टीम इंडिया व्हाईटवॉशसाठी सज्ज

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रंगणार अखेरचा‍‍‍ टी-२० सामना : विराटला विश्रांती, श्रेयसला संधी


03rd October 2022, 11:51 pm
टीम इंडिया व्हाईटवॉशसाठी सज्ज

इंदूर : ऑस्ट्रेलिया पाठोपाठ दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी-२० मालिकाही टीम इंडियाने जिंकली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेमधील केवळ ‍एक सामना बाकी आहे. या मालिकेत टीम इंडियाकडे २-० अशी विजयी आघाडी आहे. टी-२० वर्ल्ड कपआधी टीम इंडिया मंगळवारी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना इंदूरमध्ये खेळणार आहे. या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा दक्षिण आफ्रिकेला व्हाईटवॉश देण्यासाठी सज्ज झाला आहे. दरम्यान, भारतीय कर्णधाराकडे वर्ल्ड कपआधी प्रयोग करण्याची शेवटची संधी आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन टी-२० मालिकेतील तिरुअनंतपुरम आणि गुवाहाटी येथे झालेले पहिले दोन सामने जिंकून टीम इंडियाने मालिका आधीच जिंकली आहे. त्यामुळे संघ व्यवस्थापनाने भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीला तिसऱ्या सामन्यातून विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यातून विश्रांती घेतल्यानंतर विराट कोहली कुटुंबीयांना भेटण्यासाठी मुंबईला रवाना झाला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन सामन्यांत त्याने नाबाद ३ आणि ४९ धावांची खेळी केली. दरम्यान, या महिन्यात ऑस्ट्रेलियात वर्ल्ड कप स्पर्धा सुरू होणार आहे. हे पाहता विराटला विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
श्रेयस अय्यरचा प्लेइंग ११ मध्ये समावेश
विराटच्या अनुपस्थितीत आता श्रेयस अय्यरला तिसऱ्या टी-२० सामन्यात प्लेइंग-११ मध्ये स्थान मिळू शकते. दीपक हुडाच्या दुखापतीमुळे अय्यरचा या मालिकेसाठी टीम इंडियात समावेश करण्यात आला होता. पहिल्या दोन सामन्यांमध्ये अय्यरचा प्लेइंग ११ मध्ये समावेश नव्हता. श्रेयस अय्यरने ७ ऑगस्ट रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटचा टी-२० आंतरराष्ट्रीय खेळला. या सामन्यात श्रेयसने आपला धडाकेबाज फॉर्म दाखवत ४० चेंडूत ६४ धावा केल्या होत्या. श्रेयसने स्वतःच्या दमदार फलंदाजीने टीम इंडियासाठी अनेक सामने जिंकले आहेत. त्यामुळेच टीम इंडियासाठी श्रेयस अय्यरचे फलंदाजीतील योगदान खूप महत्त्वाचे आहे.
रिषभ पंतलाही मिळणार एक्सपोजर
टीम इंडिया गेल्या काही सामन्यांपासून दिनेश कार्तिकला पहिला पसंतीचा यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून सामील करत आहे. त्यामुळे प्लेइंग-११ मध्ये समावेश असूनही रिषभ पंतला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात फलंदाजीची संधी मिळू शकली नाही. दरम्यान, ‍विराटच्या अनुपस्थितीत, पंतला फलंदाजीलाठी एक्सपोजर दिले जाऊ शकते जेणेकरून त्याला वर्ल्ड कपपूर्वी लय मिळेल. वर्ल्ड कपसाठी जाहीर करण्यात आलेल्या १५ सदस्यीय संघात पंतचा समावेश आहे.
भारतीय गोलंदाजी चिंतेचा विषय
