मुंबईत २१ मजली इमारतीला भीषण आग

जीवितहानी नाही; कारण अद्याप अस्पष्ट

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
03rd December 2022, 07:21 Hrs
मुंबईत २१ मजली इमारतीला भीषण आग

मालाडमधील इमारतीला लागलेली भीषण आग.

मुंबई : येथील उपनगरातील मालाडमधील एका २१ मजली इमारतीत भीषण आग लागली. या आगीत तीन घरे जळून खाक झाली. आगीतून वाचण्यासाठी एका तरुणीने खिडकीतून उडी मारली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी काही वेळेत आगीवर नियंत्रण मिळवले. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

मुंबईतील मालाड पश्चिम येथील जनकल्याण नगरमधील मरीना एनक्लेव्ह या २१ मजली इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास आग लागली. आगीची माहिती मिळताच, अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाचे सहा ते सात गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. आग लागल्याचे समजाताच रहिवाशांनी सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. आगीच्या भक्ष्यस्थानी आलेल्या एका घरातील तरुणीने खिडकीतून बाहेर उडी मारली. ही तरुणी बराच वेळ खिडकीच्या बाहेरील सज्जावर उभी होती. आगीच्या ज्वाळा वाढत असल्याने तिच्या सुटकेचे प्रयत्न सुरू होते. तिला शिडीच्या आधारे उतरवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, नाईलाजाने तिला उडी मारावी लागली. या तरुणीला कोणतीही दुखापत झाली नसल्याची माहिती आहे.