सात कोटींचा गंडा घालणारा अटकेत

ग्रेविल हेन्री वाझला जुने गोवा पोलिसांकडून अटक

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
30th January 2023, 12:10 Hrs
सात कोटींचा गंडा घालणारा अटकेत

पणजी : जादा व्याजाचे आमिष दाखवून सुमारे ७ कोटी रुपयांची फसवणूक केलेल्या आणि मागील अनेक महिने फरार असलेल्या संशयित ग्रेविल हेन्री वाझ (३७, ठाणे - महाराष्ट्र) याला जुने गोवा पोलिसांनी अटक केली आहे. त्याला पश्चिम बंगाल येथील गोलाबारी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

जुने गोवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी अरूण कुमार सिंग (गुलाबारी - पश्चिम बंगाल) यांनी १९ एप्रिल २०२२ रोजी गुलाबारी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. त्यानुसार, संशयित ग्रेविल हेन्री वाझ याने २ डिसेंबर २०१९ रोजी प्रस्ताव सादर करून १२ टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवून २.५ लाख रुपये गुंतवणूक करण्यास सांगितले. त्यानुसार तक्रारदाराने त्या दिवशीच प्रथम २.५ लाख गुंतवणूक केले. त्यानंतर संशयिताने ठरल्याप्रमाणे दोन महिन्यांत प्रत्येकी ३० हजार रुपये परतावा दिला. त्यानंतर संशयिताने तक्रारदाराला आणखीन गुंतवणूक करण्यास सांगितले. त्यानुसार तक्रारदाराने सुमारे ७.४ कोटी रुपये गुंतवणूक केले. त्यासाठी संशयिताने तक्रारदाराला प्रत्येक ४५ दिवसांत ५१.८० लाख रुपये देण्याचा करार केला. त्यानंतर संशयिताने ठरल्याप्रमाणे परतावा करण्यास नकार दिला. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी संशयित ग्रेविल हेन्री वाझ याच्यासह त्याची पत्नी आणि व्यवस्थापक धीरज सोनी याच्याविरोधात तक्रार दाखल केली. याची दखल घेऊन गुलाबारी पोलिसांनी वरील संशयिताविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ४०६, ४०९ आणि ४२० अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित आपले मुंबई येथील आस्थापन बंद करून पसार झाला आणि तो आपले ठिकाणी बदलू लागला. त्यानुसार गुलाबारी पोलीस त्याच्या मागावर होते. याच दरम्यान संशयित गोव्यात असल्याची माहिती तेथील पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी उत्तर गोवा पोलीस अधीक्षकांना याबाबत माहिती दिली. याची दखल घेऊन चौकशी सुरू केली असता, संशयित जुने गोवा परिसरात असल्याची माहिती समोर आली. त्यानुसार पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन यांच्या मार्गदर्शनाखाली जुने गोवा पोलीस निरीक्षक सतीश पडवळकर यांच्या नेतृत्वाखाली महिला उपनिरीक्षक मनिषा म्हार्दोळकर, पोलीस उपनिरीक्षक सुदीन रेडकर, एडवीन डिसा, विराज धावसकर, पोलीस कॉ. योगेश पाळनी, आशीर्वाद नाईक, किशन नाईक, सुदेश गावकर, उपेंद्र गावस व इतर पथकाने जुने गोवा परिसरात चौकशी सुरू केली. या दरम्यान संशयित खोर्ली परिसरात असल्याची माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी रविवारी संशयित ग्रेविल हेन्री वाझ याला ताब्यात घेतला. त्यानंतर त्याला अटक केल्यानंतर गुलाबारी पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक शिरशेंदो कुंदो यांच्या स्वाधीन केले.