दुसऱ्या टी-२०मध्ये भारताचा किवीविरुद्ध विजय


29th January 2023, 11:17 pm
दुसऱ्या टी-२०मध्ये भारताचा किवीविरुद्ध विजय

न्यूज डेस्क। गोवन वार्ता

लखनऊ : टी-२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ६ गडी राखून पराभव केला. रविवारी लखनऊमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात न्यूझीलंडचा संघ प्रथम फलंदाजी करताना केवळ ९९ धावा करू शकला. प्रत्युत्तरात भारताने अखेरच्या षटकात ४ विकेट्स राखून सामना जिंकला. 

टीम इंडियाने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. याआधी रांचीमध्ये झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने विजय मिळवला होता. लखनऊमध्ये भारताकडून अर्शदीप सिंगने २ बळी घेतले. तर सूर्यकुमार यादवने नाबाद २६ धावा केल्या.

भारताकडून शुभमन गिल आणि ईशान किशन सलामीला आले. यादरम्यान शुभमन ११ धावा करून बाद झाला. त्याने ९ चेंडूंचा सामना करताना २ चौकार मारले. इशान किशनने ३२ चेंडूत १९ धावा केल्या. इशाननेही २ चौकार मारले. राहुल त्रिपाठी १८ चेंडूत १३ धावा करून बाद झाला. वॉशिंग्टन सुंदर धावबाद झाला. त्याने ९ चेंडूंचा सामना करत १० धावा केल्या. सुंदरनेही चौकार लगावला.

न्यूझीलंडला ९९ धावांत रोखले

प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंड संघाला ८ गडी गमावून केवळ ९९ धावा करता आल्या. संघाकडून कर्णधार सँटनरने सर्वाधिक १९ धावा केल्या. २३ चेंडूंचा सामना करताना त्याने एक चौकारही मारला. सलामीवीर फिन ऍलन ११ धावा करून बाद झाला. कॉनवेलाही केवळ ११ धावा करता आल्या. चॅम्पमन २१ चेंडूत १४ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. ग्लेन फिलिप्स ५ धावा करून बाद झाला. डॅरिल मिशेलही काही विशेष करू शकला नाही, तो ८ धावा करून बाद झाला.

अर्शदीप सिंगची शानदार गोलंदाजी

भारताकडून अर्शदीपने शानदार गोलंदाजी केली. त्याने २ षटकांत केवळ ७ धावा देत २ बळी घेतले. कुलदीप यादवने ४ षटकांत १७ धावा देत १ बळी घेतला. दीपक हुडाने ४ षटकांत १७ धावा देत १ बळी घेतला. युझवेंद्र चहलने २ षटकांत ४ धावा देत १ बळी घेतला. त्याने एक मेडन ओव्हरही काढली. वॉशिंग्टन सुंदर आणि हार्दिक पांड्यालाही प्रत्येकी एक यश मिळाले.