बाॅम्बस्फोटाचा कट उधळला

हैदराबादमध्ये तीन दहशतवादी अटकेत; तेलंगणा पोलिसांची कारवाई


04th October 2022, 12:18 am
बाॅम्बस्फोटाचा कट उधळला

न्यूज डेस्क । गोवन वार्ता

हैदराबाद : तेलंगणा पोलिसांनी केलेल्या कारवाईत हैदराबादमध्ये राहणाऱ्या आणि लश्कर ए तोयबाच्या तीन संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे.

या दहशतवाद्यांच्या टार्गेटवर भाजप आणि संघाचे दसऱ्याचे कार्यक्रम आणि दसऱ्याच्या मिरवणुका होत्या. दसऱ्याच्या कार्यक्रमांमध्ये बॉम्ब पेरून स्फोट घडवण्याचा या दहशतवाद्यांचा कट होता. हे दहशतवादी बॉम्ब फेकून सणांमध्ये स्फोट घडवणार होते; पण पोलिसांनी त्यांचा कट उधळून लावला आहे. मोहम्मद अब्दुल जाहेद उर्फ मोटू (रा. मुसर्रमबाग), मोहम्मद समीउद्दीन (रा. मलकपेठ), आणि माझ हसन फारूक (रा. हुमायूनगर) या तिघांना जुन्या हैदराबादजवळच्या परिसरातून अटक करण्यात आली.

पोलिसांनी त्यांच्याकडून ४ हातबॉम्ब, ४ लाखांची रोकड आणि आक्षेपार्ह कागदपत्र जप्त केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप नेत्यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आले आहेत. तेलंगणाची गुप्तचर यंत्रणा आणि विशेष कृती दलाने (एसटीएफ) दहशतवाद्यांचा हा कट उघड केला आहे.

धर्मांमध्ये द्वेष निर्माण करणे, दहशत माजवणे आणि नागरिकांमध्ये भीती निर्माण करण्याचा त्यांचा कट होता, अशी कबुली संशयितांनी दिली आहे.

सीमेपलीकडे असलेले लष्कराचे हँडलर्स पाकिस्तानची गुप्तचर संस्था 'आयएसआय'च्या गुप्तहेराच्या संपर्कात होतो, अशी माहिती सूत्रधार जाहेद याने रविवारी दिली. फरार असलेले तीन संशयित फरहतुल्लाह घौरी, सिद्दीक बिन उस्मान आणि अब्दुल माजिद हे पाकिस्तानमध्ये आहेत आणि ते आयएसआयसाठी काम करत असल्याचे सांगण्यात येत आहे.

अन्य ३ दहशतवादी फरार; गुन्हे दाखल

संशयित दहशतवाद्यांविरोधात देशद्रोहाच्या कायद्यांतर्गत (यूएपीए) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, एफआयआरमध्ये आणखी चौघांची नावे आहेत. यात अदिल अफरोज, अब्दुल हदी, सोहेल कुरेशी आणि अब्दुल कलीम उर्फ हदी ही त्यांची नावे आहेत. ते सध्या फरार आहेत.

भाजप व आरएसएस होते टार्गेटवर

जाहेद आणि त्याचे साथीदार हे सणासुदीच्या काळात भाजप आणि आरएसएसच्या कार्यक्रमात आणि मिरवणुकांमध्ये हातबॉम्ब फेकणार होते. हल्लेखोर भरती करण्यासाठी आणि दहशतवादी हल्ले करण्यासाठी घौरी, हंजला आणि माजीद हे जाहेदला पैसै पुरवत होते, अशी माहिती एसआयटीच्या अधिकाऱ्याने दिली. जाहेद हा यापूर्वी दहशतवादी कारवायांमध्ये सामील होता. बेगमध्ये पेठमधील पोलीस आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर २००५ मध्ये झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटातही तो सामील होता.

हेही वाचा