आरजी, काँग्रेसचे उमेदवार जाहीर

जिल्हा पंचायत पोटनिवडणूक : रेईश मागूश, कुठ्ठाळी, दवर्लीत राजकीय हालचाली गतिमान


04th October 2022, 12:32 am
आरजी, काँग्रेसचे उमेदवार जाहीर

प्रतिनिधी । गोवन वार्ता

पणजी : जिल्हा पंचायत पोटनिवडणुकीसाठी रिव्होल्युशनरी गोवन्स (आरजी) पक्षाने तीन उमेदवारांची नावे तर काँग्रेसने दोन उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. भाजपने मात्र अद्यापही आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केलेली नाहीत.

जिल्हा पंचायत पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊन आचार संहिता लागू झाली आहे. मात्र अद्यापही एकानेही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. अर्ज दाखल करण्यासाठी ६ आॅक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. अर्ज दाखल करण्यासाठी आता केवळ दोन दिवस उरले आहेत. जिल्हा पंचायत पोटनिवडणुकीबाबत राजकीय पक्ष तसेच उमेदवारांमध्ये मात्र अपेक्षित उत्साह नसल्याचे दिसून येत आहे. उमेदवारांची घोषणा करताना आरजीचे प्रमुख मनोज परब यांनी राज्याच्या स्थितीवर काळजी व्यक्त केली. राज्यात अमली पदार्थाचा वाढलेला वापर आणि बिघडलेला कायदा सुव्यवस्था हे गंभीर विषय असल्याचे त्यांनी सांगितले.

काँग्रेसचे दोन उमेदवार जाहीर

काँग्रेस पक्षाकडून दवर्ली आणि कुठ्ठाळी मतदारसंघाचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. दवर्लीत लिओन्सीओ रायकर, कुठ्ठाळी मतदारसंघात वँलेंट बार्बोजा यांची नावे उमेदवारीसाठी जाहीर करण्यात आली. रेईश मागूश जिल्हा पंचायत मतदारसंघाचे उमेदवार लवकर जाहीर होणार आहेत.

भाजपतर्फे अद्यापही उमेदवारांची घोषणा नाही

पोटनिवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय भाजपने सर्वात आधी जाहीर केला होता. मात्र उमेदवाराचे नाव मात्र अद्यापही जाहीर करण्यात आले नाही. उमेदवार निश्चित करण्यासाठी पक्षाची शनिवारी बैठक झाली. मंगळवारी उमेदवार जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

अद्याप एकही उमेदवारी अर्ज नाही

जिल्हा पंचायत पोटनिवडणुकीसाठी १६ आॅक्टोबर रोजी मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज स्वीकारण्यासाठी २८ सप्टेंबरपासून सुरुवात झाली. अद्याप पर्यंत एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. अर्ज भरण्याची ६ आॅक्टोबर ही शेवटची तारीख आहे.