मराठा आरक्षणासाठी, कर्नाटकात ‘चलो सुवर्णसौध’ जागृती सुरू

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
03rd December 2022, 07:22 pm
मराठा आरक्षणासाठी, कर्नाटकात ‘चलो सुवर्णसौध’ जागृती सुरू

बेळगाव : कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची तारीख जाहीर झाली आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटक मराठा क्षत्रिय फेडरेशनच्या वतीने हिवाळी अधिवेशनादरम्यान मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ‘चलो सुवर्णसौध’ची हाक देण्यात आली आहे. २० डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता बेळगावच्या सुवर्णसौध समोर कर्नाटक राज्यातील मराठा समाजबांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
नाटक क्षत्रिय मराठा समाज फेडरेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘चलो सुवर्णसौध’ मोहिमेच्या जनजागृती कार्यक्रमाला शनिवारपासून प्रारंभ करण्यात आला. शहापूर छत्रपती शिवाजी उद्यान येथील छत्रपती शिवरायांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून उपस्थित मान्यवरांनी चलो सुवर्णशोध आंदोलन यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
‘चलो सुवर्णसौध’ आंदोलनाच्या संदर्भात फेडरेशनचे अध्यक्ष श्यामसुंदर गायकवाड यांनी माहिती दिली. राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन १९ ते २९ डिसेंबर दरम्यान होणार आहे. या अधिवेशनात मराठा आरक्षणाकडे लक्ष वेधण्यासाठी कर्नाटक क्षत्रिय मराठा फेडरेशनच्या वतीने तयारी सुरू झाली आहे. राज्य सरकारने मराठा समाजाला अलीकडे विविध आश्वासने दिली आहेत. त्यापैकी काही मागण्या मान्य झाल्या असल्या तरीही अनेक मागण्या प्रलंबित आहेत. त्यापैकी एक महत्त्वाची मागणी म्हणजे मराठा समाजाला आरक्षण मिळावे. मराठा समुदायाला सध्या इतर मागास वर्ग ३ ब असे आरक्षण आहे. मात्र त्यांचा इतर मागासवर्ग २ अ मध्ये समावेश करण्यात यावा, अशी प्रमुख मागणी मराठा फेडरेशनच्या वतीने करण्यात आली आहे, अशी माहिती गायकवाड यांनी यावेळी दिली आहे.
मराठा आरक्षणा संदर्भात कर्नाटक मराठा फेडरेशनच्या वतीने बेंगलोर आणि दिल्ली येथे विविध मान्यवर नेत्यांना निवेदन देऊन मागण्यांकडे लक्ष वेध वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मराठा आरक्षणासंदर्भात सरकारचे लक्ष वेधण्यासाठी, हिवाळी अधिवेशनादरम्यान मराठा फेडरेशनच्या वतीने चलो सुवर्णसौधची हाक देण्यात आली आहे. २० डिसेंबर रोजी होणाऱ्या चलो सुवर्णसौध आंदोलनाची जनजागृती केली जात आहे. बेळगाव शहर, बेळगाव तालुका, खानापूर, संकेश्वर, निपाणी, चिकोडी अथणी, जमखंडी, गोकाक व रामदुर्ग येथे ‘चलो सुवर्णशोध’ जनजागृती बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे प्रत्येक तालुक्यातील मराठा समाज बांधवांनी आंदोलनाला यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे असेही गायकवाड यांनी स्पष्ट केले.