो. गेल्या वर्षी तुम्ही आमच्या कार्यक्रमाला आल्ता की णाही? तेव्हा दुसऱ्याला दिलेला पुरस्कार बघताना तुमची लाळ गळलेली बघितली मी. तेव्हाच ठरवलं. पुढच्या वर्षी या माणसाला पुरस्कार द्यायचा.”

“अहो पण मी कविता करत नाही...”

“आता करा. आमच्या “बाबू गुंड्या नोणु’ प्रकाशनातर्फे काढू तुमचं पुस्तक.”

“मला कविता येत नाही. मी काय लिहिणार?”

“अहो सोप्पं आहे. क्रियापद असतं की णाही… म्हणजे वाक्याचा शेवट आपन ज्या शब्दाणे करतो तो शब्द सुरुवातीला घेतला की कविता होते. आता एक वाक्य बोला बरं ..”

“मला कविता येत नाही.”

“येत नाही कविता मला.... असं म्हणा. झाली कविता!”

“पुस्तक प्रकाशित झाल्यावर तुम्ही मला हा पुरस्कार देणार?” मर्तोनी शंका विचारली.

“हो तर. दहा हजार रुपये, पुष्पगुच्छ आनी शाल....”

“अरे बापरे... हा केवढा मोठा सन्मान....” मर्तोना रडू अनावर झालं. 

“अहो...थांबा ....! दहा हजार रुपये तुम्ही आमच्या संस्थेला द्यायचे आहेत. आपापला पुष्पगुच्छ आणि शाल आपण आणायची आहे.”

हे ऐकल्यावर मर्तो चक्कर येऊन कोसळले. त्यांच्या चेहऱ्यावर पाण्याचे हबके मारून त्यांना जागं करून ठकी ताई म्हणाल्या- :” तुम्ही काही कविता करत नाही. बरोबर? तरीसुद्धा आमची संस्था तुम्हाला एक कवी म्हणून हा पुरस्कार देणार आहे. मग तुमचीही जबाबदारी आहे की नाही? तुम्हीही संस्थेला सहाय्य केलं पाहिजे!”

ही गोष्ट मात्र मर्तोरावांना पटली. “बरं. मी दहा हजार रुपये घेऊन येतो.”

“तुम्ही कुठे जाताय? तुम्ही इथेच बसून कविता लिहून काढा. पंचवीस कवितांचा एक संग्रह काढू. वीस हजार रुपयात काम होऊन जाईल. वहिनींना फोन लावा. त्यांना म्हणावं पैसे घेऊनच या.”

आपला सत्कार होणारेय या कल्पनेने हुरळून गेलेले मर्तोराव नव्या उमेदीने कविता लिहायला बसले.

बसलो मी 

लिहायला कविता

झालो बेभान 

करतो कविता

अशा प्रकारे सुरुवात करून त्यांनी पंचवीस कविता लिहून काढल्या. त्यांचा “ फूलांचे मणोगत” हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला आणि त्याला बाबू गुंड्या नोनू प्रकाशनाचा पुरस्कार मिळाला.