मेस्सीने रचला इतिहास, अर्जेंटिनाची आगेकूच

‘सी’ गटात पोलंडला नमवले : दोन्ही संघ अंतिम १६मध्ये


01st December 2022, 11:16 pm
मेस्सीने रचला इतिहास, अर्जेंटिनाची आगेकूच

न्यूज डेस्क। गोवन वार्ता

दोहा : कतारचे यजमानपद असलेल्या फिफा विश्वचषक २०२२ मध्ये रात्री उशिरा ग्रुप ‘सी’ मध्ये दोन मोठे सामने खेळले गेले. यामध्ये लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखालील अर्जेंटिनाच्या संघाचा रॉबर्ट लेवांडोस्कीच्या संघ पोलंडशी रोमांचक सामना झाला. यामध्ये मेस्सीच्या संघाने २-० असा विजय मिळवला.

या विजयासह अर्जेंटिनाने आपल्या गटात अव्वल स्थान पटकावत उपउपांत्यपूर्व फेरीत स्थान निश्चित केले आहे. आता सुपर-१६ मध्ये अर्जेंटिनाचा सामना ‘ड’ गटातील दुसऱ्या क्रमांकाचा संघ ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. तर दुसऱ्या सामन्यात मेक्सिकोच्या संघाने सौदी अरेबियाचा २-१ असा पराभव केला.

हा सामना जिंकून मेक्सिकन संघाने पोलंडची गुणांच्या बाबतीत बरोबरी निश्चित केली, पण गोल फरकामुळे त्यांना उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवता आले नाही. अशाप्रकारे मेक्सिको आणि सौदी अरेबियाचा संघ ‘क’ गटातून बाहेर पडला आहे. अशाप्रकारे पोलंड गटात दुसऱ्या स्थानावर राहून सुपर-१६ साठी पात्र ठरला. जिथे ते गतविजेत्या फ्रान्सशी सामना करतील.

अॅलिस्टर-अल्वारेझचे  गोल

अर्जेंटिना आणि पोलंड यांच्यातील सामना पूर्वार्धात गोलशून्य बरोबरीत सुटला. मात्र उत्तरार्धाच्या सुरुवातीलाच अर्जेंटिनाच्या संघाने आपला खेळ आणखीनच आक्रमक केला. अॅलेक्सिस मॅक अॅलिस्टरने ४६व्या मिनिटाला संघासाठी पहिला गोल केला. म्हणजेच दुसऱ्या हाफला सुरुवात होताच पहिला गोल झाला.

यानंतर ज्युलियन अल्वारेझने अर्जेंटिनासाठी दुसरा गोल करत संघाला भक्कम आघाडी मिळवून दिली. हा गोल ६७व्या मिनिटाला झाला. या सामन्यात पोलंडचा संघ पूर्णपणे बचावाच्या स्थितीत दिसला, पण सामना वाचवू शकला नाही.