ते खोटारडे होते का ?

Story: अनुभव | डॉ. रुपेश पाटकर |
03rd December 2022, 09:09 pm
ते खोटारडे होते का ?

आई, तुम्ही ओळखले का याला? माझ्या एका नातेवाईक बाईंनी आपल्या सासुबाईंना विचारले. खरं तर मला तो प्रश्न जरा विचित्र वाटला होता. कारण मी त्यांच्याकडे अगदी लहान असल्यापासून जात होतो. फक्त अलीकडे मी मेडिकल कॉलेजमध्ये गेल्यापासून गेले वर्षभर फक्त गेलो नव्हतो. बर्‍याच दिवसात न पाहिल्यामुळे कदाचित त्यांना मला ओळखणे कठीण जाईल म्हणून सूनबाई असे म्हणाल्या असतील असे मला वाटले. मी त्यांच्या घरी पोचलो तेव्हा सासूबाई बाहेरच्या सोफ्यावर बसल्या होत्या. मला बघून त्या ओळखीचे हसल्या. त्यांच्या सुनेने जेव्हा त्यांना मला ओळखले का विचारले त्यावर त्या "हो!" म्हणाल्या. "कोण तो?"

"कोण म्हणजे? माझा भाऊ!" त्यांच्या या उत्तराने मला भांबावल्यासारखे झाले. मी त्यांच्या नातवाच्या वयाचा होतो. त्यांचे दोन्ही भाऊ पंचाहत्तरी ओलांडलेले होते. त्यामुळे त्यांनी मला त्यांचा भाऊ म्हणणे मला फारच विचित्र वाटले. "कुठचा भाऊ?"

"यशवंत. आम्ही त्याला नाना म्हणतो. बरी आहेत ना सगळी?" आजींनी विचारले. मी फक्त हसलो. "अहो, रूपेश तो. आनंदचा मुलगा," सूनबाई म्हणाल्या. पण आजींना काहीच संदर्भ लागला नाही. 

"अलीकडे असेच करतात. जुन्या काळात असल्यासारख्या वागतात. जुने सगळे आठवते, पण आत्ता बोललेली गोष्ट मात्र आठवत नाहीत. स्मृतिभ्रंश म्हणावा तर पूर्वीचे सगळे आठवते. बालपणीच्या सगळ्या गोष्टी अचूक सांगत असतात. परवा दुपारी यांनी गम्मतच केली. या जेवून बसल्या होत्या. तेवढ्यात त्यांची बहीण आली. दुपारची वेळ म्हणून मी तिला जेवायचा आग्रह केला. तिला मी जेवायला वाढले आणि मीही बसले तिच्यासोबत. या म्हणाल्या मला नाही का वाढलेस? काय वाटणार सांग, यांच्या बहिणीला? सून जेवू घालत नाही असेच वाटणार ना," सूनबाई वैतागत म्हणाल्या. हे ऐकत असताना मी आजींच्या चेहर्‍याकडे पाहत होतो. आजींचा चेहरा एकदम पडला. 

आजी जे सांगत होत्या त्यात तथ्य नव्हते.  त्यांच्या सूनबाईनी त्यांना उपाशी ठेवले नव्हते. मग त्या जाणूनबुजून खोटे बोलत होत्या का?

सूनबाईंचा त्रागा समजण्यासारखा होता. पण आजींना काय झालेय ते सूनबाईंना समजत नव्हते.

आजींना स्मृतिभ्रंश म्हणजे डिमेंशिया झाला होता. त्यांच्या मेंदूच्या पेशी मरू लागल्या होत्या. या आजाराचं स्वरुप असं असतं की यात जुन्या गोष्टी आठवतात पण नुकत्याच ऐकलेल्या गोष्टी मात्र आठवत नाहीत. सर्वसाधारणपणे, आपला असा अनुभव असतो की खूप दिवसांपूर्वी ऐकलेलं व्याख्यान किंवा घटना आपल्याला आठवत नाही. पण नुकतंच ऐकलेलं आठवतं. जसाजसा वेळ जातो तसतसं त्या व्याख्यानाचे किंवा घटनेचे तपशील विसरले जातात. काही महिन्यांनी पूर्ण विसर पडतो. त्यामुळे सूनबाईचा तर्क होता की सासूबाईंना जुन्या गोष्टी आठवत असतील तर त्यांची आठवण अशक्त होत चालली आहे असे कसे म्हणावे. पण आजींना झालेल्या आजारात पहिली क्षमता जाते ती 'शॉर्टटर्म मेमरी'ची. लाॅन्गटर्म मेमरी किंवा जुन्या आठवणी बराच काळ शिल्लक राहतात. त्यामुळे त्या नुकतेच जेवलेले विसरून गेल्या होत्या. त्या ते मुद्दाम करत नव्हत्या. त्यांना मी त्यावेळी त्यांचा भाऊच वाटलो होतो. पंधरा दिवसांनी मी पुन्हा जेव्हा त्यांच्या घरी गेलो तेव्हा त्यांना मी त्या जेव्हा नागपूरला राहत होत्या तेव्हा त्यांच्या शेजारी राहणार्‍या जोश्यांचा मुलगा वाटलो होतो. 