भारताने दुसऱ्या टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा १६ धावांनी पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. हा सामना जिंकून टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला त्यांच्या घरच्या टी-२० मालिकेत प्रथमच पराभूत केले. संघाच्या या ऐतिहासिक विजयानंतरही भारतीय कर्णधार रोहित शर्माने डेथ ओव्हर्समध्ये संघाच्या गोलंदाजांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. संघाकडून वारंवार होणाऱ्या चुकाही त्यांनी सांगितल्या. या सामन्यात एकूण ४५८ धावा झाल्या आणि फक्त सहा विकेट पडल्या. शेवटच्या चार षटकांमध्ये टीम इंडियाच्या गोलंदाजांनी ६५ धावा दिल्या. मागच्या ५ ते ६ सामन्यांत हेच दिसून येत आहे. कर्णधार रोहित शर्माने या समस्येवर तोडगा काढणे गरजेच असल्याचे म्हटले आहे.
संघाला भासतेय बुमराहची उणीव
मालिका जिंकल्यानंतरही भारतीय कर्णधार रोहित शर्माने गोलंदाजांना आपल्या खेळात सुधारणा करण्यास सांगितले आहे. आफ्रिकेने शेवटच्या दोन षटकांत ४६ धावा केल्यामुळे भारतीय संघाला बुमराहची पुन्हा एकदा उणीव जाणवली. गुवाहाटी येथील सामन्यानंतर रोहित म्हणाला, जसप्रीत बुमराहची दुखापत हा आमच्यासाठी चिंतेचा विषय आहे. शेवटची षटके गोलंदाजी करण्यावर भर द्यावा लागेल. गेल्या पाच-सहा सामन्यांमध्ये आम्ही चांगली गोलंदाजी केलेली नाही. डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी आणि फलंदाजी करणे खूप अवघड असते. इथेच सामन्याचा निर्णय होतो. डेथ ओव्हर्समध्येही आपण लक्ष केंद्रित केले पाहिजे, ही एक बाजू आहे जिथे आपल्याला नक्कीच आव्हान दिले जाईल, असेही रोहित म्हणाला.
हर्षल पटेलला वगळणार
वेगवान गोलंदाज हर्षल पटेलने इंदूर येथील सामन्यात हर्षल पटेलचा फॉर्म खूपच खराब राहिला. कर्णधार रोहित शर्मा त्याला प्लेइंग इलेव्हनमधून वगळून दुस‍ऱ्या गोलंदाजाला संधी देऊ शकतो. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या गुवाहटी येथील दुसऱ्या सामन्यात हर्षलने ४ षटकांत ४५ धावा दिल्या आणि त्याला एकही विकेट मिळाली नाही. या सामन्यात त्याच्या गोलंदाजीत वेगही नव्हता. हर्षल पटेल आपल्या गोलंदाजीने विरोधी फलंदाजांमध्ये भीतीही निर्माण करू शकत नाही.
मोहम्मद सिराजची एंट्री
अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात कर्णधार रोहित शर्मा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला हर्षल पटेलच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट करू शकतो. मोहम्मद सिराज १४० किमी प्रतितास पेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी करताना चेंडू स्विंग करण्यात माहीर आहे. मोहम्मद सिराजने टीम इंडियासाठी १३ कसोटी, १० एकदिवसीय आणि ५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. ज्यात त्याने अनुक्रमे ४०, १३ आणि ५ विकेट घेतल्या आहेत. मोहम्मद सिराज पॉवरप्ले आणि डेथ ओव्हर्समध्ये त्याच्या धारदार स्विंग गोलंदाजीसाठी ओळखला जातो. मोहम्मद सिराज नवीन चेंडूवर विकेट घेण्यात माहीर आहे.
..........
आजचा सामना
भारत वि. दक्षिण आफ्रिका
स्थळ : होळकर स्टेडियम, इंदूर
वेळ : सायं. ७ वा.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स

संभाव्य प्लेइंग ११

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, हर्षल पटेल, दीपक चाहर, अर्शदीप सिंह/मोहम्मद सिराज.
दक्षिण आफ्रिका : टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, हेन्रिक क्लासेन, केशव महाराज, एडन मार्कराम, एनरिक नॉर्टजे, वेन पारनेल, ड्वेन प्रिटोरियस, रिसोबा रुसो, ट्रिस्टन स्टब्स.