वनभोजन एक पर्वणी

आनंददायी शिक्षणातील ‘वनभोजन’ हा सहशालेय उपक्रम आहे. प्राथमिक शाळेतील या उपक्रमाचा वेध दिवाळी सुट्टीनंतर विद्यार्थ्यांना लागतो. ‘मार्गशीष-पौष’ महिन्यात थंडावा अनुभवणारा हा उपक्रम असतो. पूर्ववत चालत आलेली ही प्रथा आजही तेवढ्याच जोमाने प्राथमिक शाळेत सुरू आहे. शिक्षक आजही त्याच उमेदीने शाळेचे वनभोजन आयोजित करताना पहायला मिळतात. हा लेख वाचताना शाळेत अनुभवलेली वनभोजनाची पर्वणी आपल्याही स्मृतीला उजाळा देऊन जाणार आहे.

Story: असे उपक्रम अशी शाळा | संकेत सुरेश नाईक |
03rd December 2022, 09:02 pm
वनभोजन एक पर्वणी

आल्हाददायक गुलाबी थंडी, सकाळच्या दाट धुक्यात, माळरानातील पायवाटेवरून चालताना दवामुळे झुकलेले गवत पायाने तुडवत एका रांगेत चाललेलो आम्ही. पाय वनभोजनास्थळी पोहोचेपर्यंत ओलेचिंब झाले होते. शाळा, वाड्यापासून दूर जंगलात अज्ञातस्थळी आमची फलटन चालली. नितळ निवांत अशा पाणथळी किंवा वड, पिंपळ, अशा गगनचुंबी पर्ण छत्रछायेखाली डबाभोजन असेल तर बटाट-भाजी, पाव व चपाती, वाटाणे, फजाव आदि कडधान्याची आमटी (रोस), एखाद-दुसरा विद्यार्थी चिकन सागोती घेऊन येतो. या खाद्यपदार्थ्यांनी भरलेले डबे व पाण्याच्या बाटल्या दगडावर, खोडाच्या बाजूला विसावतात. 

जर जेवण बनवण्याचा बेत असेल, तर वनभोजन परिसर नितळ केला जातो. तीन दगडाच्या चुलीवर मोठ-मोठी पातेली, एका बाजूने पक्वान्नासाठी लागणारी तयारी करण्यात शिक्षक-पालक व्यस्त असतात, तर नंतर विद्यार्थ्यांबरोबर जेवणावर ताव मारण्यात ते दंग असतात. वनभोजनावेळी  पाल्य तहान-भूक विसरून खेळण्यात दंग असतात. 

शाळेचे वनभोजन जाणार याचा गलका संपूर्ण वड्याला-गावाला झालेला असतो. त्या दिवसात चव्हाट्यावर, चहाच्या गाड्यावर, महिलांच्या संध्याकाळच्या गप्पागोष्टींमध्ये, घोळक्या-घोळक्यामध्ये ‘वनभोजन’ यावर परिसंवाद आपोआप रंगतात. जो-तो ‘अध्यक्षपद’ भुषवतो. सर्व परिसंवादाचे तात्पर्य एकच, ‘आमच्या वनभोजनाची बातच न्यारी होती’. एकंदर शाळेच्या वनभोजनासंदर्भात वातावरण निर्मिती पूर्ण गावाने केलेली असते. जसे गावात तसे शाळेत.  

वनभोजन हे पालक-शिक्षक-ग्रामस्थ या त्रिवेणी संगमाने पार पडते. शाळा व्यवस्थापन समिती-पालक शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने बैठक आयोजित करून ‘डबाभोजन का वनभोजन’ ठरवून उपक्रम आखला जातो. शाकाहारी/मांसाहारी भोजनाचा बेत या ठिकाणी ठरविण्यात येतो. त्यानुसार किराणामालाची पालक –ग्रामस्थामध्ये विभागणी होते. वनभोजन स्थळ हे पिण्याचे पाणी पाहून कुळागरात, नदीकिनारी, देवराईत, किल्ल्यावर, विस्तीर्ण वडाखाली, चौपाटीवर, गोठणीवर, पांडवकालीन स्थळांवर होते. जेवणाच्या मेजवानीसाठी बाहेरील अतिथीला शाळेतर्फे आंमत्रण पाठवले जाते. असा हा आनंदाचे उधाण असलेला शालेय उपक्रम आपण आजही करु शकतो. तुमच्या जवळच्या शाळेचे जर वनभोजन जाणार असेल तर  उपक्रमाला आर्थिक-वस्तू स्वरूपात साहित्य पुरवून वनभोजनाचा अविभाज्य होऊ शकता. त्याकरीता शाळेची दारे सदैव खुली असतात.        

गुरूकुल शिक्षणावेळी तयार झालेला ‘वनभोजन’ हा सहशालेय उपक्रम आहे. शांतिनिकेतनाची उभारणी करणारे तत्त्वज्ञ रवींद्रनाथ टागोर वा समाज सुधारक साने गुरुजी (पांडूरंग सदाशिव साने) आदींच्या शिक्षणातील गाभा निसर्गाच्या सानिध्यात घडला. वनभोजनाची संकल्पना लोकांना आवडली व ती  शालेय शैक्षणिक उपक्रमात समाविष्ट करून घेतली. 

'अशी शाळा असे उपक्रम' अंतर्गत चाललेल्या प्रस्तुत उपक्रमात आपण मुलांना पक्षी-निरीक्षण, वृक्षसंपदा, पाणथळ जागेविषयी, कृमी किटक, कृषीज्ञान, ऐतिहासिक स्थळे, देवराई आदी विषयांवर माहिती देऊ शकतो. संगीत खुर्ची, पासिंग द बॉल, संख्यानुसार गट करणे, मला ओळखा (व्हू आय अ‍ॅम) यासारखे मनोरंजनात्मक खेळ आपण पाल्य व पालकांबरोबर खेळू शकतो. शालेय स्तरावर होणारे वनभोजन ही वेगळी पर्वणी शाळकरी मुलांना असते. शाळेपासून दूरवर असलेल्या नैसर्गिक ठिकाणी निसर्गाच्या सानिध्यात एकत्रितपणे आगळावेगळा अनुभव वनभोजनातून मिळतो. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेला अधिक बळकटी मिळते म्हणून अशा इव्हेंटची शाळकरी मुले नेहमीच वाट पाहत असतात.