दोन नव्या मंत्र्यांचा शपथविधी २६ सप्टेंबरनंतर

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
23rd September 2022, 01:12 am
दोन नव्या मंत्र्यांचा शपथविधी २६ सप्टेंबरनंतर

पणजी : काँग्रेसमधून भाजपात आलेल्या दोन आमदारांना मंत्रिपदे आणि उर्वरित सहा जणांना महामंडळे देण्याचा विचार भाजपने चालवला आहे. त्यानुसार, २६ सप्टेंबर किंवा त्यानंतरच्या पुढील काहीच दिवसांत दोन मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे.
आमदार दिगंबर कामत, आलेक्स सिक्वेरा, मायकल लोबो, डिलायला लोबो, केदार नाईक, राजेश फळदेसाई, रुडॉल्फ फर्नांडिस आणि संकल्प आमोणकर या काँग्रेसच्या आठ आमदारांनी काहीच दिवसांपूर्वी भाजपात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्यासह दिल्ली गाठून तेथे भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीनंतर झालेल्या बैठकीत आठपैकी वरिष्ठ असलेल्या दोन आमदारांना मंत्रिपदे आणि इतरांना महामंडळांची अध्यक्षपदे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु, पितृपक्ष सुरू असल्याने दोन मंत्र्यांचा शपथविधी रखडला आहे. २५ सप्टेंबरला पितृपक्ष संपतो. त्यामुळे २६ सप्टेंबर किंवा त्यानंतरच्या पुढील पाच-सहा दिवसांत या दोन मंत्र्यांना शपथ दिली जाऊ शकते, अशी माहिती भाजपातील सूत्रांनी दिली.
दरम्यान, काँग्रेसने फुटीर आमदारांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. बुधवारी काँग्रेस कार्यकर्त्यांनी​ आमदार आलेक्स सिक्वेरा यांच्या घरासमोर आंदोलनही केले. या पार्श्वभूमीवर, सरकारने काही आमदारांच्या घरांभोवती पोलिसांचा कडेकोट पहारा लावलेला आहे.