जमीन हडप : मैथीला सशर्त जामीन मंजूर

म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालयाचे निर्देश

|
28th September 2022, 11:37 Hrs
जमीन हडप : मैथीला सशर्त जामीन मंजूर

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : बनावट दस्तावेज​ तयार करून जमिनी हडप करण्याच्या प्रकरणात विशेष तपास पथकाने (एसआयटी) अटक केलेल्या आणि जामिनावर सुटलेल्या राजकुमार मैथी याला तिसऱ्यांदा अटक करण्यात आली. संशयिताला म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालयाने ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक बाँड (हमी रक्कम) व इतर अटीवर सशर्त जामीन मंजूर केला आहे.
या प्रकरणाची तक्रार मुंबईस्थित मार्क लोबो यांनी म्हापसा पोलीस स्थानकात केली होती. त्यानुसार, आसगाव-बार्देश येथील सर्वे क्रमांक २२३/८ मधील जमीन हडप केल्याचे म्हटले आहे. त्यात संशयित दामोदर यशवंत सिनाई काकोडकर, गुलाब सिनाई काकोडकर, अमृत गोविंद गोवेकर आणि इतर अज्ञात व्यक्तीने तक्रारदारांचे बनावट विक्रीपत्र तयार केले होते. संशयितांनी बनावट वारसदार प्रमाणपत्र तयार करून बार्देश मामलेदारांकडून म्युटेशन करून जमीन विक्री केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याची दखल घेऊन पोलिसांनी वरील संशयितांसह इतर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला होता. एसआयटी स्थापन केल्यानंतर हा गुन्हा पोलिसांनी त्यांच्याकडे वर्ग केला.
या प्रकरणाची चौकशी करून एसआयटीने दुसऱ्या प्रकरणात अटक केलेला अमृत गोवेकर आणि राजकुमार मैथीची चौकशी केली होती. त्यानुसार, एसआयटीने बुधवार, २१ रोजी राजकुमार मैथी याला अटक केली होती. संशयिताला म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली होती. ती संपल्यानंतर संशयिताला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले. संशयित मैथीने जामीन अर्ज दाखल केला असता, न्यायालयाने ५० हजार रुपयांचा वैयक्तिक बाँड (हमी रक्कम), त्याच रकमेचा एक हमीदार, पाच दिवस एसआयटीच्या तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहणे व इतर अटींवर जामीन मंजूर केला.