आत्मज्ञानींना भूतमात्रांमध्ये भेद दिसत नाही

ज्याप्रमाणे सद्भाग्याला दैन्य माहीत नसते, जसे भ्रांती म्हणजे काय हे विवेकाला माहीत नसते, जसा सूर्य अंधाराचा साधा नमुनाही स्वप्नात सुद्धा बघू शकत नाही, जशी अमृताच्या कानी मृत्यूची वार्ताही येऊ शकत नाही आणि जशी चंद्राला तीव्रता ठाऊक नसते; तसे जे आत्मज्ञानी झालेत त्यांना भूतमात्रांमध्ये भेद हे आजिबात दिसत नाहीत.

Story: विचारचक्र । मिलिंद कारखानीस |
27th January 2023, 10:11 pm
आत्मज्ञानींना भूतमात्रांमध्ये भेद दिसत नाही

गीतेच्या पाचव्या अध्यायाच्या तेराव्या श्लोकाचा अर्थ गेल्या लेखात आपण बघितला होता. इंद्रियांवर नियंत्रण ठेवून फलाची अपेक्षा न करता वाट्यास आलेली विहीत कर्मे करणारा माणूस सतत महा-बोध सुखाच्या आनंदसागरात डुंबत असतो. या लेखात त्याच्या पुढचे श्लोक बघूया.      

न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभु:।      

न कर्मफलसंयोगं स्वभावस्तु प्रवर्तते।।१४।।      

अर्थात, परमेश्वर भूतप्राण्यांचे कर्तेपण उत्पन्न करीत नाही, कर्मेही उत्पन्न करीत नाही व त्यांचा कर्मफलांशी संयोगही उत्पन्न करीत नाही. परंतु परमात्म्याच्या सान्निध्याने प्रकृतीच वर्तत असते. अर्थात गुणच गुणात वर्तत आहेत. म्हणजे अनेक प्रकारच्या गुणदोषांचे वेगवेगळ्या प्रमाणात एकत्रिकरण होऊन तेच आपापल्या परीने नांदत असतात.      

खरे तर सच्चिदानंद परब्रह्म परमात्मा जो सर्वेश्वर आहे, तो अकर्ता आहे. पण सगळे चराचर तोच रचतो. यापरत्वे त्याला जर कर्ता म्हणावे तर तो कर्तृत्वापासून पूर्णपणे अलिप्त असतो. आपल्या सगळ्या कर्मांच्या बाबतीत तो यथार्थपणे सर्वांगाने उदासीन असतो. एकीकडे त्याच्या अकर्तेपणाची घडीही मोडत नाही आणि दुसरीकडे त्याची योगनिद्राही (म्हणजे सहजस्वरूप स्थिती) मोडत नाही, पण स्वभावतःच तो पंचमहाभूतात्मक सगळ्या पसाऱ्याची उभारणी करतो. संपूर्ण जगाच्या जीवात असूनही व स्वभावताच जग होत असताना तो पाहत असूनही त्याला त्याची वार्ताही नसते, आणि तो कधीच कुणाचा नसतो. हे स्पष्टीकरण लक्षात यायला तसे जरा कठीण आहे.      

नाssदत्ते कस्यचित्पापं न चैव सुकृतं विभु:।      

अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तवः ।।१५।।      

सर्वव्यापी परमात्मा कोणाचेही पाप ग्रहण करीत नाही किंवा पुण्यही ग्रहण करीत नाही. मायेने ज्ञानाला झाकले आहे. त्यामुळे सर्व जीव मोहित होत असतात. 

खरे तर सगळी पाप-पुण्ये समोर असूनही तो (परब्रह्म परमात्मा) त्यांच्याकडे ढुंकूनही बघत नाही. त्यांचे साक्षित्व ही त्याच्याकडे नाही. तो सर्वेश्वर आकाराच्या संगतीने साकार होऊन स-आचार कितीही खेळला तरी त्याच्या निराकारपणाला कधीही कोणतीही बाधा येत नाही. आणि अर्जुना, चराचर जगाची निर्मिती, पालन आणि संहार करतो असे जे म्हणतात ना, तेही सर्वथैव अज्ञानामुळे म्हणतात हे तू तत्वत: जाणून घे.      

ज्ञानेन तु तदज्ञानं येषां नाशितमात्मन:।      

तेषामादित्यवज्ज्ञानं प्रकाशयति तत्परम्।।१६।।      

परंतु ज्यांचे ते अंत:करणातील अज्ञान आत्मज्ञानाने नष्ट झाले त्यांचे ते ज्ञान सूर्याप्रमाणे त्या सच्चिदानंदघन परमात्म्याला प्रकाशित करते.      

