म्हापसा पालिका कर्मचाऱ्यांची मूक निदर्शने

मागण्याची पूर्तता करा, अन्यथा सोमवारपासून बेमुदत संपाचा इशारा

|
04th October 2022, 12:45 Hrs
म्हापसा पालिका कर्मचाऱ्यांची मूक निदर्शने

प्रतिनिधी। गोवन वार्ता

म्हापसा : येथील पालिका कर्मचारी वर्गाने चार्टर ऑफ डिमांड मागणीसाठी येत्या १० ऑक्टोबरपासून बेमुदत संप पुकारण्याची नोटीस पालिकेला दिली आहे. तरीही पालिका मंडळ कोणताही निर्णय घेत नसल्याच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून हाताला काळी पट्टी बांधून मूक निदर्शने केली.

ही मूक निदर्शने ९ ऑक्टोबरपर्यंत दुपारी जेवणाच्या सुट्टीच्या कालावधीत दुपारी १.४५ ते २ या वेळेतच केली जाणार आहेत. या दरम्यान मागणी पत्राला पालिका मंडळाने मंजुरी न दिल्यास दि. १० रोजी पासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी केला आहे.

पालिका कर्मचारी संघटनेने म्हापसा पालिका मंडळाला गेल्या जून २०२२ मध्ये १९ कलमी मागणीपत्र (चार्टड ऑफ डिमांड) सादर करून ते पुर्ण करण्याची मागणी केली होती. तसेच पालिका कर्मचारी संघटना व नगरपालिकेसोबतचा चार्टड ऑफ डिमांड करारपत्राची मुदत गेल्या सप्टेंबर २०२१ मध्ये संपुष्टात आली होती. या करापपत्राचे नूतनीकरण करण्याची मागणीही संघटनेने केली होती. पण या मागण्या अद्याप पुर्ण केल्या गेल्या नाहीत.

त्यामुळे गेल्या २१ सप्टेंबर २०२२ रोजी अखिल गोवा पालिका कर्मचारी संघटनेने पालिकेला बेमुदत संपाची नोटीस बजावली होती. मागणी पत्राला मंजूरी न दिल्यास दि. १० ऑक्टोबर पासून कर्मचारी बेमुदत संप पुकारतील, यास पालिका मंडळ जबाबदार असेल, असे संघटनेने नोटीसीमधून स्पष्ट केले होते. या नोटीसची प्रत पालिका संचालनालय, मुख्यमंत्री, नगरविकास मंत्री, उपसभापती, मुख्य सचिव, पालिका खात्याचे सचिव, कामगार आयुक्त व कामगार खात्याच्या सचिवांना पाठवली होती. पण पालिका तसेच कामगार आयुक्तांसह वरील एकाही संबंधित खात्याकडून संघटनेच्या या नोटीसीला प्रतिउत्तर दिलेले नाही. त्यामुळे कर्मचारी आक्रमक झाले आहेत.

मागण्या...

वैद्यकीय भत्त्यात वाढ, गंभीर आजारपणाचा गोमेकॉत उपचारासाठी पालिकेची एनओसी, सेवास्थळी अपघात घडल्यास उपचार खर्च व खास रजा, एमएसीपी लाभात वाढ, गणवेश भत्ता, वॉशिग भत्ता, कचरा भत्ता, ध्वजारोहण भत्ता, वेतन राखीव निधी राखणे, रिक्त पदे भरणे, कर्मचारी वरिष्ठता यादी, रेनकोट भत्ता, कर्मचाऱ्यांसाठी भूखंड-गृहनिर्माण योजना, कर्मचाऱ्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती, कर्मचारी व कुटुंबियांसाठी हर्ष वॅनची सोय, संघटनेच्या कार्यालयासाठी जागा, रोजंदारी कर्मचाऱ्यांचे वेतन महिन्याच्या १० तारखेपूर्वी द्यावे, रोजंदारी कर्मचाऱ्यांना सरकारच्या नियमानुसार सेवेत कायमस्वरूपी सामावून घेणे. या १९ कलमी मागण्यांचा यात समावेश आहे.

कर्मचारी, पदाधिकाऱ्यांची दांडी

या मूक निदर्शनावेळी काही कर्मचारी व पालिका कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनीही दांडी मारली होती. पालिका मंडळ व अधिकाऱ्यांच्या भितीपोटी हे कर्मचारी या आंदोलनापासून अलिप्त राहीले. त्यामुळे गैरहजर पदाधिकारी व कर्मचाऱ्यांवर संघटनेने योग्य ती कारवाई करण्याची शिफारस केली जाईल, असे आंदोलक कर्मचाऱ्यांनी सांगितले.