गांधी सत्र न्यायालयाचा निर्णय; आज सुनावणार शिक्षा
न्यूज डेस्क । गोवन वार्ता
गांधीनगर : गुजरातच्या गांधीनगर न्यायालयाने सोमवारी ३० रोजी आसाराम बापूला एका महिला अनुयायीवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आले आहे. गांधीनगर सत्र न्यायालयाने आसाराम बापूला २०१३ मध्ये सुरतमधील दोन बहिणींवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरवले आहे. आसारामचा मुलगा नारायण साईही या प्रकरणात आरोपी होता.
आसारामची पत्नी लक्ष्मी, मुलगी भारती आणि ध्रुवबेन, निर्मला, जस्सी आणि मीरा या चार महिला अनुयायांनाही या प्रकरणात आरोपी करण्यात आले होते. पण गांधीनगर न्यायालयाने संबंधित सर्वांना निर्दोष मुक्त केले. आसाराम बापू सध्या जोधपूर तुरुंगात असून मंगळवारी त्याला शिक्षा सुनावली जाणार आहे.
२०१३ मध्ये सुरतमधील दोन बहिणींनी आसाराम बापू आणि नारायण साई यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली होती. २००२ ते २००५ दरम्यान नारायण साईने वारंवार तिच्यावर बलात्कार केल्याचे लहान बहिणीने तक्रारीत सांगितले होते. सुरतमधील आसारामच्या आश्रमात राहात असताना तिच्यावर बलात्कार झाला, असे पीडित मुलीने सांगितले होते. दुसरीकडे, मोठ्या बहिणीने तक्रारीत आसारामवर बलात्काराचा आरोप केला होता. अहमदाबाद येथील आश्रमात आसारामने तिच्यावर अनेकवेळा बलात्कार केल्याचे पीडितेने सांगितले. दोन्ही बहिणींनी पिता-पुत्राच्या विरोधात स्वतंत्र तक्रारी केल्या आहेत.
आसाराम बापू जोधपूरच्या तुरुंगात
आसाराम बापू सध्या जोधपूरच्या तुरुंगात आहे. २०१८ मध्ये, जोधपूर न्यायालयाने त्याला एका वेगळ्या लैंगिक अत्याचार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. २०१३ मध्ये जोधपूरच्या आश्रमात १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी तो दोषी आढळला होता.