इंडोनेशियात फुटबॉल सामन्यावेळी मैदानावर चाहत्यांचा ‘राडा’

१७४ जणांचा मृत्यू : १८० पेक्षा अधिक गंभीर जखमी

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
02nd October 2022, 11:24 pm
इंडोनेशियात फुटबॉल सामन्यावेळी मैदानावर चाहत्यांचा ‘राडा’

इंडोनेशिया : इंडोनेशियात एका फुटबॉल सामन्यादरम्यान हिंसाचार घडला आहे. या हिंसाचारात १७४ जणांचा मृत्यू झाला असून, १८० पेक्षा अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन पोलिसांचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. इंडोनेशियाातील पूर्व जावा भागात ही घटना घडली आहे. याबाबत पोलिसांनी माहिती दिली आहे.

अरेमा एफसी आणि पर्सेबाया सुराबाय यांच्यादरम्यान सामना रंगला होता. मात्र, सामन्यात पर्सेबाया सुराबाय संघाने अरेमा एफसीवर मात करत ३-२ ने सामना जिंकला. या सामन्यानंतर पराभूत झालेल्या अरेमा एफसी संघाच्या चाहत्यांनी मैदानावर येत गोंधळ घातला. यावेळी नाराज चाहत्यांना हुसकवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या कांड्याचा मारा केला. त्यामुळे मैदानातील चाहत्यांमध्ये धावपळ उडाली आणि चेंगराचेंगरीच्या घटना घडल्या. या दुर्घटनेत १७४ जणांच्या मृत्यू झाला. तर, अनेक गंभीररित्या जखमी झाले आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पूर्व जावा पोलिसांचे प्रमुख निको एफिंटा यांनी दिलेल्या माहितीनुसार, या हिंसक घटनेत ३४ जणांचा मैदानावर मृत्यू झाला होता. तर उर्वरित लोकांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. फुटबॉल स्टेडियममध्ये झालेल्या हिंसाचाराची माहिती कोणीतरी पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस आणि इंडोनेशियन नॅशनल आर्म्ड फोर्सचे जवान घटनास्थळी पोहोचले आणि खेळाडूंना सुरक्षितपणे मैदानाबाहेर काढले.

या घटनेनंतर इंडोनेशिया बीआरआई लीगचे सर्व सामने एक आठवड्यासाठी स्थगित करण्यात आले आहेत.

हेही वाचा