अविश्वास ठरावाआधीच सोडले नगराध्यक्षपद

चर्चेच्या पूर्वसंध्येलाच घनश्याम शिरोडकरांचा राजीनामा

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
23rd September 2022, 01:05 am
अविश्वास ठरावाआधीच सोडले नगराध्यक्षपद

मडगाव : येथील पालिकेच्या भाजप समर्थक पंधरा नगरसेवकांनी दाखल केलेल्या अविश्वास ठरावावर चर्चा होण्याच्या आदल्याच संध्याकाळी म्हणजे गुरुवारी घनश्याम शिरोडकर यांनी नगराध्यपदाचा राजीनामा दिला. यामुळे रिक्त पदासाठी निवडणुकीसाठी शुक्रवारी सकाळच्या बैठकीत चर्चा होणार आहे. या घटनेमुळे मडगाव पालिकेत सर्वात कमी काळ नगराध्यक्ष राहिल्याचा शिक्का घनश्याम यांच्यावर बसला आहे.
नगरसेवकांनी अविश्वास ठराव दाखल करताना कोणतेही कारण दिलेले नाही. केवळ गैरसमज झाल्याचे म्हटले आहे. त्यामुळे ठरावावर मंजुरीसाठी घेण्यात येणाऱ्या बैठकीवेळी चर्चा केली जाणार नाही. याशिवाय देवासमोर नेऊन नगरसेवकांना प्रमाण करून घेण्याच्या प्रकारामुळे नगरसेवकांत भीती असल्याने त्यांना धर्मसंकटात न टाकता राजीनामा देत असल्याचे घनश्याम यांनी स्पष्ट केले आहे.

तिसऱ्यांदा नगराध्यक्ष बनले पण अल्पकाळासाठीच

मडगाव पालिकेत १९९५ पासून २० नगराध्यक्ष झाले व घनश्याम २१ वे नगराध्यक्ष बनले होते. घनश्याम हे पालिकेचे तिसऱ्यांदा नगराध्यक्ष बनले होते. मात्र, यावेळी त्यांचा कार्यकाळ केवळ सहाच दिवसांचा राहिला. याआधी १० मे १९९९ ते २३ ऑक्टोबर २००० अशा एक वर्ष पाच महिने, त्यानंतर २७ मार्च २००६ ते २ जुलै २००६ मध्ये सुमारे तीन महिन्यांसाठी नगराध्यक्ष बनले होते.

ठरावावर मतदान होणारच

नगरविकास खात्याच्या संचालकांकडे सोमवारी अविश्वास ठराव सादर करण्यात आला. त्यावर शुक्रवारी सकाळी बैठक होणार आहे. शिरोडकरांनी राजीनामा दिलेला असला तरीही तो मागे घेण्याचा अवधी बाकी आहे. याशिवाय ठरावाची प्रक्रिया पूर्ण करावीच लागते. त्यामुळे पालिकेत विशेष बैठकीत ठरावावर मतदान घेतले जाणार आहे.

हेही वाचा