जेव्हा भ्रांतीची काजळी निघून जाते तेव्हा ते अज्ञानही मावळते. भ्रांती नष्ट झाली की ईश्वराचे (म्हणजे सच्चिदानंदघन परब्रह्माचे) अकर्तृत्व / अकर्तेपण खऱ्या अर्थाने प्रकटते. अशा प्रकारे ईश्वर हा अकर्ता असल्याचे मनाला यथोचित पटले, आणि 'तो म्हणजेच मी स्वतः' हे आधीपासूनच सहजसिद्ध असल्याचा विवेक चित्तात प्रकटला, की मग या तिन्ही लोकांमध्ये भेद तो काय आणि कसा दिसणार? मग ज्याप्रमाणे पूर्वेच्या मंदिरांत सूर्योदयामुळे जशी दिवाळी सुरू होऊन दाही दिशांचा अंधार स्वाभाविकपणे दूर होतो, त्याचप्रमाणे मनाच्या अशा स्थितीत पोचलेल्याला हे संपूर्ण दृश्यजात मुक्त दिसायला लागते. म्हणजे या सगळ्या दृश्य विश्वाशी आपल्याला तत्वतः काहीही देणेघेणे नाही हे त्याला खऱ्या अर्थाने उमगते.      

तद्बुद्धयस्तदात्मानस्तन्निष्ठास्तत्परायणा:।      

गच्छन्त्यपुनरावृत्तिं ज्ञाननिर्धूतकल्मषा:।।१७।।      

आणि हे अर्जुना, ज्यांची बुद्धी तद्रूप झाली, ज्यांचे मन तदाकार झाले, त्या सच्चिदानंदघन परमात्म्याशी जे निरंतर ऐक्यभावाने स्थित होऊन राहिले, असे तत्परायण व ज्ञानाने पाप-मळ धुऊन गेलेले पुरुष अपुनरावृत्तीप्रत म्हणजे परमगतीप्रत पोहोचतात.      

हे सत्य (म्हणजे खरे, मूळ, योग्य) व्यापक असे सर्वोत्तम ज्ञान ज्या ज्या महाभागांना धुंडाळत आले आहे, त्यांच्या समदृष्टीची थोरवी किती वानू धनंजया? ते आपले स्वतःचे ब्रह्मरूप जसे सर्वार्थाने बघतात तसेच ते संपूर्ण विश्वाचेही बघतात. त्या दृष्टीचे आश्चर्य सांगायचे म्हणजे -  ज्याप्रमाणे सद्भाग्याला दैन्य माहीत नसते, जसे भ्रांती म्हणजे काय हे विवेकाला माहीत नसते, जसा सूर्य अंधाराचा साधा नमुनाही स्वप्नात सुद्धा बघू शकत नाही, जशी अमृताच्या कानी मृत्यूची वार्ताही येऊ शकत नाही आणि जशी चंद्राला तीव्रता ठाऊक नसते; तसे जे आत्मज्ञानी झालेत त्यांना भूतमात्रांमध्ये भेद हे आजिबात दिसत नाहीत.      

विद्याविनयसंपन्ने ब्राह्मणे गवि हस्तिनि।      

शुनि चैव श्वपाके च पण्डिताः समदर्शिन:।।१८।।      

असे ते ज्ञानीजन हे विद्या व विनययुक्त ब्राह्मण, तसेच गाय, हत्ती, कुत्रा आणि चांडाळ या सर्वांमधे समदृष्टी ठेवणारे म्हणजे आत्मतत्व बघणारे असतात.      

मग हा चिलट, हा हत्ती, हा हरिजन, हा ब्राह्मण, हा परका, हा आपला असा भेद ते ज्ञान प्राप्त झालेले करीत नाहीत. जसे जागा असलेल्याला स्वप्न दिसत नाही, तसेच ज्ञानप्राप्ती झालेल्याला ही गाय अथवा हा कुत्रा, एक लहान व दुसरा थोर असा भिन्नभाव दिसत नाही. ज्याला अहंभाव असतो त्याला असे भेद जाणवतात. पण ज्ञानीजनांच्या ठिकाणी अहंभावाचाच जिथे समूळ उच्छेद झालेला असतो, तिथे संपूर्ण जगतामधे भिन्नभावास ठाव तो काय उरणार?      

इहैव तैर्जित:सर्गो येषां साम्ये स्थितं मनः।      

निर्दोषं हि समं ब्रह्म तस्माद्ब्रह्मणि ते स्थिता:।।१९।।      

ज्यांचे मन समत्वभावांत स्थित झालेले आहे त्यांच्याकडून या जन्मीच संपूर्ण संसार जिंकला गेला; म्हणजे ते जिवंतपणीच संसारापासून म्हणजे जिवंत जीवांच्या कार्यकालापापासून तत्वतः मुक्त आहेत. कारण सच्चिदानंदघन परमात्मा निर्दोष व सम आहे. म्हणून ते सच्चिदानंदघन परमात्म्यातच स्थित आहेत. (क्रमशः)