मोंदीच्या हस्ते ५ जी सेवा लाँच

नवी दिल्लीत इंडिया मोबाइल काँग्रेसच्या सहाव्या सत्रात शुभारंभ


01st October 2022, 11:48 pm
मोंदीच्या हस्ते ५ जी सेवा लाँच

न्यूज डेस्क । गोवन वार्ता

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी नवी दिल्लीतील प्रगती मैदानावर आयोजित इंडिया मोबाइल काँग्रेसच्या सहाव्या सत्राचे उद्घाटन पार पडले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील ५ जी सेवेचाही शुभारंभ केला. यावेळी संबोधित करताना त्यांनी ५ जीचे फायदे आणि ही सेवा भारतात कशा प्रकारे क्रांती घडवून आणेल, यावर भाष्य केले. तसेच आजच्या तारखेची नोंद इतिहासात सुवर्ण अक्षरांत होईल, असेही ते म्हणाले.

मोदी म्हणाले की, आम्ही सत्तेत आल्यानंतर देशात तंत्रज्ञानाच्या वापरावर भर दिला. आम्ही डिजिटल भारत ही संकल्पना सुरू केली. त्याचा परिणाम आज भारत तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आत्मनिर्भर होत आहे. आधी २जी, ३ जी, ४जी साठी भारत इतर देशांवर अवलंबून होता. मात्र, आता ५ जी तंत्रज्ञानाने भारताने दूरसंचार क्षेत्रात जागतिक मानके स्थापित केली आहेत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

डिजिटल वापरावर भर देण्याबरोबच आपण उपकरणांच्या किमती आणि डेटाच्या किंमतीवरही लक्ष केंद्रीत केले आहे. २०१४ पर्यंत आपण १०० टक्के मोबाईल आयात करत होतो. मात्र, आता देशात २०० मोबाईल युनिट निर्मिती केंद्र तयार करण्यात आले आहे. भारतात २०१४ मध्ये २५ कोटी इंटरनेट युजर्स होते, हा आकडा आता ८५ कोटींवर पोहोचला आहे, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. तसेच आता ५ जी तंत्रज्ञान क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावेल, असेही ते म्हणाले.

तत्पूर्वी, एअरटेल, जीओ सारख्या कंपन्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना ५ जीचे प्रात्यक्षिक दाखवले. यावेळी त्यांनी ‘जीओ-ग्लास’सह इतर ५ जी उपकरणांची पाहणी केली. तसेच एंड-टू-एंडचे स्वदेशी तंत्रज्ञानही समजून घेतले.

भारतातील ५जी ​​तंत्रज्ञानाची क्षमता दर्शविण्यासाठी, देशातील तीन प्रमुख दूरसंचार ऑपरेटर्सनी पंतप्रधानांना प्रत्येकी वापराचे प्रात्यक्षिक सादर केले. पंतप्रधानांनी जीओ, वोडाफोन-अायडीया आणि एयरटेलच्या पॅव्हेलियनला भेट दिली. पंतप्रधानांनी जिओ पॅव्हेलियनला भेट दिल्यावर त्यांनी पॅव्हेलियनमध्ये प्रदर्शित ५ जी उपकरणे पाहिली आणि जीओ ग्लासद्वारे वापरल्या जाणार्‍या केसेसचा अनुभव घेतला. त्यांनी तरुण जीओ अभियंत्यांच्या टीमकडून एंड-टू-एंड ५ जी तंत्रज्ञानाचा स्वदेशी विकास समजून घेतला.

५ जी सुरू झाल्याने काम होईल अधिक सोपे

भारतात ५जी इंटरनेट सेवा सुरू झाल्याने बरेच काही बदलणार आहे. यामुळे लोकांचे काम तर सोपे होईलच, पण मनोरंजन आणि दळणवळणाच्या क्षेत्रातही खूप बदल होईल. एरिक्सन, ५जीसाठी काम करणार्‍या कंपनीचा विश्वास आहे की ५ वर्षांत भारतात ५०० दशलक्ष ५जी इंटरनेट वापरकर्ते असतील.

यावेळी रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी सांगितले की, ५ जी ही डिजिटल कामधेनू आहे. हे तंत्रज्ञान भारतीयांच्या जीवनात आरोग्य, संपत्ती आणि आनंद आणेल. त्यामुळे स्वस्त दरात आरोग्य सेवा देणे शक्य होणार आहे. अंबानी म्हणाले की, जीओच्या माध्यमातून डिसेंबरपर्यंत देशाच्या कानाकोपऱ्यात ५ जी सेवा पोहोचवली जाईल. त्याचवेळी, भारती-एअरटेलचे अध्यक्ष सुनील मित्तल यांनी आजपासून दिल्ली, मुंबई आणि वाराणसीसह देशातील पाच शहरांमध्ये ५ जी सेवा देण्याची घोषणा केली.

हेही वाचा