एनआयएचे १३ राज्यांत छापे; पीएफआयच्या १०६ सदस्यांना अटक


23rd September 2022, 01:09 am
एनआयएचे १३ राज्यांत छापे; पीएफआयच्या १०६ सदस्यांना अटक

नवी दिल्ली : पीएफआय संघटनेकडून कर्नाटक, केरळ, तामिळनाडू आणि तेलंगणातील हैदराबाद येथे दहशतवादी कारवाया वाढवण्यासाठी दहशतवाद्यांना पैसा पुरवण्यात आल्याचे आढळून आले होते. त्यानुसार गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, तेलंगणा, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, पश्चिम बंगाल, मध्यप्रदेश, पुद्दुचेरी राज्यातील पीएफआयच्या शाखांवर छापे टाकून १०६ जणांना अटक केली आहे.
तत्पूर्वी जुलैमध्ये बिहारमधील पाटणा पोलिसांनी फुलवारी शरीफ येथे छापा टाकून दहशतवादी कटाचा पर्दाफाश केला होता. फुलवारी शरीफमध्ये पीएफआयच्या सदस्यांकडे ‘इंडिया २०४७’ नावाचा सात पानांचा दस्ताऐवजही आढळला होता. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करणे आणि पुढच्या २५ वर्षांत भारताला मुस्लिम राष्ट्र बनवण्याचा कृती आराखडा तयार करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत गृह मंत्रालयात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत एनएसए अजित डोभाल, गृह सचिव अजय भल्ला आणि एनआयएचे महानिदेशक उपस्थित होते. बैठकीनंतर बुधवारी मध्यरात्रीपासूनच एनआयएने देशभरात छापे टाकण्यास प्रारंभ केला होता.

नियोजनबद्धरीत्या केली कारवाई

- समाजात सांप्रदायिकता पसरवण्याच्या आरोपाखाली पीएफआयवर सध्या फक्त झारखंडमध्ये बंदी आहे. त्याविरोधात संघटनेने न्यायालयातही दाद मागितली आहे. त्याचवेळी वादग्रस्त ठरलेली ही संघटना केंद्र सरकारच्या रडारवर आली होती.
- ऑगस्टमध्येच एक पथक स्थापन करण्यात आले होते, ज्यांच्यावर तीन आघाड्यांवर काम करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. यामध्ये सर्वात आधी पीएफआयच्या नेटवर्कचे मॅपिंग करण्यास सांगण्यात आले होते.
- कर्नाटकपासून संघटनेशी निगडित व्यक्ती जिथे राहतात त्या सर्व भागांचा नकाशा तयार करणे व संघटनेच्या निधीचे स्रोत शोधणे, तसेच त्यांच्याशी संबंधित सर्व कागदपत्रे गोळा करणे व संघटनेचे नाव ज्या दंगली किंवा घटनांमध्ये आले त्या सर्व घटनांची संयुक्त पाहणी करणे, अशा जबाबदाऱ्या होत्या.

राजकारणावर वर्चस्व स्थापण्याचा कट

- राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या माहितीनुसार, या संघटनेने २२ राज्यांत आपले बस्तान बसविले आहे. केंद्र सरकारने बंदी आणलेल्या ‘स्टुडन्ट्स इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया’ (सिमी) या संघटनेचीच ही प्रतिकृती असून सिमीचे अनेक सदस्य या संघटनेत सक्रिय आहेत.
- याच संघटनेचा ‘सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया’ हा राजकीय पक्ष आहे. २००९ मध्ये स्थापन झालेल्या या राजकीय पक्षात नगरपरिषदांच्या निवडणुकीत आपले बस्तान बसवायला सुरुवात केली आहे. उडुपी जिल्ह्यात तीन नगरपरिषदा जिंकल्या आहेत.
- याशिवाय कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया आणि नॅशनल विमेन्स फ्रंट अशा संघटनाही कार्यरत आहेत. या संघटनेचे मुख्यालय दिल्लीत आहे. मात्र ही दहशतवादी संघटना असल्याचा तपास यंत्रणेचा दावा आहे.

हेही वाचा