तांदूळ काळाबाजार; सचिन बोरकर, म्हार्दोळकरला सशर्त अटकपूर्व जामीन


02nd December 2022, 11:49 pm
तांदूळ काळाबाजार; सचिन बोरकर, म्हार्दोळकरला सशर्त अटकपूर्व जामीन

प्रतिनिधी। गोवन वार्ता                                                                              

पणजी : गोवा पोलिसांच्या गुन्हा शाखेने १४ आणि १५ नोव्हेंबर रोजी तीन ठिकाणी छापे मारून नागरी पुरवठा खात्यातील तांदूळ आणि गव्हाचा काळाबाजार उजेडात आणला होता. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार सचिन नाईक बोरकर व वीरेंद्र म्हार्दोळकर  या दोघांना पणजी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयाने २० हजार रुपये व इतर अटींवर सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.                   

गुन्हा शाखेने १४ आणि १५ रोजी कुर्टी-फोंडा, कुंडई येथील औद्योगिक वसाहतीत आणि  बोरी येथे स्वस्त धान्य दुकानावर छापा मारून ७.५२ लाख रुपये किमतीची ७६१ तांदळाची आणि २५३ गव्हाची मिळून १,०१४ पोती जप्त केली होती.  या प्रकरणात गुन्हा शाखेने प्रकाश कोरीशेट्टर या व्यावसायिकासह हजरत अली सय्यद, विनय कुमार गुडीमनी, तौसिफ मुल्ला आणि राम कुमार हजम या पाच जणांना अटक केली होती. पाचही  संशयितांना फोंडा येथील प्रथमवर्ग  न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला.       अटक करण्यात आलेल्या पाच संशयितांना फोंडा येथील प्रथमवर्ग  न्यायालयाने २० हजार रुपये व त्याच रकमेचा एक हमीदार व इतर अटींवर जामिनावर सुटका केली होती. या छाप्यामध्ये दोन ट्रक, दोन जीप व एक पिकअपही जप्त केली आहे.                               

या प्रकरणातील मुख्य सूत्रधार सचिन नाईक बोरकर व वीरेंद्र म्हार्दोळकर  या दोघांनी पणजी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. या प्रकरणी न्यायालयाने दोघा संशयितांना प्रत्येकी  २० हजार रुपये व त्याच रकमेचा एक हमीदार व इतर अटींवर अटकपूर्व जामिनावर सुटका केली आहे. 

हेही वाचा