आजींना आपण तथ्य नसलेले बोलतोय वा वागतोय हे ठाऊक देखील नाहीत. त्यामुळे त्यांना त्याबाबत प्रश्न विचारले तर त्याचा उपयोग तर काहीच होणार नव्हता, उलट त्या क्षणी त्या दुखावल्या जाणार होत्या. "तुम्ही स्वतः त्यांच्या जागी स्वतःला ठेवून विचार करा की तुम्हाला दुसर्‍याने तुम्ही खोटे बोलता म्हटले किंवा प्रश्न विचारून तुम्ही खोटे बोलत आहात हे दाखवण्याचा प्रयत्न केला तर...आणि त्याचवेळी तुम्हाला मात्र तुम्ही खोटे बोलला हेच ठाऊक नसेल तर कसे वाटेल?" मी सूनबाईंना म्हटले. 

"मी असा विचार कधीच केला नाही. त्या भांबावतात हे मी पाहिलेय. एकदम अपराध्यासारख्या गप्प बसतात. मी असे त्यांच्याशी बोलायला नको होते," सूनबाई म्हणाल्या. 

यात सूनबाईंचा दोष नव्हता. त्यांना आजींच्या वागण्याचे कारण समजत नव्हते. लोकांच्या पुढ्यात 'आपल्याला सूनेने वाढले नाही' , असे सांगून त्या इतरांच्या नजरेत आपल्याला कमी दाखवू इच्छितात असे आतापर्यंत सूनबाईंना वाटत होते. पण यापुढे सासूबाईंनी तथ्य नसलेले काहीही सांगितले तरी खोटे काय सांगताय असे बोलायचे नाही की प्रश्न विचारून त्यांना खोटे ठरवायचे नाही असे त्यांनी ठरवले. 

त्या दिवसापासून सूनबाईंचा दृष्टिकोन बदलल्यामुळे त्यांना आता आजींचे बोलणे आपल्याला त्रास देण्यासाठी आहे असे वाटेनासे झाले. 

यापेक्षा थोडा वेगळा प्रकार मला माझ्या इंटर्नशिपच्या काळात पाहायला मिळाला. मी माझ्या हाऊसमनसोबत संध्याकाळचे राऊंड घेत होतो. माझे काम नाडी व ब्लडप्रेशर नोंदवणे होते. हाऊसमन पेशन्टची मानसिक स्थिती तपासात असे. आम्ही क्लोज वॉर्डात पोचलो तेव्हा साठीच्या आसपासचे एक आजोबा 'गुड इव्हिनिंग डाॅक!' म्हणत सामोरे आले. एकदम नम्र, गोड हसतमुख चेहरा. बरेचसे पिकलेले केस पण थोड्याशा कुरळेपणाने असेल नीट विंचरल्यासारखे वाटत होते. राऊंडच्या सुरुवातीलाच 'अलफ्रेड' म्हणून सिस्टरने हाक मारताच ते आमच्या समोर येऊन बसले. 

"कसे आहात?"

"मस्त!"

"सिस्टर, यांचे कोणी रिलेटीव आले होते का?" हाऊसमनने नर्सला विचारले. त्यावर नर्स काही बोलणार त्या आधीच अलफ्रेड आजोबा म्हणाले, "मला कोणी रिलेटीव नाही डाॅक."

"तुमची मिसेस आणि मुलगा आला होता ना अ‍ॅडमिट करताना," हाऊसमन म्हणाला. 

"डॉक, अजून माझ लग्न व्हायचं आहे. लवकरच लग्न करेन आणि सेटल होईन!" अलफ्रेड म्हणाले. 

"या वयात?" मी पटकन बोलून गेलो. 

"झाली ना मला तीस पूर्ण! हेच वय ना लग्नाचे!" ते म्हणाले. त्यांच्या बोलण्यावर हाऊसमनने स्मित केले. मला त्यांच्याबद्दल आणखी जाणून घ्यायचे होते पण हाऊसमनला राऊंड लवकर संपवायचे होते. त्यामुळे त्याने पुढचा पेशन्ट बोलावला. त्या वॉर्डातून बाहेर पडताना मी अलफ्रेड काकांचा विषय काढला. हाऊसमन म्हणाला, "त्याला  'रेट्रोग्रेड ॲम्नेजिया' आहे, कोर्सोकावज सिंड्रोममुळे!"

खरे सांगायचे तर मला त्यावेळी त्या दोन्ही शब्दांचे अर्थ समजले नाहीत. माझ्याकडे मेडिकल शब्दांचे अर्थ सोप्या इंग्रजीत सांगणारी डिक्शनरी होती. घरी परतल्यावर त्या डिक्शनरीमध्ये ते दोन्ही शब्द मी शोधले. 'रेट्रोग्रेड ॲम्नेजिया' चा अर्थ होता, मेंदूला इजा झाल्यामुळे इजा होण्यापूर्वीची आठवण पुसली जाणे. हे मी रस्ते अपघातात डोक्याला मार लागलेल्या पेशन्टच्या बाबतीत पाहिले होते. इंटर्नशिपच्या काळात सर्जरी विभागात काम करताना एक पेशंट मला भेटला होता ज्याला अपघात झाला त्याच्या आधी दोन दिवसात त्याने अनुभवलेले काहीच आठवत नव्हते. 

'कोर्सोकावज सिंड्रोम' या शब्दाचा अर्थ होता दारूच्या अति सेवनामुळे होणारा मेंदूचा एक आजार. ज्यात पेशंटची स्मृती जाणे हे एक लक्षण दिसते. त्याचे कारण असते बी-1 जीवनसत्वाची कमतरता. सतत दारू पिणाऱ्या व्यक्तीचे आतडे हे जीवनसत्व शोषून घेऊ शकत नाही.

(क्रमश)